बारामती विमान दुर्घटनेनंतर आणखी एक अपघात; रांचीतील एअर अॅम्ब्युलन्स क्रॅशमध्ये ७ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 07:37 IST2026-02-24T07:33:16+5:302026-02-24T07:37:06+5:30
विमानाचा संपर्क तुटल्यानंतर रात्री ८.०५ वाजता तातडीने बचाव समन्वय केंद्राला सक्रीय करण्यात आले आणि या विमानाचा शोध सुरू केला

बारामती विमान दुर्घटनेनंतर आणखी एक अपघात; रांचीतील एअर अॅम्ब्युलन्स क्रॅशमध्ये ७ जणांचा मृत्यू
रांची - झारखंड येथील चतरा येथे सोमवारी संध्याकाळी एअर अॅम्ब्युलन्स दुर्घटनेत डॉक्टर, रुग्णासह सर्व ७ जणांचा मृत्यू झाला आहे. या एअर अॅम्ब्युलन्समधून रांचीहून रुग्णाला दिल्ली नेण्यात येत होते. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जाते. विमान वाहतूक नियामक डीजीसीएने विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) ला रांचीतील अपघाताची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
३० दिवसांत दुसरा अपघात
एका महिन्यात २ चार्टर्ड प्लेन अपघातामुळे विमान वाहतुकीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. २८ जानेवारीला पुण्यातील बारामती येथे अजित पवार यांचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले होते. त्यात अजित पवारांसह ५ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर २३ फेब्रुवारीला सोमवारी रांची येथे ही भीषण दुर्घटना घडली. रांचीच्या देवकमल हॉस्पिटलचे सीईओ अनंत सिन्हा म्हणाले की, रुग्णाच्या कुटुंबाने आधुनिक उपचारासाठी रुग्णाला दिल्लीला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. एअर अॅम्ब्युलन्सने रांची विमानतळावरून संध्याकाळी ७.१० वाजता त्यांनी उड्डाण घेतले. त्यानंतर ७.३४ वाजता विमानाचा संपर्क तुटला. या विमानाचा शेवटचा संपर्क कोलकाता एअर कंट्रोलशी झाला होता. विमानाचा रडार संपर्क वाराणसीच्या दक्षिण पूर्वेकडील १०० एनएम अंतरावर तुटला होता. वाराणसी एअर ट्रॅफिक कंटोलनुसार या विमानाने त्यांच्याशी संपर्क केला नव्हता.
विमानाचा संपर्क तुटल्यानंतर रात्री ८.०५ वाजता तातडीने बचाव समन्वय केंद्राला सक्रीय करण्यात आले आणि या विमानाचा शोध सुरू केला. त्यातच सिमरिया भागात गावकऱ्यांनी एक विमान पडल्याची सूचना पोलीस प्रशासनाला दिली. त्यानंतर विमानाचे अवशेष खासियातु करम तांडच्या घनदाट जंगलात सापडले. लतेहार जिल्ह्यातील रहिवासी असलेले संजय कुमार या रुग्णाला घेऊन विमान दिल्लीला निघाले होते. १६ फेब्रुवारीला ६५ टक्के भाजल्याने त्यांच्यावर रांचीतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते परंतु आधुनिक उपचारासाठी कुटुंबाने त्यांना दिल्लीला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. सोमवारी एअर अॅम्ब्युलन्सची व्यवस्था झाल्यानंतर सातच्या सुमारास या विमानाने दिल्लीसाठी उड्डाण घेतले.
#WATCH | Chatra, Jharkhand | On air ambulance crash in Simariya block, SP Sumit Kumar Agarwal says, "We got information around 10 that an accident has happened... Getting here was difficult considering the terrain... The Delhi team will come here for investigation and try to… https://t.co/YOYVIHUfhfpic.twitter.com/SE5bvZCVIp
— ANI (@ANI) February 24, 2026
DGCA ने जारी केले निवेदन
दरम्यान, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या अपघाताबाबत निवेदन जारी केले आहे. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी रेडबर्ड एअरवेज प्रायव्हेट लिमिटेडचे Beechcraft C90 b विमान VT-AJV हे रांचीहून दिल्लीला एअर अॅम्ब्युलन्स प्रवास करत होते. झारखंडमधील चतरा जिल्ह्यातील कसरिया गावात येथे विमान कोसळले. या विमानात एकूण सात जण होते, ज्यात दोन क्रू मेंबर्स होते. विमानाने संध्याकाळी ७:११ वाजता रांचीहून उड्डाण केले आणि कोलकात्याशी संपर्क साधला. मात्र संध्याकाळी ७:३४ वाजता वाराणसीच्या दक्षिण पूर्वेपासून सुमारे १०० नॉटिकल मैल अंतरावर विमानाचा कोलकात्याशी संपर्क तुटला. दुर्घटनेची माहिती मिळताच चतरा जिल्हा प्रशासनाने शोध आणि बचाव कार्य हाती घेतले. या अपघाताची चौकशी करण्यासाठी AAIB ची एक पथकही पाठवण्यात आले आहे असं त्यांनी सांगितले.