student Worker's write bond for sharad Pawar, 'I will work till death for ncp' | पवारांसाठी कार्यकर्त्यानं लिहिला 'बॉण्ड', 'मरेपर्यंत राष्ट्रवादीचंच काम करणार'
पवारांसाठी कार्यकर्त्यानं लिहिला 'बॉण्ड', 'मरेपर्यंत राष्ट्रवादीचंच काम करणार'

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून पक्षातील दिग्गज नेत्यांनी पवारांची साथ सोडली आहे. एकीकडे पक्षातील नेते राष्ट्रवादीला सोडून जात असताना, पवारांच्या दौऱ्यांमध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह दिसून येत आहे. औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठातील काही तरुणांनी पवारांना भेटण्याचा आग्रह केला होता. त्यावेळी, पवारांनी एका हॉटेलच्या मिटींग हॉलमध्ये विद्यार्थी कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यावेळी, एका विद्यार्थ्याने चक्क 100 रुपयांच्या बॉण्डवर मी मरेपर्यंत राष्ट्रवादीचं काम करणार, असं लिहलं आहे. 

राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ग्रामीण भागातील तरुण आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग दिसत आहे. शरद पवारांची एंट्री होताच कार्यकर्त्यांची गर्दी, सदैव साहेबांसोबत... अशा मजकुराच्या टोप्या अन् डिजिटल फलक, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गाण्यावर थिरकणारी तरुणाई आणि पवारांच्या भाषणावेळी टाळ्या अन् शिट्ट्यांची मिळणारी दाद पाहून पवारही भारावून गेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला दिग्गजांनी सोडचिठ्ठी दिल्यानंतर वयाच्या 79 व्या वर्षीही पक्षाची पडझड रोखण्यासाठी शरद पवार झंझावाती दौरे करत आहेत. त्यांच्या सभांना तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. औरंगाबाद येथेही अशाच एका भारावून गेलेल्या संशोधक विद्यार्थ्याने चक्क बॉण्डवरच पवार यांना मी शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेससोबतच राहणार, असे लिहून दिले आहे. दादाराव कांबळे असे या युवकाचे नाव आहे. दादाराव यांनी शंभर रुपयांच्या बॉण्डवर 'मी शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच राहील,' असे लिहिलेला बॉण्ड पवार यांना दिला. यावेळी, पवारांचे आशीर्वादही घेतले. या प्रकारानंतर पवारही भावनिक झाले होते, त्यांनी विद्यार्थ्याच्या पाठीवरून मायेचा हात फिरवला.

विद्यार्थ्याने बॉण्डवर लिहिलेला मजकूर
'मी आपल्या विचारांची बांधिलकी जोपासणारा तरुण कार्यकर्ता आहे. समाजात घडत असणाऱ्या चर्चाप्रसंगी मी, पक्षाची भूमिका आणि तुम्ही केलेल्या कार्याची माहिती चहाच्या टपरीपासून ते मेसवरील जेवणाच्या ताटापर्यंत माझ्या भाषेतून मांडत असतो. आपली काम करण्याची शैली, सामाजिक कार्याचा वैचारिक विचार यामुळे मी झपाटलेला सामान्य घरातील विद्यार्थी आहे. सध्या पक्षाची होत असलेली वाताहत पाहून मन खिन्न झाले आहे. साहेब, कुणी मंत्री कुठेही गेले तरी मी शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या पुरोगामी विचाराचा वसा सांभाळून शेवटपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता राहील. उभ्या आयुष्यात कधीच राष्ट्रवादी पार्टी सोडणार नाही,'.
 


Web Title: student Worker's write bond for sharad Pawar, 'I will work till death for ncp'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.