Maharashtra Rain Live Updates: कोकण किनारपट्टी भागात पुढील दोन तास रेड अलर्ट जारी

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 08:35 AM2021-07-23T08:35:05+5:302021-07-23T21:48:47+5:30

संपूर्ण कोकणासह मध्य महाराष्ट्राला गुरुवारी अतिवृष्टीने झोडपल्यानंतर आता शुक्रवारीदेखील येथे पावसाचा जोर कायम राहणार आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडील ...

Maharashtra Rain Live Updates Roads waterlogged, rail services hit as heavy rain batters Maharashtra | Maharashtra Rain Live Updates: कोकण किनारपट्टी भागात पुढील दोन तास रेड अलर्ट जारी

Maharashtra Rain Live Updates: कोकण किनारपट्टी भागात पुढील दोन तास रेड अलर्ट जारी

Next

संपूर्ण कोकणासह मध्य महाराष्ट्राला गुरुवारी अतिवृष्टीने झोडपल्यानंतर आता शुक्रवारीदेखील येथे पावसाचा जोर कायम राहणार आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडील माहितीनुसार, शुक्रवारीदेखील कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २३ जुलै रोजी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघररायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर नाशिक, औरंगाबाद, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला आणि नागपूर या जिल्ह्यांत सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे. 

LIVE

Get Latest Updates

09:41 PM

पुढील 36 तास कोकण किनारपट्टी, पुणे, मध्य महाराष्ट्रासाठी धोक्याचे

09:01 PM

https://www.lokmat.com/pune/armys-operation-varsha-21-help-flood-victims-15-squads-dispatched-various-places-a580/

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचं 'ऑपरेशन वर्षा २१'; विविध ठिकाणी १५ पथकं रवाना 

08:05 PM

कराड शहरामध्ये पाणी शिरलं, कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली

07:03 PM

कोल्हापूर -सांगली महामार्गावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प

कोल्हापूर -सांगली महामार्गावर हेरले येथील देसाई मळ्याजवल पुराचे पाणी आल्याने ६ वाजता रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला. 

07:03 PM

कोल्हापूरला पुराचा धोका वाढला, नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन

राजाराम बंधाऱ्यावर पाण्याची पातळी 54 फुटांवर पोहोचली आहे. नागरिकांनी बचाव पथकांना लवकर मदत मिळण्यासाठी सहकार्य करावे. पुढील 48 तास धोक्याचे असल्याने नागरिकांनी घरातच रहावे: सतेज पाटील

07:02 PM

तुळशी नदीच्या पाणलोट क्षेत्रात विक्रमी पाऊस

06:38 PM

तळीये दुर्घटना! आतापर्यंत 49 मृतदेह सापडले; पावसामुळे बचाव कार्य थांबवले

06:22 PM

पाटण, वाई, जावली, महाबळेश्वर तालुक्यात दरडी कोसळल्या, नद्यांना मोठा पूर

पाटण, वाई, जावली, महाबळेश्वर तालुक्यात दरडी कोसळल्या, नद्यांना मोठा पूर.

05:48 PM

सावंतवाडी तालुक्यात पूराच्या पाण्याचा धुमाकूळ; लोक झोपेत असताना बाजारपेठांत पाणी घुसले

सावंतवाडी तालुक्यात पूराच्या पाण्याचा धुमाकूळ; लोक झोपेत असताना बाजारपेठांत पाणी घुसले

05:04 PM

महाड तालुक्यातील नडगाव हद्दीजवळ मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग खचला.

04:42 PM

रत्नागिरीतील चिपळूणमध्ये लष्कराचे जवान दाखल; पूरग्रस्त भागात मदतकार्य करणार

रत्नागिरीतील चिपळूणमध्ये लष्कराचे जवान दाखल; पूरग्रस्त भागात मदतकार्य करणार



 

04:40 PM

पुराचा लोट आला, कोविड हॉस्पिटलची वीज गेली; व्हेंटिलेटरवरील 8 रुग्णांचा मृत्यू

04:26 PM

चिपळूणातील पूरपरिस्थिती निवळण्यास सुरुवात

रत्नागिरी - चिपळूण तालुक्यातील पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून आता हळूहळू पाणी ओसरत असल्याने मदतकार्याला वेग आला आहे.  एनडीआरएफची 2 पथके,  आर्मीचे 1 पथक, नौदलाचे 2 पथके, हवाईदलाचे 02 पथके तसेच 15 स्वयंसेवी संस्थांमार्फत बोंटीद्वारे मदत कार्य सुरु आहे.  नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करण्याचे काम प्रशासनामार्फत सुरू असून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. सर्वांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
 

04:17 PM

साताऱ्यात दरड कोसळून १२ जणांचा मृत्यू; मदतकार्य सुरू

04:16 PM

महाडमधील पूरग्रस्तांना तातडीने मदत करण्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांचे प्रशासनाला निर्देश

रायगड - जिल्ह्यातील महाड या तालुक्यातील अतिवृष्टी झाल्याने उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे बाधित नागरिकांचे आणि जनावरांचे तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा व जलदगतीने मदतकार्य सुरू करा, अशा सूचना आज पालकमंत्री आदिती तटकरे यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या.

04:09 PM

रायगडमध्ये झालेली भूस्खलनाची घटना दुर्दैवी - पंतप्रधान

04:09 PM

चिपळुणात पूरस्थितीमुळे कोविड हॉस्पिटलशी संपर्क तुटला

चारही बाजूंनी पुराचा वेढा असलेल्या चिपळूणमधील एका रुग्णालयात ऑक्सिजनअभावी ११ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे येत आहे. या प्रकाराबाबत जिल्हा प्रशासनाने अजून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
 

04:05 PM

प्रशासनातर्फे मदतकार्य वेगाने सुरू, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पाण्याचे स्त्रोत दुषित झाल्यामुळे विहीरींचे पाणी उकळल्याशिवाय पिण्यासाठी वापरु नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. प्रशासनाच्या वतीने पथक तयार करुन निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही सुरु करण्यात येत आहे.  पिण्याच्या पाण्याच्या टँकर्सची व्यवस्था प्रशासनामार्फत करण्यात आली आहे. संपर्क तुटलेल्या भागातील नागरिकांच्या मदतीसाठी वायूदल व नौदलाच्या सहायाने मदत कार्य करण्यात येत आहे. 

03:54 PM

चिपळूणातील पूरपरिस्थिती निवळण्यास सुरुवात

रत्नागिरी - चिपळूण तालुक्यातील पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून आता हळूहळू पाणी ओसरत असल्याने मदतकार्याला वेग आला आहे.  एनडीआरएफची 2 पथके,  आर्मीचे 1 पथक, नौदलाचे 2 पथके, हवाईदलाचे 02 पथके तसेच 15 स्वयंसेवी संस्थांमार्फत बोंटीद्वारे मदत कार्य सुरु आहे.  नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करण्याचे काम प्रशासनामार्फत सुरू असून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. सर्वांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
 

03:37 PM

पोलादपूरमध्ये दरड कोसळली; 11 जणांचा मृत्यू, 13 जखमी

रायगड - पाेलादपूर तालुक्यातील केवनाळे, सुतारवाडी येथे गुरुवारी रात्री दरड काेसळून 11 जणांचा मृत्यू झाला आहे. 13 जखमींना पाेलादपूर आणि महाड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अतिवृष्टीने रायगड जिल्ह्याला चांगलेच झाेडपून काढले आहे. 

03:28 PM

प्रत्येक ठिकाणी प्रशासनाची यंत्रणा कार्यरत

03:23 PM

डोंगर उतारावर राहणाऱ्या नागरिकांबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

03:17 PM

सोलापूर : वादळी वाऱ्यासह सोलापूर शहरात जोरदार पाऊस सुरू

03:11 PM

महाडमधील तळीये गावावरील दरड कोसळण्याप्रकरणी प्रवीण दरेकर, गिरीश महाजन यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं

03:06 PM

पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा मी गेल्या चार पाच दिवसांपासून घेत आहे. हवामान खात्याने अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला होता. मात्र आता काही शब्दांची व्याख्या बदलावी लागणार आहे. अतिवृष्टीला काही मर्यादा राहिलेली नाही कारण अतिवृष्टीच्या पुढची वृष्टी होत आहे. अनपेक्षित असं हे संकट आहे. दरडी कोसळताहेत, पुराचे पाणी वाढतंय, नद्या फुगताहेत आणि या संकटाला आपण सामोरे जात आहोत - मुख्यमंत्री 

03:02 PM

कोकणावर आस्मानी संकट...चहुबाजूने पाण्याचा वेढा


 

02:29 PM

जनजीवन पूर्णतः विस्कळीत, कोल्हापूरला जोडणारे राज्यमार्ग बंद

02:14 PM

पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालय नियंत्रण कक्षात दाखल

02:08 PM

VIDEO: चिपळूणमधील खर्डी येथे पुराच्या पाण्यात मगरींचा मुक्त संचार, रहिवाशांमध्ये घबराट

01:54 PM

तुफान पावसाने कोल्हापुरात शेकडो कुटुंबांचे स्थलांतर

कोल्हापूर शहर व जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी तुफान पाऊस सुरू असून जिल्ह्यातील पंचगंगा नदीसह अन्य सर्व नद्या धोका पातळीवरून वाहत आहेत. जिल्ह्यातील महापूराच्या परिस्थितीमुळे शेकडो कुटुंबांना जिल्हा आणि महापालिका प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले असून अद्यापही बचावकार्य सुरू आहे. वाहतूक तसेच नागरी जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले असून तासागणिक वाढणारा पाऊस आणि नद्यांची पातळी यामुळे प्रशासनाचे आणि नागरिकांचे धाबे दणाणले आहेत.

01:49 PM

महावितरण सिंधुदुर्ग जिल्हा अतिवृष्टीमुळे भरणाऱ्या पाण्यामुळे खबरदारीचे उपाय म्हणून काही फिडर बंद करण्यात आले आहेत.  जसे जसे पाणी ओसरेल आणि वीज वाहिन्या पाण्यात नाहीत याची खात्री करून नंतरच वीजवहिनी सुरू करण्यात येईल सदर बाब खबरदारी म्हणून अत्यावश्यक आहे. 

01:40 PM

महाड तालुक्यात तळई गावात दरड काेसळून 22 जणांचा मृत्यू, 50 जण अडकल्याची भीती

रायगड - महाड तालुक्यातील तळई गावात गुरुवारी काेसळलेल्या दरडीमध्ये 22 जणांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही 50 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी एनडीआरएफ, पाेलिस, स्थानिक प्रशासन आणि काही संस्थांची बचावपथके युद्ध पातळीवर मदत करत आहे, अशी माहिती रायगडचे जिल्हा पाेलीस अधिक्षक अशाेक दुधे यांनी लाेकमतशी बाेलताना दिली. जखमींनी हेलिकाॅप्टरच्या सहाय्याने बाहेर काढण्यात येत आहे.

01:38 PM

सातारा - महाबळेश्वर जवळ लिंगमळा येथे रस्ता खचला, वाहतूक पूर्ण बंद

01:32 PM

सैन्यदलाच्या पंधरा गाड्या पाटण -कोयना नगर  मार्गे चिपळूणला रवाना

सातारा : चिपळूणमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना मदत करण्यासाठी पुणेहून सैन्यदलाच्या पंधरा गाड्या पाटण -कोयना नगर  मार्गे चिपळूणला रवाना झाल्या आहेत.

01:28 PM

महाडच्या तळई गावात दरड कोसळून 22 जणांचा मृत्यू

01:06 PM

दरड कोसळून १७ जणांचा मृत्यू

खेड - रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या धामणंदनजीकच्या पोसरे बौद्धवाडीत शुक्रवारी दरड कोसळून १७ जणांचा मृत्यू झाला आहे. गेला आठवडाभर संततधार पाऊस पडत आहे. त्यात बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर अधिक झाला आहे. या मुसळधार पावसामुळे पोसरे येथील बौद्धवाडीवर दरड कोसळली. १२ घरांना त्याचा फटका बसला. त्यातील ६ घरे पूर्णपणे गाडली गेली आहेत. त्यात १७ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. २५ जनावरेही दरडीखाली गाडली गेली आहेत.

01:05 PM

कर्नाटक सौदलगा येथे महामार्गावर वेदगंगा नदीचे आलेले ५ फूट पाणी या पाण्यामुळे महामार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. 

12:57 PM

रत्नागिरी - खेड तालुक्यात धामणंद बौद्धवाडी येथे दरड कोसळून १७ जणांचा मृत्यू.

12:56 PM

जिल्ह्यात एनडीआरएफ पथक दाखल

सांगली - जिल्ह्यात व पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे व धरणांमधून करण्यात येत असलेल्या विसर्गामुळे कृष्णा व वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यासाठी एनडीआरएफच्या दोन पथकांना पाचारण करण्यात आले असून यापैकी एक पथक जिल्ह्यामध्ये दाखल झाले आहे. 

12:53 PM

कृष्णा व पंचगंगा नदीला पूर

कृष्णा व पंचगंगा नदीला पूर आलेने श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे.

12:46 PM

भंडारा : गोसीखुर्द प्रकल्पाचे ३३ पैकी ३१ दरवाजे अर्धा मीटरने उघडले. ३३९०.५ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग. नदी तीरावरील गावांना सतर्कतेचा इशारा.

12:38 PM

सांगली-कोल्हापूर बायपास महामार्ग बंद

उदगाव/जयसिंगपूर - सलगपणे पडणाऱ्या पाऊसामुळे सांगली-कोल्हापूर बायपास महामार्ग बंद झाला आहे. उदगाव येथील रेल्वे पुलाजवळील ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. ते पाणी सखल भागात शिरल्याने शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. गेले चार दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. धरणातून ही विसर्ग सुरू झाल्याने काही मार्ग बंद झाले आहेत. बायपास मार्गाऐवजी उदगावहून कोल्हापूर मुख्य महामार्गावर सध्या वाहतूक सुरू आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी दिसून येत आहे. दरम्यान, उदगाव हुन जयसिंगपूर रेल्वे स्टेशन कडे जाणाराही रस्ता बंद झाला आहे. येथील ओढ्यावर ही पाणी आले आहे.

12:35 PM

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कर्नाटकातील निपाणी नजीक ५ फूट पाणी

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कर्नाटकातील यमगर्णी-सौंदलगा (ता. निपाणी) दरम्यान मांगूर फाट्यानजीक वेदगंगा नदीचे ५ फूट पाणी गुरुवारी (२२) रात्री एक वाजता आल्याने महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. या पाण्यात अडकलेली ओमीनी गाडी सकाळी ९ वाजता वाहून गेली आहे. पण कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तर

एक माल वाहतूक ट्रक पाण्यात अडकलेला आहे.

12:22 PM

आरोग्य यंत्रणा सज्ज

महाड मधील परिस्थितीत कोविड तसेच इतर रुग्णांना असुविधा होऊ नये याची खबरदारी घेण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितले. बाटू लोणेरे येथे एक वैद्यकीय पथक सज्ज असून त्यांच्याकडे रुग्णवाहिका व इतर सामुग्री आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली. एमआयडीसी चे अग्निशामक दल देखील मदत कार्यात उतरले आहे.

12:18 PM

स्वयंसेवी संस्थांना अन्नाची पाकिटे, कपडे याविषयी आवाहन

माणगाव येथे सुमारे 2000 फुड पॉकेट्स तयार आहेत. सकाळी 10 वाजेपर्यंत अजून 2000 अन्नाची पाकिटे  तयार होतील . याबाबत तहसीलदार माणगाव ही पाकिटे गरजू लोकांना वितरणाचे नियोजन करीत आहेत.  माणगाव तहसील कार्यालयातून महाडकडे एसटी बसने खाण्यापिण्याचे साहित्य रवाना झाले आहे.  स्वयंसेवी संस्थांनी देखील यासंदर्भात महाड येथे प्रशासनाच्या संपर्कात राहावे व कपडे, अन्न याची मदत पोहचवावी  असे आवाहन केल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाल्या.
 

12:16 PM

महाड येथील बचावकार्याचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

महाड येथील पूर परिस्थितीबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून माहिती घेतली. महाड मधील पूरग्रस्तांच्या बचावकार्याला बचाव पथके आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरुवात झालेली आहे, मात्र अडकलेल्या लोकांनी घराच्या छतावर किंवा उंचावर गेल्यास हेलिकॉप्टर मधील बचाव पथकाला ते दिसतील असे आवाहन प्रशासनाने केले असल्याची माहितीही जिल्हाधिकारी यांनी दिली.

12:08 PM

कोकणातील अनेक भागात पाऊस-पुराच्या स्थितीमुळे नागरिकांचे प्रचंड हाल - देवेंद्र फडणवीस

चिपळूणसह कोकणातील अनेक भागात पाऊस-पुराच्या स्थितीमुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री गिरीश महाजन आणि इतरही माझे सहकारी या भागात दौरे करीत आहेत. पिण्याचे पाणी आणि तयार अन्नाची पाकिटे ही आताच्या घडीला तातडीची गरज आहे - देवेंद्र फडणवीस

12:03 PM

गडचिरोली : निर्माणाधीन पुलाचा बायपास पाण्याखाली, दक्षिण भागात जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक वळती केली.

12:02 PM

कोल्हापूर : खिंडी व्हरवडे, ता. राधानगरी येथे दरड कोसळली

11:58 AM

पन्हाळगडावर जाणारा एकमेव रस्ता दरड कोसळल्याने बंद, जकात नाका परिसरात अजूनही दरडी कोसळणे सुरूच

11:51 AM

चंद्रिका नदीला महापूर आल्यामुळे सात ते आठ गावांचा संपर्क तुटला

अकोला - अकोट तालुक्यातील मुंडगाव येथील चंद्रिका नदीला महापूर आल्यामुळे सात ते आठ गावांचा संपर्क तुटला आहे. लोहारी ,मुंडगाव, वनी वारुळा, आलेगाव बळेगाव, लामकानी सुलतानपूर, अमीनपूर या आठ गावांचा संपर्क तुटला आहे.

11:46 AM

रस्ता बंद असून एकेरी वाहतूक सुरू

कोल्हापूर - शिरोली MIDC पो.ठाणे हद्दीतील पुणे- बंगळुरू NH-4 हायवे लगत असणारे सांगली फाटा ते कोल्हापूर कडे जाणारा सर्विस रोड व बंगळुरू पुणेकडून शिरोलीकडे जाणारा सर्विस रोड 3-4 फूट रोडवर पाणी असलेने बंद करण्यात आलेले आहेत. तसेच सांगली फाटा ते सांगली जाणारे शिरोली जुन्या नाक्याजवळ मार्बल लाईन येथे रोडवर पाणी साचल्याने सदरचा रस्ता बंद असून एकेरी वाहतूक सुरू आहे.

11:43 AM

कोल्हापूर-निपाणी मार्ग बंद

कागल - गेले तीन दिवस सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे वेदगंगा नदीचे पाणी यमगर्णी (निपाणी जवळ)  पुलावर आल्याने पुणे बंगळुरू महामार्ग बंद झाला आहे. शुक्रवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास पुलावर पाणी आले. दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने दोन वाहने सौदंलगा गावाजवळ महामार्गावरून वाहत असलेल्या या पाण्यात फसली आहेत. या वाहनातील आठ जणांना कर्नाटक पोलिसांनी सुखरूप बाहेर काढले आहे

11:41 AM

मौजे डिग्रज येथील नागरिक व जनावरांचे स्थलांतर सुरू

सांगली : मौजे डिग्रज (ता. मिरज) येथील नागरिक व जनावरे यांचे स्थलांतर सुरू आहे.

11:40 AM

पन्हाळगडावर जाणारा एकमेव रस्ता दरड कोसळल्याने बंद

11:35 AM

शिवाजी पुलावर पाणी, NDRF कडून बचाव कार्य सुरू

11:32 AM

तिलारी नदी धोका पातळीवर, कर्ली, वाघोटनने ओलांडली इशारा पातळी

सिंधुदुर्गनगरी, दि. 23 (जि.मा.का.) – आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार तिलारी नदी धोका पातळीला पोचली असून कर्ली आणि वाघोटन नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 43.600 मीटर आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 10 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 9.600 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे. 

11:31 AM

तिलारी धरणातून 40 हजार क्युसेक्स विसर्ग

तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 40 हजार 83 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. डाव्या कालव्यातून 229.515 क्युसेक्स, विद्युत गृहातून 211.86 क्युसेक्स आणि सांडव्यातून 39 हजार 641.83 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 424.1050 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 94.80 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात तब्बल 478.40 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

11:30 AM

वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 219 मि.मी. पाऊस

किनारपट्टीचे तालुके वगळता सर्व तालुक्यांमध्ये गेल्या चोवीस तासात पावसाने शंभरी पार केली आहे. सर्वाधिक पाऊस वैभववाडी तालुक्यात 219 मि.मी. नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 137.825 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2576.138 मि.मी. पाऊस झाला आहे. 

11:29 AM

अकोला : अकोल्यात मुसळधार पावसाला सुरुवात. सखल भागांमध्ये पुन्हा पाणी साचण्याची भीती

11:27 AM

दरड कोसळून 4 लोकांचा मृत्यू

पोलादपूर - साखर सुतार वाडी येथे दरड कोसळून 4 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच अजून 5 लोक ढिगाऱ्याखाली अडकली आहेत. 4 लोक जखमी आहेत. या गावांना जोडणारे पितळवाडी- उमरठ फाटा पूल तसेच उमरठ फाटा ते साखर पूल देखील वाहून गेल्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. 

11:25 AM

रस्ते बंद असून विद्युत पुरवठा व दूरध्वनी यंत्रणा खंडित

सांगली - कोल्हापूर बायपास रोडवर उदगाव येथील ओढ्याला बॅक वॉटरमुळे पुराचे पाणी आले असून ब्रिजवर चार फूट पाणी आले. बॅरिगेट्स लावून रस्ता बंद करण्यात आला आहे. जिल्ह्यात पुराचा वेढा पडल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. बऱ्याच भागातील रस्ते बंद असून विद्युत पुरवठा व दूरध्वनी यंत्रणा खंडित झाली आहे..

11:22 AM

चिपळुणात पावसाचा जोर कमी असल्याने मदत कार्याला वेग आला आहे.

11:15 AM

पाटण तालुक्यात दरड कोसळल्याने घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली, 3 कुटुंबातील लोक बेपत्ता

11:12 AM

25 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश

कोल्हापूर- पन्हाळा मार्गावर, रत्नागिरीला निघालेली कर्नाटक राज्य परिवहनची बस राजपूतवाडी जवळ पाण्यात अडकली होती. बसमधील पुरुष, महिला व लहान मुले अशा एकूण 25 लोकांना सहीसलामत बाहेर काढण्यात आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या जवानांना यश आले आहे. 

11:08 AM

पांगीरे येथील नदीतून ट्रॅव्हल्स वाहून गेली, लोकांच्या मदतीने चौदा जणांचे प्राण वाचले

पांगीरे ता. भुदरगड येथील नदीला आलेल्या पुरात ट्रॅव्हल्स वाहून गेली. गावातील लोकांच्या मदतीने ट्रॅव्हल्समध्ये असलेल्या चौदा जणांचे प्राण वाचले. 

11:01 AM

आंबोली घाटात दरड कोसळली, घाटमार्ग बंद

10:53 AM

आंबा घाटात दरड कोसळली

रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर आंबा घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळे हा मार्ग पूर्ण बंद झाला आहे.

10:48 AM

महाडमधील पूरग्रस्तांच्या बचावकार्याला रेस्क्यू टीम

महाडमधील पूरग्रस्तांच्या बचावकार्याला रेस्क्यू टीम आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरुवात झालेली आहे.

10:44 AM

अकोला : अकोट तालुक्यातील मुंडगाव येथील चंद्रिका नदीला महापूर आल्यामुळे सात ते आठ गावांचा संपर्क तुटला आहे.

10:44 AM

सातारा - कोयना धरणातून सध्या  २३ हजार ७१४ क्युसेक पाणी सोडले जात आहे.

10:43 AM

गोवंडीमध्ये इमारतीचा भाग कोसळला; 3 जणांचा मृत्यू, 7 जण जखमी

10:32 AM

आंबोली घाटात दरड कोसळली

पावसाळी पर्यटनाचा मानबिंदू असलेल्या आंबोली घाटामध्ये शुक्रवारी रात्री सव्वा बारा वाजताच्या सुमारास मुख्य धबधबा पासून अर्धा किलोमीटर पुढे दरड कोसळली. त्यामुळे घाट रस्ता पूर्णपणे वाहतुकीस ठप्प झाला. याबाबत आंबोली पोलिस ठाण्यात माहिती दिल्यानंतर आंबोली पोलीस उपनिरीक्षक बाबु तेली व त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्री घटनास्थळी जात पाहणी केली.  तत्काळ वाहतूक थांबवली यानंतर सकाळी सात वाजताच्या सुमारास आंबोली पूर्वीचा वस येथेसुद्धा भली मोठी दरड कोसळली. त्यामुळे आंबोली घाटात दोन ठिकाणी दरडी कोसळल्याने रस्ता पूर्णपणे वाहतुकीस पूर्णपणे ठप्प झाला.

10:20 AM

सांगलीत आयर्विन पुलाजवळ पाणीपातळी ४० फूट

सांगली : सांगलीत आयर्विन पुलाजवळ पाणीपातळी ४० फूट. नदीच्या घाटावरील स्वामी समर्थ मंदिरात पाणी घुसले.

10:17 AM

कोरपना येथील शेत शिवारातील कपाशी मुसळधार पावसाने आडवी

को

रपना येथील शेत शिवारातील कपाशी मुसळधार पावसाने अशी आडवी झाली आहे. बल्लारपूर येथे ऐतिहासिक किल्ल्यातील काही भाग पावसामुळे खचला.

10:15 AM

चंद्रपूर जिल्ह्यातील नऊ तालुक्यात अतिवृष्टी, बल्लारपुरात भिंत पडून महिला ठार

चंद्रपूर - बल्लारपूर येथे भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. गुरुवारी एक शेतकरी दुचाकीसह पुरात गेल्याने मृत्यू झाला होता. जिल्ह्यात पावसाचे दोन बळी झाले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरूच आहे. गेल्या 24 तासात 15 पैकी 9 तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. चंद्रपूर तालुक्यात 112.8 मिमी, बल्लारपूर - 190.6, गोंडपिपरी - 77, मूल 83.1, सावली - 73.7, सिंदेवाही - 85.7, राजुरा - 145.6, कोरपना - 140.8 व तर जिवती तालुक्यात सर्वाधिक 200.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

10:08 AM

चांदेराई परिसरात व बाजारपेठेत ३० तास पाणी कायम

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण खेड भागाला पुराचा मोठा फटका बसलेला असतानाच रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई परवा रात्री बाजारपेठेत आलेलं पाणी कालपर्यंत कायम होते. त्यानंतर काल रात्रीपासून पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली. संपूर्ण बाजारपेठ पाण्याखाली गेली आणि पाणी लोकवस्तीत घुसले. मुसळधार पावसामुळे रात्री १ वाजता पाणी लोकवस्तीत घुसू लागले. पाण्याचा वेग वाढला होता. त्यामुळे लोकांना  सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.

10:06 AM

मुंबईच्या गोवंडीमध्ये इमारतीचा भाग कोसळला; 2 जणांचा मृत्यू, 10 जण जखमी
 

09:57 AM

डोंबिवली - गुरुवारच्या काहीशा विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात

09:48 AM

भारतीय नौदलाची पाच पथके चिपळूणात दाखल. स्थानिक प्रशासनाच्या सूचनेनुसार ही पथके बचावकार्यात सहभागी होतील

09:42 AM

भारतीय नौदलाची पाच पथके चिपळूणात दाखल

09:32 AM

वेदगंगा नदीचे पाणी यमगर्णी (निपाणी जवळ) पुलावर आल्याने पुणे-बंगळुरू महामार्ग बंद

गेली तीन दिवस सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे वेदगंगा नदीचे पाणी यमगर्णी ( निपाणी जवळ)  पुलावर आल्याने पुणे-बंगळुरू महामार्ग बंद झाला आहे. शुक्रवार रात्री दोन वाजण्याच्या सुमारास पुलावर पाणी आले. दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने दोन वाहने सौदंलगा गावाजवळ महामार्गावरून वाहत असलेल्या या पाण्यात अडकली आहेत. या वाहनातील आठ जणांना कर्नाटक पोलिसांनी सुखरुप बाहेर काढले आहे. निपाणीकडुन येणारी वाहने यमगर्णी गावात तर कोल्हापूरकडुन जाणारी वाहने सौदंलगा गावाजवळ रोखून ठेवली आहेत. पोलीस उभे आहेत. 2019 मध्येही या ठिकाणी पाणी आले होते. सध्या या ठिकाणी  सात आठ फुट पाणी वाहत आहे.

09:20 AM

मुंबई : भारतीय नौदलाची पाच पथके चिपळूणात दाखल झाली आहेत. स्थानिक प्रशासनाच्या सूचनेनुसार ही पथके बचावकार्यात सहभागी होतील.

08:57 AM

कोल्हापूर जिल्ह्यात कागल जवळ पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पाणी आल्याने महामार्ग पहाटेपासून वाहतुकीसाठी बंद झाला आहे.

08:57 AM

चिपळुणात पावसाचा जोर कमी, मदतकार्याला गती

रत्नागिरी - पावसाचा जोर कमी झाल्यामुळे चिपळूणमधील पाणी हळूहळू ओसरू लागले आहे. रत्नागिरीतून दोन हेलिकॉप्टर्स मदतीसाठी रवाना झाली आहेत. एनडीआरएफ आणि स्वयंसेवी संस्थांनी रात्रीच मदतकार्य सुरू केले होते. मात्र उजेड कमी असल्याने मदत करता येत नव्हती. आता सकाळपासून हे काम अधिक जोमाने सुरू झाले आहे. अजूनही असंख्य लोक पाण्यात अडकून आहेत. कोणी दुकानात अडकले आहेत, कोणी घरात तर कोणी रुग्णालयात अडकून पडले आहेत. प्रशासकीय यंत्रणेकडून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे.

08:52 AM

कोयना धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात

08:51 AM

सातारा - कोयना धरणामधून सकाळी ८ वाजता सांडव्यावरुन ९५६७ क्युसेक्स विसर्ग (2 फुट) व पायथा विद्युत गृहातून २१०० क्युसेक्स असा एकूण ११६६७ क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. सकाळी १० वाजता विसर्ग वाढवून ५०००० क्युसेक्स (५ फुट) इतका करण्यात येणार आहे.

08:44 AM

सोलापूर - नीरा-भीमा खोऱ्यात दमदार पाऊस; उजनी धरण प्लसमध्ये;  दौंड व बंडगार्डनचा विसर्ग प्रचंड वाढला

08:39 AM

कर्नाळ रस्त्यावर पाणी, स्थलांतर सुरू

सांगलीमध्ये आयर्विन पूल येथे पाणीपातळी सकाळी सात वाजता 39 फूट होती. ती 50 ते 52 फुटापर्यंत वर जाऊ शकते याची नोंद घेऊन सखल भागातील नागरिकांनी,  नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी जावे. नदीपात्रात कोणीही जाऊ नये, यासाठी प्रशासनाने अतिदक्षतेचा इशारा दिला आहे.

सांगली शहरातील कर्नाळ रस्त्यावर पाणी आले असून, या परिसरातील नागरिकांचे स्थलांतर सुरू आहे.

08:38 AM

कृष्णा नदीची पाणी पातळी आणखी १०-१२ फुटाने वाढण्याची शक्यता

सांगली - कोयनेतून आज दुपारपर्यंत 50000 क्युसेस विसर्ग सोडण्यात येणार आहे. त्यामुळे कृष्णा नदीतील पाणी पातळी सध्याच्या पाणीपातळी पेक्षा दहा ते बारा फुटाने अधिक वाढू शकते. त्यादृष्टीने नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक तेथे तात्काळ स्थलांतरण सुरू करावे, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिला आहे. 

Web Title: Maharashtra Rain Live Updates Roads waterlogged, rail services hit as heavy rain batters Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.