Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 18:03 IST2026-04-08T10:05:52+5:302026-04-08T18:03:40+5:30

Todays Breaking Maharashtra News Live Updates in Marathi, 8 April 2026: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली युद्धविरामाची घोषणा, ...

Maharashtra Marathi News Live Updates 8 April 2026: US Israel Iran War, Donald Trump ceasefire, Impact on economy, LPG and Fuel Crisis, Ashok Kharat Inquiry, IPL 2026, PM Narendra Modi, CM Devendra Fadnavis, NCP Sunetra Pawar, Baramati Bypoll | Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान

Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान

Todays Breaking Maharashtra News Live Updates in Marathi, 8 April 2026: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली युद्धविरामाची घोषणा, त्यामागची कारणं आणि परिणाम, पाकिस्तानची मध्यस्थी, इस्रायलची भूमिका, आखाती देशांमधील परिस्थिती, भारतावर होणारा प्रभाव, महाराष्ट्रातील राजकारण, भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण, आयपीएल. पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुका या आणि अशा महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...

LIVE

Get Latest Updates

08 Apr, 26 : 06:03 PM

इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान

इराणसोबत शस्त्रसंधी झाल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवे विधान केले आहे. 

ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर एक पोस्ट केली आहे, ज्यात त्यांनी म्हटले आहे की, "इराणला लष्करी शस्त्रे पुरवणाऱ्या सर्व देशांना अमेरिकेला विकल्या जाणाऱ्या सर्व सामानावर ५० टक्के टॅरिफचा सामोरं जावं लागेल. आणि हे तत्काळ लागू होणार आहे. यामध्ये कोणतीही सवलत दिली जाणार नाही."

08 Apr, 26 : 04:34 PM

इराणसोबत शस्त्रसंधी, पण इस्रायलची लेबनानला धमकी

इराणसोबत शस्त्रसंधी झाल्यानंतर इस्रायलच्या लष्कराने लेबनानच्या दक्षिण भागात असलेल्या टायर शहरातील लोकांना इशारा दिला आहे. या लोकांना तातडीने घरे रिकामी करायला सांगण्यात आले आहे. "लोकांनी तातडीने आपली घरे रिकामी करावी आणि जहरानी नदीच्या उत्तरेला निघून जावं, जेणेकरून सुरक्षित राहाल", असे इस्रायलने म्हटले आहे. त्यामुळे इस्रायल या भागात हल्ले करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

युद्ध सुरू झाल्यापासून लेबनानमध्ये १२ लाख लोक घरे सोडून दुसरीकडे गेले आहेत. १५०० पेक्षा जास्त लोकांचा या युद्धाने बळी घेतला आहे. 

08 Apr, 26 : 04:27 PM

डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने

डहाणूकडे जाणाऱ्या उपनगरीय रेल्वे मार्गावर अचानक एक म्हैस रूळावर आल्याने लोकलची तिला धडक बसली. या घटनेमुळे डहाणू मार्गावरील रेल्वे वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली. सध्या या मार्गावरील गाड्या १५ मिनिटे उशिराने धावत असून प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

08 Apr, 26 : 04:05 PM

इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला!

इराण आणि अमेरिकेमध्ये दोन आठवड्यांच्या युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर संपूर्ण जग सुटकेचा नि:श्वास टाकत आहे. मात्र, मध्यपूर्वेतील शक्तिशाली देश असलेल्या संयुक्त अरब अमिरातीच्या गोटात मात्र संतापाची लाट आहे. विशेष म्हणजे, युएईची ही नाराजी अमेरिका किंवा इराणपेक्षा मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानवर जास्त आहे. पाकिस्तानने या संपूर्ण प्रक्रियेत युएईला विश्वासात न घेतल्याने मित्रराष्ट्रांमध्ये मोठी दरी निर्माण झाल्याचे चित्र आहे.

वाचा सविस्तर 

08 Apr, 26 : 04:04 PM

सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली

अमेरिका आणि इराण दरम्यान झालेल्या दोन आठवड्यांच्या 'सीझफायर' (युद्धविराम) निर्णयानंतर इराकने एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. इराकच्या सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटीने देशाचे हवाई क्षेत्र आणि सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळ नागरी उड्डाणांसाठी पुन्हा खुले करण्याची घोषणा केली आहे. तब्बल ४० दिवसांच्या प्रदीर्घ बंदीनंतर इराकने हे पाऊल उचलले आहे.

वाचा सविस्तर 

08 Apr, 26 : 04:02 PM

इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच रिफायनरीमध्ये भीषण स्फोट

इराण आणि अमेरिका-इस्रायल दरम्यान ४० दिवसांच्या युद्धानंतर बुधवारी सकाळीच १५ दिवसांचा युद्धविराम लागू झाला. मात्र, हा आनंद फार काळ टिकला नाही. इराणच्या सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये मोठा स्फोट झाल्याची माहिती इराणच्या 'मेहर' न्यूज एजन्सीने दिली आहे. सीझफायर लागू झाल्यानंतर इराणमधील ही पहिलीच मोठी हिंसक घटना आहे.

वाचा सविस्तर 

08 Apr, 26 : 04:01 PM

इराणसोबत युद्धविराम आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत युद्धविराम घडवून युद्धातून माघार घेतली आहे. मात्र त्यांचा सहकारी देश इस्रायल युद्धाच्या मैदानात गोंधळलेल्या अवस्थेत पडला आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर विजयाची घोषणा केली आहे पण इराणने अमेरिकेची एकही अट स्वीकारलेली नाही ही वस्तूस्थिती आहे. याउलट आता तेहरानने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवले आहे. त्यामुळे इस्रायलला धक्का बसला आहे. इस्रायलमध्ये विरोधी पक्षातील नेत्यांनी पंतप्रधान नेतन्याहूंवर अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे. इस्रायली माध्यमे देशाच्या सरकारला कडक प्रश्न विचारत आहेत.

वाचा सविस्तर

08 Apr, 26 : 03:59 PM

काम करतील तेच पक्षात पदावर राहतील, एकनाथ शिंदेंनी दिली तंबी

पक्षात काम करतील तेच मोठ्या पदावर जातील. पदावर असून काम करणाऱ्यांना डच्चू देणार, पदाधिकारी, आमदार, खासदार यांच्या बैठकीत एकनाथ शिंदे संघटना वाढीच्या कामाचा आढावा घेणार आहेत. राज्यात पक्ष संघटना वाढवण्यावर शिंदेंनी भर दिला आहे. राज्यातील सर्व गावात शिवसेनेचे अस्तित्व दिसायला हवे. एकनाथ शिंदे यांनी संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुखांना सूचना दिल्या. पक्ष संघटनेसाठी घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. 

08 Apr, 26 : 02:57 PM

"आम्ही कोणाच्याही पाया पडणार नाही. भेटा आणि निघून जा..."

जेव्हा आमचे १३ आमदार निवडून आले होते, तेव्हा अनेक बाबा भेटायला आले होते. मात्र आम्ही त्यांना स्पष्ट सांगितले की आम्ही कोणाच्याही पाया पडणार नाही. भेटा आणि निघून जा. महिलांनी सजग राहिले पाहिजे. अशा लोकांसोबत असताना आपण काय करतो, याची जाणीव महिलांना असणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया शर्मिला ठाकरे यांनी भोंदू खरात प्रकरणावर दिली आहे. नवी मुंबईत पत्रकारांशी त्या बोलत होत्या. 

08 Apr, 26 : 02:31 PM

भिवंडी काँग्रेस संघटन सुदृढीकरण अभियानाला सुरुवात

भिवंडी शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीने संघटन मजबूत करण्यासाठी “संघटन सुदृढीकरण अभियान”ची जोरदार सुरुवात करण्यात आली. या अभियानाच्या निमित्ताने ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी तसेच हरियाणा प्रदेशातील आमदार ममन खान यांनी भिवंडी शहरातील काप आळी येथील काँग्रेसच्या मुख्य कार्यालयाला भेट दिली. यावेळी आयोजित बैठकीत स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि काँग्रेसचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघटन अधिक बळकट करण्यासाठी बूथ स्तरापर्यंत कार्यकर्त्यांची बांधणी, नव्या सदस्यांची नोंदणी आणि युवकांना पक्षात संधी देण्यावर विशेष भर देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. हरियाणाचे आमदार ममन खान यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, पक्षाची ताकद ही तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये असते. त्यामुळे प्रत्येकाने सक्रिय राहून जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्यावर काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. या अभियानामुळे भिवंडीतील काँग्रेस संघटना अधिक मजबूत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

08 Apr, 26 : 02:30 PM

भिवंडीत गॅससाठी झुंबड; 5 किलो सिलिंडरसाठी लांबच लांब रांगा

भिवंडी शहरातील सिद्धिविनायक गॅस एजन्सीसमोर पाच किलो गॅस सिलिंडरसाठी आज सकाळपासून नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. गॅसचे वितरण मर्यादित असल्यामुळे नागरिकांना लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत. अनेकजण पहाटेपासूनच एजन्सीसमोर गर्दी करत असून, महिलांसह ज्येष्ठ नागरिकांनाही रांगेत थांबावे लागत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
 

08 Apr, 26 : 02:30 PM

जालना महापालिकेला मिळणार 30 ई-बसेस

जालना शहरात महापालिकेच्या वतीने लवकरच ई-बसेस सुरू केल्या जाणार आहेत. शहरात सार्वजनिक परिवहन व्यवस्था मजबूत करण्यासाठी महापालिकेने ई-बसेस सुरू करण्याच्या हालचालींना वेग दिला आहे. महापालिकेच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 30 ई-बसेस देण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी नगरविकास सचिवांना पत्र पाठवून जालना महापालिकेकडून प्रस्ताव मागवण्याचे निर्देश दिले आहेत. माजी आमदार कैलास गोरंटयाल आणि महापौर वंदना मगरे यांनीही जालना महापालिकेला ई-बसेस देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यानुसार नगरविकास विभागानेही हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे जालना महापालिकेच्या परिवहन विभागात लवकरच 30 ई-बसेस दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, महात्मा फुले मार्केटच्या उभारणीसाठीही 30 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली असून, या प्रकल्पासाठी निधी मंजूर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

08 Apr, 26 : 02:29 PM

नांदेडमध्ये 2 हजार अवैध बंदुका? हेमंत पाटलांचा गंभीर आरोप

-नांदेड शहरात अवैध हत्यारे मोठ्या प्रमाणात आली आहेत. येथील गुन्हेगार गुन्हा करून तेलंगणा आणि कर्नाटकात पळून जातात. नांदेड शहरात झडती घेतल्यास 2 हजार बंदुका सापडतील. शहरावर कोणाचाही वचक राहिलेला नाही. दोन लाख विद्यार्थी शिक्षणासाठी येथे आले असून, त्यांचीही गुन्हेगारांकडून पिळवणूक होत आहे. शहरात पोलीस आयुक्तालयाची गरज आहे. कार्यक्षम आणि निपक्षपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची गरज आहे. काही अधिकारी स्वतःची ‘सिंघम’ प्रतिमा तयार करून तोडपाणी करतात. कर्तव्यदक्ष शहाजी उमाप यांच्यासारखे अधिकारी असताना अशा घटना होणे दुर्दैवी आहे. शहराला केवळ पोलिसांचा नव्हे, तर संस्कारांचाही वचक हवा, असे हेमंत पाटील म्हणाले.

08 Apr, 26 : 02:28 PM

आखाती देशात सुरु असणाऱ्या युद्धामुळे सोलापुरात एलपीजी ऑटो रिक्षाच्या पंपासमोर लांबच लांब रांगा

-मागील 15 ते 20 दिवसांपासून सोलापुरात बंद होते एलपीजी गॅस पंप बंद
-त्यामुळे आज सोलापुरातील सर्व 'गो गॅस  एलपीजी' पंपासमोर पहाटेपासून सुरु आहेत ऑटो रिक्षाच्या रांगा
-मागील 15 ते 20 दिवसांपासून एलपीजी गॅस पंप बंद असल्याने सोलापुरातील तब्बल 18 हजार ऑटो रिक्षाचालकांवर आली होती बेरोजगारीची वेळ
-मात्र आजपासून गॅस पंप सुरु झाल्याने ऑटो रिक्षा चालकांना कांही अंशी मिळाला आहे दिलासा
 

08 Apr, 26 : 02:28 PM

बारामती पोटनिवडणूक: आकाश मोरे मैदानात, महाविकास आघाडीचा जोर

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आकाश मोरे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. मात्र पक्ष जो आदेश देईल, तो मला मान्य आहे, असे त्यांनी सांगितले. दहा तारखेला आम्ही प्रचाराचा नारळ फोडणार असून, यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर आणि महाविकास आघाडीतील अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.

08 Apr, 26 : 02:27 PM

संपूर्ण राज्यसह बुलढाणा जिल्ह्यातील शाळांची होणार पट पडताळणी

विद्यार्थ्यांची संच मान्यतेमध्ये असलेली माहिती आणि प्रत्यक्षात परीक्षेला उपस्थित असलेले विद्यार्थी याची शहानिशा करण्यासाठी आणि बोगस पट संख्येला आळा घालण्यासाठी संपूर्ण राज्यासह बुलढाणा जिल्ह्यातील शाळांची पटपडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, इयत्ता दुसरी ते नववी आणि अकराव्या वर्गाची पट पडताळणी करण्याचे आदेश शिक्षण संचालक कार्यालयाकडून सर्वच जिल्ह्याचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहेत. दिलेल्या आदेशानुसार इयत्ता दुसरी ते आठवीच्या नियतकालिका मूल्यांकन चाचणी परीक्षेच्या दिवशी अर्थात 11 एप्रिल 15 एप्रिल आणि 22 एप्रिल रोजी पट पडताळणी करण्याचे सूचित करण्यात आले आहे, तर नव्या वर्गाची पट पडताळणी देखील त्याच दिवशी करण्यात येणार आहे, आणि अकरावीच्या बाबतीत मराठी, भौतिकशास्त्र व इंग्रजी या विषयाची वार्षिक परीक्षा सुद्धा सदर तारखेच्या अनुक्रमे आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, अकरावीची देखील पट पडताळणी याच तारखेत होणार आहे, आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून पथक तयार करण्यात आले आहेत. पट पडताळणी करून तशा पद्धतीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला सादर केला जाणार आहे, पटसंखेमध्ये तफावत आढळून आल्यास संबंधित शाळेवर कारवाई होणार आहे.

08 Apr, 26 : 02:27 PM

दुचाकीच्या डिक्कीतून ५० हजारांची रोख लंपास; सीसीटीव्हीत तीन चोरटे कैद

यवतमाळ  जिल्ह्यातील नेर शहरात युनियन बँकेसमोर उभ्या असलेल्या दुचाकीच्या डिक्कीतून ५० हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. हा संपूर्ण प्रकार लगतच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्यामध्ये तीन चोरटे स्पष्टपणे दिसत आहेत. खासगी आस्थापनेवर काम करणारे अरविंद नारायणराव दरोई हे दुकानमालक प्रशांत केवटे यांच्याकडून ५० हजार रुपये घेऊन दुचाकीने नेर अर्बन बँक शाखेत व्यवहारासाठी जात होते. दरम्यान, स्वाक्षरीसाठी फोन आल्याने ते युनियन बँकेत गेले. बँकेतील काम आटोपून बाहेर आल्यानंतर त्यांनी दुचाकीची डिक्की उघडली असता त्यातील रोख रक्कम चोरीस गेल्याचे लक्षात आले. सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता तीन संशयित चोरटे परिसरात फिरताना दिसून आले. त्यापैकी एक अल्पवयीन मुलगा असून, त्यानेच डिक्की उघडून रक्कम लंपास केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. नेर शहरात सुमारे १६० सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असतानाही चोरीच्या घटना सुरूच असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

08 Apr, 26 : 02:26 PM

मेडिकल कॉलेजकडे तीनही रुग्णालये हस्तांतरित करण्याचे आदेश; आमदार राणा यांचा आरोग्य विभागावर धडक आढावा

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयासह जिल्हा स्त्री रुग्णालय व विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय हस्तांतरित करण्याच्या प्रश्नावर आश्वासन समितीचे अध्यक्ष तथा आमदार रवी राणा यांनी हिरवा कंदील दिला आहे. आमदार रवी राणा यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सभागृहामध्ये आरोग्य विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. शासकीय मेडिकल कॉलेज संदर्भात  डीन यांनी आमदार रवी राणा कडे हॉस्पिटल मधल्या काही समस्या देखील मांडल्या आणि शासकीय मेडिकल कॉलेज ला हे तीन ही हॉस्पिटल मिळत असणार तर हॉस्पिटल मध्ये चांगल्या आरोग्य सेवा मिळू शकणार. शासकीय मेडिकल साठी याकरिता तातडीने पाठपुरावा करून हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

08 Apr, 26 : 02:26 PM

सुनेत्रा पवारांच्या विजयासाठी बारामतीकरच पुढे; प्रफुल पटेल यांचा विश्वास

पार्थ पवार यांनी काँग्रेसचा डाउनफॉल सुरू झालं. असे वक्तव्य केलं होतं. यावरून शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी पार्थ पवारांचे कान टोचले होते.यावर प्रफुल पटेल यांना विचारले असता यावर अधिक बोलने टाळले. तर सुनेत्रा पवार यांना विजयी करण्यासाठी आम्ही मनापासून काम करणार आहोत आम्हीच काय बारामतीची जनता स्वतः काम करणार आहे. अजित दादांनी जो बारामतीत विकास केला आहे.त्या विकासाला बघून तेथील जनता सुनेत्रा पवार यांना प्रचंड मतांनी विजयी करणार असल्याची प्रतिक्रिया देखील प्रफुल पटेल यांनी व्यक्त केली आहे.

08 Apr, 26 : 02:25 PM

जळगावात शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर; १०४ विद्यार्थ्यांना एकच शिक्षक

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील राजुरी येथील जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पहिली ते पाचवीपर्यंत वर्ग असलेल्या या शाळेत सध्या केवळ एकच शिक्षक कार्यरत आहे. राजुरी बु. आणि राजुरी खुर्द या दोन्ही गावांची मिळून सुमारे 1100 ते 1200 लोकसंख्या असताना शाळेची पटसंख्या 104 इतकी असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र इतर शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजुरी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी नियमित उपस्थित राहत असले तरी शाळेत केवळ एकच शिक्षक उपलब्ध असल्याने त्यांच्यावर सर्व वर्गांचा ताण पडत असल्याचे चित्र आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अभ्यासात पुढे असलेली हीच मुलेदेखील तात्काळ अतिरिक्त शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी करत आहेत.
 

08 Apr, 26 : 02:24 PM

नांदेड जिल्ह्यात महाप्रसादातून विषबाधा दीडशेहून अधिक जण बाधित

नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.कौलगुडा या गावात धार्मिक कार्यक्रमादरम्यान वाटण्यात आलेल्या महाप्रसादातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे.या घटनेत सुमारे दीडशेहून अधिक जण बाधित झाले असून, सर्वांना तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कौलगुडा गावात धार्मिक कार्यक्रमानिमित्त भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी वरण, भात, भाजी, पोळी आणि खीर असा महाप्रसाद ठेवण्यात आला होता.मात्र, हा महाप्रसाद घेतल्यानंतर अनेकांना अचानक मळमळ, उलट्या आणि अशक्तपणा जाणवू लागला.यानंतर ही विषबाधेची घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते कैलास गोरठेकर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बाधितांना उमरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.दरम्यान, रुग्णांची संख्या मोठी असल्यामुळे रुग्णालयात जागा अपुरी पडली.यामुळे काही रुग्णांना जवळच्याच खाजगी मंगल कार्यालयात हलवण्यात आले असून, तेथेही उपचार सुरू आहेत.
 

08 Apr, 26 : 02:24 PM

बीडमध्ये निनावी पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार यांच्या सुरक्षेबाबत दावा, प्रज्ञा खोसरे यांचा प्रतिवाद

बीड जिल्ह्यात राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रज्ञा खोसरे यांच्याबाबत एक निनावी पत्र सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पत्रात प्रज्ञा खोसरे या भोंदू खरात यांच्या हस्तक असल्याचा आरोप करत, त्यांच्यापासून सुनेत्रा पवार यांच्या जीवितास आणि प्रतिष्ठेस धोका असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.दरम्यान, या सर्व आरोपांना प्रज्ञा खोसरे यांनी ठामपणे फेटाळले आहे.सोशल माध्यमांवर व्हायरल झालेल्या या निनावी पत्रामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे.पत्रात गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आल्याने विविध स्तरांवर चर्चा सुरू आहे.मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रज्ञा खोसरे यांनी या सर्व आरोपांवर प्रतिक्रिया देत स्पष्ट केले आहे की, कुठल्याही प्रकारचा ठोस पुरावा नसताना आपली बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.त्यांनी पुढे असेही म्हटले आहे की, सुनेत्रा पवार यांच्या जीवितास किंवा प्रतिष्ठेस कोणताही धोका नसून आपण त्यांच्या मार्गदर्शनानुसार आणि आदेशानुसारच पक्षाचे काम करत आहोत.

08 Apr, 26 : 02:23 PM

ग्रामीण भागाप्रमाणे शहरातही ‘माही’ची परंपरा

कोल्हापूरात हनुमान जयंतीनंतर छत्रपती शिवाजी पेठेत पारंपरिक ‘माही’ उत्सवानिमित्त मटण घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली आहे. गॅस सिलेंडरनंतर आता मटण खरेदीसाठीही नागरिकांनी लांबच लांब रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शिवाजी पेठेतील ‘माही’ हा उत्सव गेल्या 19 वर्षांपासून परंपरेनुसार साजरा केला जात असून, यंदाही मोठ्या उत्साहात तो पार पडत आहे. येथे मटण 620 रुपये प्रति किलो दराने विकले जात आहे. मात्र, दर्जेदार आणि पारंपरिक पद्धतीने मिळणाऱ्या मटणासाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

08 Apr, 26 : 02:12 PM

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, वर्षा बंगल्यावर बारामती निवडणुकीची चर्चा

बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी बारामती निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

08 Apr, 26 : 11:45 AM

अशोक खरात प्रकरणी कोर्टात सुनावणी सुर; दुसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी, तिसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता

न्यायालयीन कोठडी संपल्याने अशोक खरातला आज पुन्हा न्यायालयासमोर व्हीसीद्वारे हजर करण्यात आले. यावेळी न्यायाधीशांनी आरोपीच्या नावाची विचारपूस केली. दुसऱ्या प्रकरणात खरातला २१ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. तर तिसऱ्या गुन्ह्यात ताबा घेण्यासाठी न्यालयात तपास अधिकाऱ्यामार्फत प्रक्रिया सुरू आहे. तिसऱ्या गुन्हात पोलीस खरातला अटक करण्याची शक्यता आहे. 
 

08 Apr, 26 : 10:12 AM

रेपो दर ५.२५ टक्क्यांवर कायम; व्याजदरात कोणताही बदल नाही 

आरबीआयने ८ एप्रिल रोजी आपले पतधोरण जाहीर केले. एप्रिलच्या धोरणामध्ये रेपो दरात कोणताही बदल झालेली नाही. रेपो दर ५.२५ टक्क्यांवर स्थिर राहिला आहे. आरबीआयने अखेरचा रेपो दर डिसेंबर २०२५ मध्ये कमी केला होता. फेब्रुवारीच्या धोरणामध्येही आरबीआयने रेपो दरात कोणतेही बदल केले नव्हते.

Web Title: Maharashtra Marathi News Live Updates 8 April 2026: US Israel Iran War, Donald Trump ceasefire, Impact on economy, LPG and Fuel Crisis, Ashok Kharat Inquiry, IPL 2026, PM Narendra Modi, CM Devendra Fadnavis, NCP Sunetra Pawar, Baramati Bypoll