Maharashtra Vidhan Sabha 2019: BJP is happy as Raj Thackeray MNS to contest Maharashtra Assembly Election | 'राज' की बात... मनसे निवडणूक रिंगणात उतरल्यानं भाजपाला होऊ लागल्या गुदगुल्या?
'राज' की बात... मनसे निवडणूक रिंगणात उतरल्यानं भाजपाला होऊ लागल्या गुदगुल्या?

ठळक मुद्देमनसेचं 'इंजिन' विधानसभा निवडणुकीत धावणार असल्याची चिन्हं दिसू लागली आहेत.भाजपाला टक्कर देणं हाच राज ठाकरेंच्या मनसेचा एककलमी कार्यक्रम असेल.शिवसेना आणि मनसेमध्ये मराठी मतांचं विभाजन होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राचं नवनिर्माण करण्याच्या निर्धाराने सुरू झालेली मनसे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवणार की नाही, याबद्दल बरेच महिने संभ्रम होता. हो-नाही करता-करता आता मनसेचं 'इंजिन' विधानसभा निवडणुकीत धावणार असल्याची चिन्हं दिसू लागली आहेत. अर्थात, निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरही पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेची अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र, निवडणूक लढवण्याची आपली इच्छा 'साहेब' मोडणार नाहीत, असं मनसैनिकांना वाटतंय आणि त्यांनी तयारीही सुरू केली आहे. एकूण २८८ पैकी साधारण १०० जागांवर मनसे आपले उमेदवार उतरवेल अशी चर्चा सुरू आहे. राज ठाकरेंचा एकंदर पवित्रा पाहिला, तर भाजपाला टक्कर देणं हाच त्यांचा एककलमी कार्यक्रम असेल. परंतु, मनसे निवडणूक लढवणार असल्याचं कळल्यानंतर भाजपा खूश झाल्याचं समजतंय.

मनसेनं आपला प्रवास मराठीचा मुद्दा घेऊन सुरू केला होता. मराठी भाषा आणि मराठी माणसावर परप्रांतियांकडून होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्याची मोहीमच राज ठाकरे यांनी हाती घेतली होती. त्यामुळे तरुण मतदार 'इंजिना'मागे धावू लागला होता. हे तरुण सुरुवातीला शिवसेनेचे 'मावळे' होते. कारण, शिवसेना मराठी माणसाचा आवाज होती. बाळासाहेब ठाकरे हे त्यांचा आधार होते. पण पुढे, उद्धव ठाकरे यांनी 'आमची मुंबई' मोहिमेवर लक्ष केंद्रीत केलं होतं आणि हीच संधी साधून मराठी तरुणाईला राज यांनी 'मनसे' जिंकलं होतं. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत या जोरावर मनसेचे १३ उमेदवार विजयी झालेच, पण शिवसेना आणि मनसेमध्ये मराठी मतांचं मोठ्या प्रमाणात विभाजन होऊन काँग्रेस-राष्ट्रवादीचं नशीबच फळफळलं होतं. 

तेव्हापासून अनेक निवडणुकांमध्ये मराठी मतविभाजनाचा अनुभव आला आहे. शिवसेना आणि मनसे यांनी एकत्र यावं, यासाठीही अनेकांनी प्रयत्न करून झाले. पण, आता हा विषय मागे पडलाय. या दोन्ही पक्षांचे उमेदवार जेव्हा-जेव्हा रिंगणात असतील, तेव्हा मराठी मतं विभागली जाणार, हे अटळ आहे. नेमकं हेच गणित मांडून भाजपाच्या काही मंडळींना गुदगुल्या होऊ लागल्यात.

मनसे विधानसभेच्या १०० जागा लढवण्याच्या तयारीत असल्याचं समजतं. नाशिकमधील सर्व १५ जागांवर ते उमेदवार उतरवणार आहेत. त्याशिवाय, मुंबई, ठाणे, पुण्यात मनसे प्रामुख्याने निवडणूक लढवेल. यापैकी जिथे-जिथे शिवसेना-मनसे आमनेसामने येतील, तिथे मतांची फाटाफूट होईल आणि शिवसेनेला फटका बसेल. भाजपाचा मतदार वेगळाच आहे. परभाषिक सोडाच, पण भाजपाला मतदान करणारे मराठी मतदारही मनसेकडे वळण्याची शक्यता नसल्यात जमा आहे. त्यामुळे मनसेमुळे भाजपा उमेदवाराला फारसा फटका बसणार नाही.  

एकत्र लढले काय किंवा वेगळे लढले काय; शिवसेनेच्या जागा कमी झाल्यास 'छोट्या भावा'चं वजन घटेल आणि 'मोठा भाऊ' वरचढ ठरेल. राज्यातील एकंदर वातावरण बघता, भाजपाचं पारडं चांगलंच जड दिसतंय. त्यांना हिसका दाखवण्याच्या इराद्याने मनसे रिंगणात उतरेल खरी, पण विचका मात्र शिवसेनेचा होऊ शकतो.  

लोकसभा निवडणुकीत 'ए लाव रे तो व्हिडीओ'वरून मनसे आणि भाजपामध्ये जोरदार वाक् युद्ध रंगलं होतं. निकालाचे आकडे पाहता त्याचा फायदाही भाजपाला झाल्याचं पाहायला मिळालं. अर्थात, त्या निवडणुकीत मनसेचे उमेदवार नव्हते. यावेळी ते असतील. फक्त आपण केलेल्या आरोपांमुळे, टीकेमुळे भाजपाचंच फावत नाही ना, याचा विचार राज ठाकरेंनी करायला हवा. 

महत्त्वाच्या राजकीय बातम्याः

शिवसेनेकडून ठाण्यात स्वबळाची तयारी, दोन आमदार फुटणार?

युतीकरिता भाजप घटक पक्षांना विचारात घेत नाही : विनायक मेटे

आपची पहिली यादी जाहीर; आठ जागांवर उमेदवारांची घोषणा

पवारांसाठी कार्यकर्त्यानं लिहिला 'बॉण्ड', 'मरेपर्यंत राष्ट्रवादीचंच काम करणार'

'भाजपच्या आयटी सेलमध्ये ISIS, तर पक्षात दाऊद गँगचे लोकं'


Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019: BJP is happy as Raj Thackeray MNS to contest Maharashtra Assembly Election
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.