24 Feb, 26 04:54 PM
पोलिसांच्या संरक्षणाखाली अवैध डान्सबार सुरू; सुभाष देशमुखांचा खळबळजनक आरोप
सोलापूर शहरात काही ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या संरक्षणाखाली अवैधरित्या डान्सबार सुरू असल्याचा खळबळजनक आरोप आमदार सुभाष देशमुख यांनी विधानसभेत केला. या डान्सबारमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत असून सामाजिक वातावरण बिघडण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सभागृहात नमूद केले. तसेच तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणीही त्यांनी केली.
24 Feb, 26 04:53 PM
बारामती तालुक्यातील सर्व यात्रा साध्या पद्धतीने साजऱ्या करण्याचे आवाहन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती तालुक्यातील सर्व यात्रा साधेपणाने साजऱ्या करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते आणि राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संदीप बांदल यांनी केले आहे. सध्या सर्वत्र यात्रांचा हंगाम सुरू होत आहे. दिवंगत उपमुख्यमंत्र्यांच्या निधनाला एक महिना झाला असून यात्रा-जत्रांचा हंगाम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर यात्रा साध्या पद्धतीने साजऱ्या करून मिरवणुका, फटाक्यांची आतषबाजी तसेच करमणुकीचे कार्यक्रम रद्द करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
24 Feb, 26 04:51 PM
सुजलॉन प्लांटमध्ये दरोड्याचा प्रयत्न; कंपनीच्याच अधिकाऱ्याला अटक
धुळ्यातील निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुजलॉन कंपनीच्या विंड एनर्जी प्लांटमध्ये कॉपर चोरीसाठी दरोडा टाकण्याचा प्रयत्न मध्यरात्रीच्या सुमारास घडला. याप्रकरणी कंपनीने निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे हा दरोड्याचा प्रयत्न कंपनीतील अधिकाऱ्यानेच केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सुजलॉन कंपनीचे अधिकारी ब्रिजेश कुमार मनीष द्विवेदी आणि ज्ञानेश्वर झुलाल पिंपळे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
24 Feb, 26 04:50 PM
किशोरी पेडणेकर यांनी घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयाची केली पाहणी
मुंबई महानगरपालिकेतील ठाकरे गटाच्या महापालिका विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालय येथे पाहणी केली. यावेळी ठाकरे गटाचे सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते. पेडणेकर यांनी विविध वॉर्डमध्ये जाऊन रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधला.सुरक्षा व्यवस्था, डॉक्टरांची उपलब्धता, तसेच रुग्णालयातील साहित्य याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
24 Feb, 26 04:49 PM
शिवजयंतीवरून भाजप आणि ठाकरे सेना आमने-सामने
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नुकतीच साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त विविध राजकीय पक्षांकडून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाजपकडून आमदार अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली आग्रा रोड येथील मनोहर टॉकीजजवळील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ भव्य शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला होता.
24 Feb, 26 04:21 PM
६५ बेकायदा इमारत प्रकरणी उल्हासनगरच्या धर्तीवर जीआर काढा
६५ बेकायदा इमारत प्रकरणात इमारतीमधील रहिवासी बेघर होऊ नयेत. बिल्डर आणि अधिकारी यांच्या विरोधातकारवाई झाली पाहिजे. या रहिवासियांना न्याय देण्यासाठी राज्य सरकारने उल्हासनगरच्या धर्तीवर जीआर काढावा अशी मागणी भाजपचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी केली आहे. डोंबिवली पूर्वेतील आयरे टावरे पाडा परिसरातील समर्थ कॉम्प्लेक्स या बेकायदा इमारतीवर ६ मार्च रोजी पाडकामाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. या इ्मारतीमधील रहिवासीयांसोबत भाजप नगरसेवक म्हात्रे यांनी एक बैठक घेतली. या बैठकीत स्थानिक भाजप नगरसेवक मंदार टावरे हे देखील उपस्थित होते.
24 Feb, 26 04:20 PM
डोंबिवलीतील आयरेगाव टावरे पाड्यात पाणी टंचाई
डाेंबिवलीतील आयरे गाव टावरे पाड्यात पाणी टंचाईचा सामना नागरीकांना करावा लागतो. या भागातील नागरीकांना विकतचे पाणी घेऊन तहान भागवावी लागत आहे. १५ लिटरचे क’न दरराेज नागरीकांना विकत घ्यावे लागतात. ही पाणी टंचाई सोडविण्याकडे कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाचे लक्ष नसल्याची बाब समोर आली आहे.
24 Feb, 26 04:20 PM
करवाढीच्या निषेधार्थ भाजपाच्या विरोधात शिंदेसेनेचे भिक मागो आंदोलन
मीरा भाईंदर महापालिकेत सत्ताधारी भाजपाने पहिल्याच महासभेत नागरिकांवर मालमत्ता कराच्या कर योग्य मूल्य दरात तब्बल ६० टक्के पेक्षा जास्त वाढ केली आहे. त्या निषेधार्थ शिंदेसेनेने महापालिकेत भाजपा विरोधात भीक मागो आंदोलन केले. मुख्यालयात घोषणाबाजी करत महापौरांच्या दालना बाहेर ठिय्या मारला तसेच आयुक्तांना निवेदन देत करवाढीचा ठराव रद्द करण्याची मागणी शिंदेसेनेने केली.
24 Feb, 26 03:32 PM
युथ काँग्रेस अध्यक्षांच्या अटकेवरुन राहुल गांधी आक्रमक
AI समिटमधील ‘शर्टलेस’ आंदोलनामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मंगळवारी दिल्ली पोलिसांनी युथ काँग्रेसचे अध्यक्ष उदय भानू चिब यांना अटक करून न्यायालयात हजर केलं. दिल्ली पोलिसांच्या या कारवाईवर काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. राहुल गांधी यांनी युथ काँग्रेस अध्यक्षांच्या अटकेवर भाष्य करताना म्हटलं की, "मला युवक काँग्रेसच्या माझ्या 'बब्बर शेर' सहकाऱ्यांचा अभिमान आहे आणि शांततापूर्ण आंदोलन हा आमचा ऐतिहासिक वारसा आहे." वाचा सविस्तर
24 Feb, 26 03:00 PM
सोलापूर : सासऱ्याचा खून करून जावयाकडून जीवन संपवण्याचा प्रयत्न
सोलापूर : सासऱ्याचा खून करून जावयाचा आत्महत्येचा प्रयत्न; अर्ध्या तासापूर्वीची घटना, वळसंग पोलीस घटनास्थळी दाखल...
24 Feb, 26 02:29 PM
सातारा : माजी सैनिकांची निर्घृण हत्या; जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
सातारा जिल्ह्यातील परिस्थिती सध्या अत्यंत संवेदनशील बनली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज मोठ्या प्रमाणावर आजी-माजी सैनिकांचा जमाव एकत्र आला असून “सैनिक निषेध मोर्चा” काढण्यात आला आहे. परिसरात तणावपूर्ण वातावरण असून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
24 Feb, 26 02:06 PM
"सत्ताधारी पक्ष जाणीवपूर्वक विरोधी पक्षनेता पद देत नाही"
विरोधी पक्षनेता पद न देणं अत्यंत चुकीचं आहे. अनेक महिन्यांपासून सातत्याने मागणी करत विधानसभा अध्यक्ष व मुख्यमंत्र्यांना पत्रांद्वारे विनंती करण्यात आली. लोकशाहीच्या दृष्टीने आणि सभागृहाच्या प्रभावी कामकाजासाठी विरोधी पक्षनेता हे पद अत्यंत महत्त्वाचं आहे. तरीही सत्ताधारी पक्ष जाणीवपूर्वक हे पद देत नसल्याचा आरोप काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी केला.
24 Feb, 26 01:23 PM
📍 मुंबई सुपरफास्ट... जाणून घ्या मुंबईतील टॉप १० घडामोडी झटपट पटापट...
24 Feb, 26 01:01 PM
'शक्तिपीठ महामार्गासाठी सरकारकडून पोलीस बळाचा वापर, शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्ती लाटण्याचा घाट'
शक्तिपीठ महामार्गासाठी सरकारकडून पोलीस बळाचा वापर, शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्ती लाटण्याचा घाट घातला जात आहे, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे राज्य सरकारवर केला.
24 Feb, 26 12:57 PM
"परक्यांना कळतं पण स्वकीयांना..."; राज ठाकरेंनी केलं जपानी तरुणीचं कौतुक
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक खास पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी मराठी शिकणाऱ्या एका जपानी तरुणीचं भरभरून कौतुक केलं आहे. तरुणीचा मराठी बोलतानाचा व्हिडीओ शेअर करत त्यांनी "जपानी मुलीला मनःपूर्वक धन्यवाद" असं म्हटलं आहे. तसेच त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना खोचक टोला लगावला आहे. वाचा सविस्तर
24 Feb, 26 12:06 PM
मुख्यमंत्री स्वतः आणि सरकार भ्रष्ट असल्यामुळे ते प्रत्येक भ्रष्टाचाराला पाठीशी घालतात: हर्षवर्धन सपकाळ
घाशीराम कोतवाल यांच्या स्वरूपात देवेंद्र फडणवीस काम करत आहेत राज्य मध्ये कुठलीही कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही.. भाजपने पुण्याचा तालिबान केलाय. हे क्लिनचीट बहाद्दर सरकार आहे.. मुख्यमंत्री स्वतः आणि सरकार भ्रष्ट असल्यामुळे ते प्रत्येक भ्रष्टाचाराला पाठीशी घालतात, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
24 Feb, 26 11:48 AM
यवतमाळ जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा; ५३४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान, वीज पडून पाच जखमी
यवतमाळ जिल्ह्यात सोमवारी दुपारी नऊ तालुक्यांत अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याने थैमान घातले. महसूल विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार सुमारे ५३४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव, मारेगाव, केळापूर, उमरखेड, दिग्रस, आर्णी, महागाव, कळंब व घाटंजी तालुक्यांना या वादळाचा फटका बसला. गहू, हरभरा, ज्वारी तसेच भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. काढणीला आलेला हरभरा आणि ओंब्यांवरील गहू भुईसपाट झाला असून कापूस व तुरीच्या मळणीवरही पावसाचा परिणाम झाला. राळेगाव तालुक्यातील झरगड येथे झाडाखाली आश्रय घेतलेल्या मजुरांवर वीज कोसळून पाच जण जखमी झाले. अचानक आलेल्या या वादळामुळे शेतकऱ्यांवर नवे संकट ओढवले असून अंतिम नुकसान आकडा पंचनाम्यानंतर स्पष्ट होणार आहे.
24 Feb, 26 11:20 AM
जुन्या मुंबई- पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी
जुन्या मुंबई- पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली असून रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पिंपरी चिंचवड येथील ग्रेड सेपरेटरमध्ये कंटेनर अडकल्याने वाहतूक कोंडी झाल्याचे सांगितले जात आहे.
24 Feb, 26 11:04 AM
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन, मंत्री नरहरी झिरवाळांच्या राजीनाम्याची मागणी
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन सुरू केले असून मंत्री नरहरी झिरवाळांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.
24 Feb, 26 10:50 AM
युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदय भानू चिब यांना अटक
दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित एआय इम्पॅक्ट समिट दरम्यान शर्टलेस निषेध केल्या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज भारतीय युवा काँग्रेसचे प्रमुख उदय भानू चिब यांना अटक केली. उदय भानू यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर टिळक मार्ग पोलिस ठाण्याबाहेर कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.
24 Feb, 26 10:21 AM
राष्ट्रवादीकडून पार्थ पवार राज्यसभेवर जाणार?
राज्यसभेच्या ७ जागांसाठी १६ मार्चला निवडणूक होणार आहे. त्यात महायुती ६ आणि मविआ १ जागा जिंकण्याची शक्यता आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिवंगत अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे. पक्षाच्या कोअर कमिटीत पार्थ पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची बातमी सूत्रांच्या हवाल्याने माध्यामांनी दिली आहे.
24 Feb, 26 10:06 AM
सांगलीत काँग्रेस एकसंघ राहणार, सतेज पाटलांना विश्वास
सांगलीत काँग्रेस एकसंघ राहणार आहे. विशाल पाटील आणि विश्वजीत कदम एकसंघ राहतील हा मला विश्वास आहे, असे आमदार सतेज पाटील म्हणाले. दरम्यान, कांदा प्रश्नावर बोलताना पाटील म्हणाले, सरकारचे शेतकऱ्यांकडे लक्ष आहे का? सरकार शेतकऱ्यांबाबत सकारात्मक नाही, असंही पाटील म्हणाले.
24 Feb, 26 09:55 AM
गडचिरोलीत प्रस्तावित इथेनॉल प्रकल्पाची जनसुनावणी स्थगित
गडचिरोली : येथील एमआयडीसी परिसरात 'मेसर्स एलटीबी बेव्हरेजेस' तर्फे प्रस्तावित असलेल्या इथेनॉल निर्मिती प्रकल्पाची ९ मार्च रोजी होणारी पर्यावरण जनसुनावणी तूर्तास स्थगित करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्त्यांचा तीव्र आक्षेप आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने हा निर्णय घेतला आहे.
24 Feb, 26 09:30 AM
राज्यसभेसाठी भाजपा कुणाला देणार संधी?
राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या कोअर कमिटीची आज महत्त्वाची बैठक, भाजपाकडून ४ उमेदवार रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता, रामदास आठवलेंना पुन्हा मिळणार संधी? विनोद तावडे, विजया रहाटकर आणि धैर्यशील पाटलांच्याही नावाची चर्चा
24 Feb, 26 09:26 AM
माजी नगरसेवक, नेत्यांच्या निकटचे होणार 'स्वीकृत
मुंबई : स्वीकृत नगरसेवकांच्या नावाची घोषणा बुधवारी पालिका सभागृहात होणाऱ्या महासभेत करण्यात येणार आहे. भाजप, शिंदेसेना, काँग्रेसच्या चार माजी नगरसेवकांचा यात समावेश असून भाजपकडून माजी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा, विधानपरिषद सदस्य राजहंस सिंह यांचा मुलगा नितेश सिंह, शिंदेसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज, आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय साईनाथ दुर्गे, आमदार अस्लम शेख यांचे निकटवर्तीय वीरेंद्र चौधरी यांची वर्णी लागणार असल्याचे समजते. मंगळवारी स्वीकृत नगरसेवकांच्या नावाचे अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आहे. (अधिक वाचा)
24 Feb, 26 09:24 AM
बापानेच पोटच्या दोन अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायात ढकललं
नवी मुंबईच्या कोपरखैरणे परिसरात रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका व्यक्तीने आपल्या पोटच्या दोन अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायात ढकललं आहे. एका दलालामार्फत तो आपल्या मुलींना वेगवेगळ्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत होता. या प्रकरणी पोलिसांनी छापेमारी करत दोन्ही मुलींची सुटका केली आहे. पोलिसांनी आरोपी दलालाला अटक केली आहे. आरोपी पित्याचा शोध घेतला जात आहे.
24 Feb, 26 09:21 AM
बारामती विमान दुर्घटनेनंतर आणखी एक अपघात
रांची - झारखंड येथील चतरा येथे सोमवारी संध्याकाळी एअर अॅम्ब्युलन्स दुर्घटनेत डॉक्टर, रुग्णासह सर्व ७ जणांचा मृत्यू झाला आहे. या एअर अॅम्ब्युलन्समधून रांचीहून रुग्णाला दिल्ली नेण्यात येत होते. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जाते. विमान वाहतूक नियामक डीजीसीएने विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) ला रांचीतील अपघाताची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. (अधिक वाचा)
24 Feb, 26 09:20 AM
पुण्यात कात्रज घाटात भीषण अपघात!
पुण्यातील कात्रज घाटात आज पहाटेच्या सुमारास एक थरारक अपघात घडला. लोखंडी पाईप आणि सळ्या वाहून नेणाऱ्या ट्रकने एका बसला मागून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत ट्रकचा पुढचा भाग पूर्णपणे चिरडला गेला असून, ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे. तर क्लीनर लोखंडी सळ्यांच्या ढिगाऱ्यात आणि केबिनमध्ये अडकल्याने त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
24 Feb, 26 09:19 AM
भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा!
मुंबई - भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज महाराष्ट्रभाजपा प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली. या प्रदेश कार्यकारिणीत अनेक नव्या चेहऱ्यांना राज्य पातळीवर काम करण्याची संधी दिली आहे. त्याशिवाय आमदार गोपीचंद पडळकर, कृष्णराज महाडिक यांच्यावर पक्षाने नवी जबाबदारी टाकली आहे. केशव उपाध्ये यांनाही कार्यकारिणीत बढती दिली असून यापुढे भाजपाच्या मुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी नवनाथ बन यांच्यावर टाकण्यात आली आहे. रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत आज प्रदेश कार्यकारणीतील नावांची घोषणा केली. (अधिक वाचा)
24 Feb, 26 09:18 AM
लातुरात दुकान फाेडले; अडीच लाख पळविले !
लातूर : शहरातील नवीन रेणापूर नाका ते जुना रेणापूर नाक्यादरम्यान असलेल्या पादत्राणांच्या एका नामांकित दुकानात धाडसी चोरी झाल्याची घटना साेमवारी सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून काउंटरमध्ये ठेवलेली २ लाख ५० हजारांची रोकड पळवली आहे. याबाबत शिवाजी नगर पोलिस ठाण्यात साेमवारी अज्ञात चाेरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
24 Feb, 26 09:08 AM
कोळगाव शिवारात भीषण अपघात; चार जागीच ठार
श्रीगोंदा (जिल्हा अहिल्यानगर ) : अहिल्यानगर ते दौड या राष्ट्रीय महामार्गावर कोळगाव शिवारातील माऊली मंदीराजवळ मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ट्रक आणि इको कार यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.