Latest Marathi News LIVE Updates: पीडित महिलांची ओळख पटवून देणाऱ्यांना शिक्षा; खरात प्रकरणी SIT प्रमुखांचं आवाहन
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 17:43 IST2026-04-07T09:58:58+5:302026-04-07T17:43:55+5:30
होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा अल्टिमेटम, इराणने त्याला न जुमानता ठेवलेल्या अटी, जागतिक घडामोडींचा भारतावर ...

Latest Marathi News LIVE Updates: पीडित महिलांची ओळख पटवून देणाऱ्यांना शिक्षा; खरात प्रकरणी SIT प्रमुखांचं आवाहन
होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा अल्टिमेटम, इराणने त्याला न जुमानता ठेवलेल्या अटी, जागतिक घडामोडींचा भारतावर होणारा परिणाम, एलपीजी तुटवड्याचा विषय, अशोक खरात चौकशी, पाच राज्यांमधील निवडणुकांमुळे तापलेलं राजकारण, या आणि अशा महाराष्ट्रासह देश-विदेशातील घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...
LIVE
07 Apr, 26 : 05:43 PM
पीडितांची ओळख पटू न देणे ही आपली नैतिक जबाबदारी - तेजस्वी सातपुते
अशोक खरात प्रकरणात एकूण ११ गुन्ह्यांचा तपास एसआयटी करत आहे. महिला अत्याचाराबाबत पीडित महिला आणि त्यांचे कुटुंब अतिशय धाडसाने समोर आलेत आणि त्यांनी फिर्याद दाखल केल्याने आरोपीवर कायदेशीर कारवाई करू शकत आहे. या महिलांची ओळख पटू न देणे, त्यांचे व्हिडिओ न पसरवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट पुन्हा पुन्हा टाकणारी ४९१ अकाऊंट कायमचे बंद करण्यात आले आहेत. महिलांची ओळख दाखवणाऱ्यांना शिक्षा केली जात आहे असं एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी म्हटलं.
07 Apr, 26 : 05:40 PM
डायमंड गार्डन ते मंडाले मेट्रो ब च्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण
मुंबईतील मेट्रो ब च्या पहिल्या टप्प्यातील लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. चेंबूरच्या डायमंड गार्डनपासून महाराष्ट्र नगरच्या मंडाले इथंपर्यंत ही मेट्रो कार्यान्वित होणार आहे. मेट्रो ब मार्गिकेला यलो लाईन म्हणून ओळखले जाते.
LIVE |मेट्रो मार्गिका 2(ब) देशभक्त ना.ग. आचार्य उद्यान-डायमंड गार्डन ते महाराष्ट्र नगर, मंडाळे (टप्पा 1)चे लोकार्पण व वांद्रे-कुर्ला संकुलाकरिता पॉड टॅक्सी प्रकल्पाचे ई-भूमिपूजन
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 7, 2026
🕞 दु. ३.३७ वा. | ७-४-२०२६📍मुंबई.#Maharashtra#MumbaiInfrastructurehttps://t.co/5fVwTaYVCO
07 Apr, 26 : 05:10 PM
४० ते ४५ दिवसांमध्ये ८ गुन्ह्यांचा तपास करणार
अनेक महिलांनी हिंमत दाखवल्याने प्रकरण उघडकीस, धाडसांनी पीडितांनी गुन्हे दाखल करण्यास मदत केली, ४० ते ४५ दिवसांमध्ये ८ गुन्ह्यांचा तपास करणार - तेजस्वी सातपुते, एसआयटी
07 Apr, 26 : 05:08 PM
खरात प्रकरणात ११ गुन्हे दाखल
अशोक खरात प्रकरणात आतापर्यंत ३० जणांची चौकशी, खरात प्रकरणात ११ गुन्हे दाखल, ९ गुन्ह्यांचा तपास एसआयटीकडे - तेजस्वी सातपुते, एसआयटी प्रमुख
07 Apr, 26 : 04:10 PM
रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार
मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत. रॉकेट हल्ल्यात दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. वाढता तणाव पाहता प्रशासनाने बिष्णुपूर जिल्ह्यात कर्फ्यू लागू केला आहे, तर अफवांवर नियंत्रण मिळवण्यासाठी, परिस्थिती सामान्य करण्यासाठी खोऱ्यातील पाच जिल्ह्यांमध्ये तीन दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. वाचा सविस्तर
07 Apr, 26 : 03:38 PM
डायमंड गार्डन ते मंडाले मेट्रो ब च्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण
मुंबईतील मेट्रो ब च्या पहिल्या टप्प्यातील लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. चेंबूरच्या डायमंड गार्डनपासून महाराष्ट्र नगरच्या मंडाले इथंपर्यंत ही मेट्रो कार्यान्वित होणार आहे. मेट्रो ब मार्गिकेला यलो लाईन म्हणून ओळखले जाते.
LIVE |मेट्रो मार्गिका 2(ब) देशभक्त ना.ग. आचार्य उद्यान-डायमंड गार्डन ते महाराष्ट्र नगर, मंडाळे (टप्पा 1)चे लोकार्पण व वांद्रे-कुर्ला संकुलाकरिता पॉड टॅक्सी प्रकल्पाचे ई-भूमिपूजन
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 7, 2026
🕞 दु. ३.३७ वा. | ७-४-२०२६📍मुंबई.#Maharashtra#MumbaiInfrastructurehttps://t.co/5fVwTaYVCO
07 Apr, 26 : 03:19 PM
"अजित पवारांच्या अपघातादिवशी खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज"
अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या दिवशी भोंदू अशोक खरातच्या मोबाइलवर समता पतसंस्थेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. याचा तपास करण्याची मागणीही त्यांनी केली. २८ जानेवारी या दिवशी व्यवहाराचे तब्बल १९ मेसेज आले होते असंही म्हटलं आहे. वाचा सविस्तर
07 Apr, 26 : 02:49 PM
मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय
महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटर आता कंपनी. सोसायटी अधिनियम १८६० अंतर्गत नोंदणी रद्द करुन कंपनी अधिनियम, २०१३ मधील कलम ८ अंतर्गत कंपनी स्थापन होणार. या निर्णयामुळे रस्ते माहिती प्रणाली, नगररचना, जलयुक्त शिवार – पाणलोट विकास, डोंगरी विकास योजना, ई- पंचनामा, महा अग्री टेक, कांदळवन अभ्यास, भूजल व्यवस्थापन, खनिच व खाणींचा अभ्यासाला गतीमानता लाभणार.
भू-स्थानिक तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रशासनात गतिमानता आणण्याकरिता महाराष्ट्र जिओटेक्नॉलॉजी अॅप्लिकेशन सेंटर (महाजिओटेक) कंपनी स्थापन होणार. आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, भूस्थानिक नवोप्रक्रम व उद्योजकता विभागामुळे विद्यार्थी, व्यावसायिक, संशोधकांसाठी शैक्षणिक कार्यक्रम राबविता येणार (नियोजन विभाग)
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी – महावितरणची आर्थिक पुनर्रचना होणार. शासन हमी असलेल्या कर्जासाठी भांडवली बाजरात सरकारी रोखे येणार. याशिवाय कृषी वितरण व्यवसायाचे विभाजन करण्यात येणार. तसेच महावितरण कंपनी भांडवली बाजारात सूचीबद्ध होणार.
महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम राबविण्यास मंजुरी. आपत्ती व्यवस्थापनात खाजगी भांडवलाच्या मदतीने वित्तपुरवठा उभारणार. यात जागतिक बँकेकडून १६५ कोटींचा निधी मिळणार. आपत्तीचा फटका बसलेल्या नागरीकांना गृह कर्जात तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांना कर्जासाठी सवलत तसेच विमा सुरक्षा उपलब्ध होणार.
पुराच्या पाण्याचा निचऱ्यासाठी कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी शहरांसह, कृष्णा खोऱ्यातील पूराचा धोका कमी करण्यासाठी प्रतिबंधक आराखडे तयार कऱण्यात येणार.
07 Apr, 26 : 01:53 PM
काँग्रेसला जनभावनेची थोडीही कदर असेल तर ते माघार घेतील - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
"काँग्रेस पक्षाला जनभावनेची थोडीही कदर असेल आणि जनतेचे मत काय आहे हे जर काँग्रेस पक्षाला लक्षात आलं तर ते उमेदवार परत घेऊन सुनेत्रा पवार यांना बिनविरोध निवडून देतील असा विश्वास आहे," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
07 Apr, 26 : 01:33 PM
भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले
उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथे भाजपाच्या एका कार्यक्रमादरम्यान पक्षाच्या दोन दिग्गज नेत्यांमध्ये, माजी आमदार धीरज ओझा आणि माजी मंत्री शिवाकांत ओझा यांच्यात मोठा वाद झाला आहे. हा वाद इतका विकोपाला गेला की, दोन्ही नेत्यांनी एकमेकांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. यानंतर दोन्ही नेत्यांचे समर्थकही आपापसात भिडले. वाचा सविस्तर
07 Apr, 26 : 01:24 PM
यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान कमी पर्जन्यमान
गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसाने राज्यातील शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं आहे. याचदरम्यान, आता यंदाच्या मान्सूनबाबत चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. यंदाच्या मान्सूनवर एल निनोचा प्रभाव जाणवणार असून, त्यामुळे यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांदरम्यान सरासरीच्या ९४ टक्के एवढा पाऊस पडेल, असा अंदाज स्कायमेट या खाजगी हवामान संस्थेने वर्तवला आहे.
यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज
07 Apr, 26 : 01:02 PM
दहिसर-काशिगाव मेट्रोचे उदघाटन LIVE
07 Apr, 26 : 12:57 PM
घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली
कर्नाटकच्या कोडागू जिल्ह्यातील ताडियांडामोल डोंगरावर ट्रेकिंगदरम्यान बेपत्ता झालेली केरळची शरण्या तीन दिवसांनंतर जिवंत सापडली. हत्तींचा वावर असलेल्या या घनदाट जंगलात शरण्या रस्ता चुकली होती. तीन दिवसांपर्यंत ती जंगलात सतत चालत राहिली. तिच्याकडे फक्त अर्धा लीटर पाणी होतं, मोबाईलची बॅटरीही संपली होती. अशा कठीण परिस्थितीतही तिने कमालीची हिंमत दाखवली. वाचा सविस्तर
07 Apr, 26 : 12:52 PM
काँग्रेसमुळे आपण मोकळा श्वास घेतोय; पार्थ पवारांच्या टीकेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
"आपण लोकशाहीवर विश्वास ठेवणारी लोकं आहोत. काँग्रेस संविधानाच्या चौकटीत काम करत आहे. आम्ही काँग्रेस पक्ष अतिशय जवळून पाहिला आहे. मी काँग्रेसच्या मतांवरही निवडून आले आहे. आज आपण जो मोकळा श्वास घेतोय ही काँग्रेस पक्षाची देण आहे हे कोणीच नाकारु शकत नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे योगदान फार मोठे आहे ते नाकारुन चालणार नाही. पण लोकशाहीमध्ये सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे त्यामुळे लोक त्यांची मते मांडत असतात," असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
07 Apr, 26 : 12:06 PM
डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर
गुजरातच्या अहमदाबादमधील चांदखेडा परिसरात एकाच कुटुंबातील दोन मुलींचा मृत्यू झाला असून आई-वडील गंभीर आजारी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डोसा खाल्ल्यानंतर ही घटना घडल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. वाचा सविस्तर
07 Apr, 26 : 11:30 AM
सुनेत्रावहिनी यांना विधानसभेत पाठवण्यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करणे अपेक्षित- संभाजीराजे छत्रपती
"कै. अजितदादा पवार यांनी महाराष्ट्रासाठी दिलेले योगदान पाहता त्यांच्या पश्चात होत असलेली बारामती विधानसभा पोटनिवडणुक बिनविरोध करून सुनेत्रावहिनी यांना विधानसभेत पाठवण्यासाठी सर्व पक्षांनी व नेतेमंडळींनी सहकार्य करणे हे सर्वसामान्य जनतेला अपेक्षित आहे. निवडणुका दर पाच वर्षांनी येतच राहतील, मात्र भावनिक किनार असलेली ही पोटनिवडणूक बिनविरोध करून स्वर्गीय दादांच्या उत्तुंग कार्याची सर्वांनीच जाण राखावी," असं संभाजीराजे छत्रपतींनी म्हटले आहे.
07 Apr, 26 : 11:18 AM
५ किलो सिलेंडरसंदर्भात केंद्राचे सर्व राज्य सरकारांना पत्र, दिले महत्वाचे आदेश
केंद्र सरकारने ५ किलो एफटीएल (फ्री ट्रेड एलपीजी) सिलिंडरसंदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्राने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना एक महत्त्वपूर्ण पत्र पाठवून या सिलिंडरचा पुरवठा आणि वितरणाला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत. हे पाऊल प्रामुख्याने प्रवासी मजूर, विद्यार्थी, रोजंदारीवर काम करणारे कामगार आणि ज्यांच्याकडे कायमस्वरूपी पत्त्याचा पुरावा नाही, अशा लोकांसाठी अत्यंत महत्वाचे ठरेल. ५ किलो एफटीएल सिलिंडरचा दैनंदिन पुरवठा आता दुप्पट करण्यात आला आहे. सविस्तर वाचा
07 Apr, 26 : 10:39 AM
अमरावती-अकोला महामार्गावर काळाचा घाला; बडनेऱ्याचे ४ तरुण ठार, ३ गंभीर
अमरावती-अकोला महामार्गावर सोमवारी मध्यरात्री झालेल्या एका भीषण अपघातात बडनेरा येथील चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेलोरा विमानतळाजवळ ही हृदयद्रावक घटना घडली.
07 Apr, 26 : 10:38 AM
अमेरिकेच्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये मिठाचा खडा; एका बातमीमुळे इराणला लागला सुगावा
इराणच्या भूमीवर कोसळलेल्या अमेरिकन एफ-१५ फायटर जेटमधील दुसऱ्या वैमानिकाला वाचवण्यासाठी अमेरिकेने तब्बल १५५ विमानांचा ताफा मैदानात उतरवला होता. अत्यंत गुप्तपणे सुरू असलेल्या या मोहिमेत अमेरिकेतीलच एका खबऱ्याने माहिती लीक केल्यामुळे हा वैमानिक इराणच्या जाळ्यात अडकता-अडकता वाचला, असा खळबळजनक दावा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. आणखी वाचा...
07 Apr, 26 : 10:37 AM
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग
घाटकोपर पूर्व येथील नालंदा सोसायटीत असलेल्या एका सार्वजनिक शौचालयाचा वापर केल्यामुळे अक्षय बांगरे या मराठी तरुणाने आपल्याला एका गुजराती व्यावसायिकाने मारहाण केल्याचा आरोप केल्यानंतर तेथे पुन्हा मराठी विरुद्ध गुजराती वाद उफाळून आला आहे. याप्रकरणी पंतनगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी या वादात उडी घेऊन आंदोलन केले.