Vidhan sabha 2019 : Shiv Sena's spontaneous preparations in Thane, two MLAs likely to split | Vidhan sabha 2019: शिवसेनेकडून ठाण्यात स्वबळाची तयारी, दोन आमदार फुटणार?

Vidhan sabha 2019: शिवसेनेकडून ठाण्यात स्वबळाची तयारी, दोन आमदार फुटणार?

- अजित मांडके

ठाणे : नवरात्रीत शिवसेना आणि भाजपच्या युती बाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र, युती झाली किंवा नाही, तरी ठाण्यातील शिवसेना नेत्यांनी गेल्या 9 महिन्यांपूर्वीपासूनच स्वबळाची तयारी सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे ज्या-ज्या ठिकाणी भाजपचा आमदार असेल, त्या ठिकाणी शिवसेनेत इच्छुकांची चाचपणीही आली असून या माध्यमातून भाजपवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न झाले आहेत. परंतु, युती तुटली तर जिल्ह्यातील शिवसेनेचे काही विद्यमान आमदार फुटण्याची शक्यता असल्याची माहिती शिवसेनेच्या सर्व्हेत समोर आली आहे. त्यामुळे स्वबळाची तयारी असली तरी विद्यमान आमदारांना फुटण्यापासून वाचविण्याचे आव्हानही पक्षासमोर आहे.

युतीबाबत शिवसेना आणि भाजपकडून अद्यापही फॉर्म्युला निश्चित झालेला नाही. त्यात काही जागांचा तिढा अद्यापही कायम आहे. शिवसेनेकडून ठाणे जिल्ह्याचा विचार केल्यास ठाणे शहर विधानसभा क्षेत्र मिळावे, यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार दोन्ही पक्षांच्या वरिष्ठांमध्ये त्या अनुषंगाने चर्चा सुरू आहे. मात्र, युती तुटलीच तर या ठिकाणी शिवसेनेकडून उमेदवार कोण असेल, हे नावही अंतिम झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र, युती झाली तरीही ही जागा मिळावी यासाठी शिवसेनेचे प्रयत्न असून त्या बदल्यात दोन वर्षांनी लागणाऱ्या विधानपरिषदेची जागा सोडण्यास पक्ष तयार असल्याची माहिती शिवसेनेच्या वरिष्ठ सुत्रांनी दिली. त्यामुळे भाजपने ही जागा सोडल्यास विद्यमान आमदार संजय केळकर यांचे विधानपरिषदेवर  केले जाणार आहे.

दुसरीकडे, मागील वेळेस शिवसेना गाफील राहिल्याने, शिवसेनेला ऐन वेळेस स्वबळावर निवडणूक लढवून उमेदवारांची शोधाशोध करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली होती. त्यामुळे आताच्या निवडणुकीत पक्षातील प्रत्येक उच्चपदस्थ सदस्याबरोबर साध्या कार्यकर्त्याला देखील गाफील न राहण्याचा सल्ला देण्यात आला असून गेल्या नऊ महिन्यांपासूनच विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरु केली आहे. यासाठी काहींचा प्रवेशही लांबणीवर टाकला आहे. युती तुटली तर अशा आपल्या पक्षात घेऊन त्यांनाच उमेदवारी देण्याची तयारीही जिल्ह्यातील काही मतदारसंघात सुरु आहे. शिवाय, काही इच्छुकांना आधीपासूनच तयारी करण्याची सूचनाही देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील काही मतदारसंघातील उमेदवार देखील शिवसेनेकडून अंतिम झाले आहेत. मात्र, युती तुटली तरच त्यांची नावे घोषित केली जाणार असल्याची माहितीही शिवसेनेच्या सुत्रांनी दिली. ज्या ठिकाणी जिल्ह्यात भाजपचा वरचष्मा दिसत आहे, त्याठिकाणी कुरघोडीचे राजकारण खेळण्याची रणनितीसुद्धा शिवसेनेने आखली होती. त्यानुसार ठाण्यासह जिल्ह्यातील अशा काही मतदारसंघात त्याचे पडसादही मागील काही महिन्यात उमटल्याचे दिसून आले.

संभाव्य फुटीमुळे शिवसेना सावध
एकीकडे युती तुटली तर स्वबळाची तयारी शिवसेनेने केली असली तरी त्यांच्याच पक्षातील काही विद्यमान आमदार फुटण्याची शक्यताही त्यांना सतावत आहे. सध्या जिल्ह्यात शिवसेनेचे ६ आमदार आहेत, तर भाजपचे सात आणि एक अपक्ष असे आठ आमदार आहेत. त्यात युती तुटली तर शिवसेनेचे दोन आमदार वेगळा घरोबा करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या दोघांचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंशी फारसे पटत नाही. ते फुटल्यास ‘ग्रामीण’ भागातही भाजपाचे ‘कल्याण’ होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेच्या नेत्यांना असा ‘प्रताप’ करणाऱ्यांची नावे सुद्धा माहीत आहेत, त्यामुळे हे दोन्ही आपले नव्हतेच म्हणून त्यांनी तयारी स्वबळाची ठेवली असली तर उद्या जर ते फुटून भाजपत जावून निवडून आले तर शिवसेनेचा जिल्ह्यावरील वरचष्मा कमी होऊन भाजपचे जिल्ह्यात १० आणि शिवसेनेचे चार आमदार निवडून येण्याची चिंता पक्षाला सतावत आहे. हे पचविता न येण्यासारखे असल्यामुळे शिवसेनेने सध्या तरी सावध भूमिका घेतल्याचे दिसत आहे.

Web Title: Vidhan sabha 2019 : Shiv Sena's spontaneous preparations in Thane, two MLAs likely to split

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.