Maharashtra Weather Alert: गणरायाच्या आगमनाला पायघड्या घालत पावसाने झोडपून काढलं. मधल्या काळात पावसाचा जोर कमी झाला होता. पण, पुढील काही दिवस पुन्हा पाऊस धुमाकूळ घालण्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यातील आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. यात कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश आहे.
पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असून, त्याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. मंगळवारी (२ सप्टेंबर) विदर्भातील गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस होईल. तर कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल. मराठवाड्यातील हिंगोली नांदेडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
पुण्यासह आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
बुधवारी (३ सप्टेंबर) राज्यातील काही भागात पावसाचा जोर वाढणार आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
ठाणे, पुणे, कोकणात गुरूवारी अतिमुसळधार
राज्यात गुरुवारी (४ सप्टेंबर) कोकण किनारपट्टी लगतचे जिल्हे आणि पश्चिम घाटमाथ्यावर अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने नाशिक, पालघर, ठाणे, पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.
सिंधुदुर्ग, नंदुरबार, धुळे, जळगाव, अमरावती या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. राज्याच्या उर्वरित भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.