Latest Marathi News LIVE Updates:मुंबईत पोलीस महासंचालक कार्यालय परिसरात कर्मचाऱ्याचा मृत्यू
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 19:35 IST2026-04-01T09:58:49+5:302026-04-01T19:35:11+5:30
Todays Maharashtra Breaking News Live Updates in Marathi: अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धातील नवे दावे-प्रतिदावे, नव्या आर्थिक वर्षांत होणारे काही ...

Latest Marathi News LIVE Updates:मुंबईत पोलीस महासंचालक कार्यालय परिसरात कर्मचाऱ्याचा मृत्यू
Todays Maharashtra Breaking News Live Updates in Marathi: अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धातील नवे दावे-प्रतिदावे, नव्या आर्थिक वर्षांत होणारे काही ठळक बदल, अशोक खरात याच्या कारनाम्यांचा तपास, पाच राज्यांतील निवडणुकांमधील आरोप-प्रत्यारोप, आयपीएलमधील नवे रेकॉर्ड या आणि अशा महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...
LIVE
01 Apr, 26 : 09:46 PM
आंबा-काजू बागायतदारांना दिलासा मिळणार? मदत वाढवण्याच्या हालचालींना वेग
कोकणातील आंबा आणि काजू उत्पादकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्य सरकारने नुकतीच नुकसानभरपाई जाहीर केली होती, मात्र ती अत्यंत तुटपुंजी असल्याची भावना बागायतदारांमध्ये व्यक्त होत होती.
01 Apr, 26 : 08:15 PM
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवर प्रश्नचिन्ह; आयुक्तांडे याचिका
सातारा : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद निवड प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांनी चुकीच्या पध्दतीने राबविली आहे, ती रद्द करुन नव्याने घेण्यात यावी, अशी याचिका राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार) आणि शिंदेसेनेच्या सदस्यांनी पुणे विभागीय आयुक्तांकडे दाखल केली आहे. यामध्ये विविध मुद्यांचाही समावेश आहे. यामुळे अध्यक्ष निवड प्रक्रिया पुन्हा राबविली जाणार का ? याविषयी चर्चा सुरू झाली आहे.
01 Apr, 26 : 08:02 PM
जालना : पुन्हा गारपीट, शेतकऱ्यांचे रब्बी पिकांचे नुकसान
हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज जालना जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसासोबत गारपीट झाली आहे. यामुळे शेतकरी संपूर्ण संकटात सापडले आहेत. भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ आणि आडगाव शिवारात ही गारपीट नोंदवण्यात आली आहे.
01 Apr, 26 : 07:34 PM
मुंबईत पोलीस महासंचालक कार्यालय परिसरात कर्मचाऱ्याचा मृत्यू
एक दुर्दैवी घटना मुंबईत घडली आहे. पोलीस महासंचालक कार्यालय परिसरात झाडाची फांदी अंगावर पडून एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. बुधवारी ही घटना घडली. अनिल गोरे असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून, ते पीडब्ल्यूडी विभागात सेवेत होते. झाडाची फांदी अंगावर पडल्यानंतर जखमी झालेल्या गोरे यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
01 Apr, 26 : 06:42 PM
नवी मुंबईत जागतिक दर्जाचे स्टेडियम उभारण्याचे नियोजन – आशिष शेलार
नवी मुंबईत जागतिक दर्जाचे आधुनिक स्टेडियम उभारण्यासाठी आवश्यक नियोजन तातडीने पूर्ण करून स्टेडियमसाठी योग्य जागेची निवड करताना कनेक्टिव्हिटी, वाहतूक व्यवस्था, पार्किंग सुविधा आणि आवश्यक पायाभूत सुविधांचा विचार करावा असे निर्देश सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिले. नवी मुंबई येथे जागतिक दर्जाचे स्टेडियम उभारण्यासंदर्भात मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आली.
01 Apr, 26 : 06:27 PM
"अशोक खरातची नार्को टेस्ट करा"
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण अत्यंत गंभीर असून या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन चौकशी केली तरच यातील अनेकांचे खरे चेहरे उघडे पडतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीच्या नावाखाली मलमपट्टी न करता अशोक खरातची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. वाचा सविस्तर
01 Apr, 26 : 06:26 PM
सांगली वाळवा तालुक्यात वादळी वारे आणि विजेच्या गडगडासह अवकाळी पावसाची हजेरी
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात आज अचानक वादळी वारे आणि विजेच्या गडगडासह अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे शेतकरी आणि नागरिक चिंतेत आहेत.वाऱ्यामुळे झाडं आणि झोपडपट्ट्यांना हळूहळू फटका बसला आहे, तर काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.
01 Apr, 26 : 06:01 PM
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ होणार, कॅबिनेटचा निर्णय
राज्यातील हजारो दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ होणार आहे. यामुळे आठवी ते बारावीच्या दिव्यांग विद्यार्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. बारा वर्षानंतर शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.
01 Apr, 26 : 05:53 PM
यूएईमध्ये ड्रोन हल्ल्यात एक भारतीय जखमी
एअर डिफेन्स सिस्टीमने हवेत निष्क्रिय केलेले ड्रोन कोसळल्याने एक भारतीय जखमी झाल्याची घटना संयुक्त अरब अमिरातीमध्ये घडली आहे. उम अल क्वैनमधील उम अल थूब औद्योगिक वसाहतीत ही घटना घडली.
01 Apr, 26 : 04:46 PM
'हे शेवटचं युद्ध असेल, असे सांगू शकत नाही', इस्रायलच्या मंत्र्याचे विधान
इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गिडोन सार यांनी इराणसोबत सुरू असलेल्या युद्धाच्या काळात एक मोठं विधान केले. ते म्हणाले की, "इस्रायलचे शत्रू अजूनही त्यांच्यावर हल्ला करू शकत असले, तरी ते आता आमच्या अस्तित्वासाठी धोकादायक राहिलेले नाहीत."
सार पुढे म्हणाले की, "आम्हाला भविष्यातही शत्रूच्या कट-कारस्थानांपासून सावध राहण्याची गरज असेल. आम्ही असे ठामपणे सांगू शकत नाही की, 'शेवटचे युद्ध' असेल", असे विधान सार यांनी केले.
01 Apr, 26 : 03:31 PM
संकटातून बाहेर पडण्यासाठी महिला भोंदू अशोक खरातच्या जाळ्यात
भोंदू अशोक खरातचे काळे कारनामे समोर आल्यावर तांत्रिक तसेच भोंदूबाबांकडून झालेल्या फसवणुकीची चर्चा रंगली असून दैवी शक्ती, कोपाची भीती दाखवून अब्रूवर घाला घालणं, आर्थिक पिळवणूक करणं यासारखे प्रकार भोंदूबाबांकडून होत असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. गुप्तधन मिळेल, आयुष्यात प्रगती होईल किंवा अपत्यप्राप्ती होईल, आर्थिक अडचणीतून बाहेर याल, पतीला नोकरी लागेल, मनासारखा पती मिळेल हे प्रश्न घेऊन भोंदू अशोक खराकडे जाणाऱ्या महिलांची संख्या ८० टक्के होती असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. वाचा सविस्तर
01 Apr, 26 : 12:44 PM
अशोक खरातच्या गुन्ह्यांतून होणार प्रॉपर्टी रॅकेटचा उलगडा
भोंदू अशोक खरात प्रकरणात त्याने केलेल्या लैंगिक अत्याचाराचे पुरेसे पुरावे 'एसआयटी' ने एकत्र केले असून, आता पुढच्या टप्प्यात खरातच्या आर्थिक नाड्या आवळण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. यातून खरातचे निर्माण केलेले प्रॉपर्टी रॅकेट देखील तपासले जाणार आहे. १५०० ते २००० कोटींची माया खरातने कशी जमविली? याचा उलगडा होणार असल्याने काही राजकीय मंडळी, शासनातील उच्चपदस्थ अधिकारी, बडे व्यावसायिक, तसेच काही विकासक चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर
01 Apr, 26 : 12:07 PM
विमान प्रवास महागणार
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता थेट सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर होणार आहे. सरकारी तेल कंपन्यांनी एप्रिल महिन्यासाठी एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (ATF) अर्थात विमान इंधनाच्या नव्या दरांची घोषणा केली असून, त्यात तब्बल ११५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. भारतीय विमान वाहतूक क्षेत्राच्या इतिहासात पहिल्यांदाच जेट इंधनाचा दर प्रति किलोलीटर ₹२ लाखांच्या पुढे गेला आहे.
01 Apr, 26 : 11:58 AM
"शीतला मंदिरातील मृत्यूला सरकारच जबाबदार"
नालंदा येथील शीतला मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत ८ भाविकांचा मृत्यू झाला आहे. यावरून बिहार काँग्रेसने राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. "या मृत्यूंसाठी राज्य सरकारच पूर्णपणे जबाबदार आहे" अशी संतप्त प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष राजेश राम यांनी दिली. वाचा सविस्तर
01 Apr, 26 : 11:44 AM
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवार जाहीर

01 Apr, 26 : 11:11 AM
एसी लोकल दरवाजे लागत नसल्याने हा खोळंबा
एसी फास्ट लोकल डोंबिवली स्थानकात सुमारे वीस मिनिटे अडकली होती. एसी लोकल दरवाजे लागत नसल्याने हा खोळंबा झाला
01 Apr, 26 : 10:24 AM
वारणावती कॉलनीत अवाढव्य अजगराचे दर्शन; रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कुशीत वसलेल्या वारणावती कॉलनी परिसरात सध्या वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विशेषतः गेल्या काही दिवसांपासून या भागात अजगरांचे जणू साम्राज्यच निर्माण झाले असून, वारंवार होणाऱ्या दर्शनामुळे स्थानिक नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. सोमवारी सायंकाळी वारणावती कॉलनी परिसरात एका अवाढव्य अजगराचे दर्शन झाले. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेलगत ही कॉलनी असल्याने येथे नेहमीच वन्यजीवांची वर्दळ असते. मात्र, गेल्या वर्षभरात या भागात अजगर, गवे आणि बिबट्यांचे येण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. वनविभागाने गेल्या वर्षभरात या परिसरातून चार ते पाच वेळा मोठ्या अजगरांना सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले आहे.
01 Apr, 26 : 10:23 AM
गावातील महाराजा कडून पपई विक्रीच्या वादातून शेतकऱ्याला बेदम मारहाण
कन्नड तालुक्यातील जेऊर गावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पपई विक्रीच्या वादातून एका शेतकऱ्याला कथितपणे मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. बबनराव पवार असे जखमी शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्यावर महाराज आणि त्यांच्या बाऊन्सर्सकडून हल्ला झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेत पवार गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणी संबंधितांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. नेमका वाद कशामुळे झाला, यामागे आणखी कोणते कारण आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.
01 Apr, 26 : 10:23 AM
सुषमा अंधारेंचे आरोप धादांत खोटे; तक्रार असल्यास मुख्यमंत्र्यांकडे पुरावे द्यावेत
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एका कथित आर्थिक व्यवहारावरून आणि फ्लॅट भेट दिल्याप्रकरणी केलेल्या आरोपांचा थेट प्रत्युत्तर माजी आमदार दीपक साळुंखे यांनी केले आहे. त्यांना फ्लॅट गिफ्ट केल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी अंधारे यांचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. राज्यात सध्या गारपीट आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कांदा, डाळींब आणि केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. अशा कठीण काळात टीव्हीवर येऊन कुणावरही आरोप करण्यापेक्षा बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचे काम करावे, असा टोलाही त्यांनी अंधारे यांना लगावला आहे.
01 Apr, 26 : 10:20 AM
रोहित पवार यांच्या ट्विटनंतर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंची तीव्र प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांच्या ट्विटनंतर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. तृप्ती देसाई म्हणाल्या की, “रोहित पवार यांनी केलेले ट्विट अतिशय गंभीर स्वरूपाचे आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोटोला कुणी चप्पल मारली किंवा काही आघोरी प्रकार, काळी जादू केली का, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.” त्या पुढे म्हणाल्या, “अजित पवार आणि शरद पवार यांना एकत्र येऊ नये म्हणून कुणी जाणीवपूर्वक असे कृत्य केले का, किंवा दोघांमध्ये वाद निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे का, याचाही तपास व्हायला हवा. तसेच अजित पवार यांना लक्ष्य करण्यासाठी काही काळी जादू किंवा अन्य प्रकार करण्यात आले का, याचीही चौकशी करावी,” अशी मागणी त्यांनी केली. या विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.
01 Apr, 26 : 10:16 AM
रेल्वे तिकीट रिफंड नियम
रेल्वे तिकीट रद्द करण्याच्या नियमात मोठा बदल करण्यात आला आहे. आता रेल्वे सुटण्यापूर्वी ८ तासांच्या आत तिकीट रद्द केल्यास एकही रुपया रिफंड मिळणार नाही, ही मर्यादा आधी ४ तास होती. ८ ते २४ तास आधी रद्द केल्यास ५० टक्के रक्कम परत मिळेल. याशिवाय, २४ ते ७२ तास आधी रद्द केल्यास २५ टक्के रक्कम कपात केली जाईल. ७२ तासांपूर्वी रद्द केल्यावरच जास्तीत जास्त परतावा मिळू शकेल. महत्वाचे म्हणजे, अशा स्थितीतही पूर्ण परतावा मिळणार नाही.
01 Apr, 26 : 10:15 AM
आजपासून ४ नवे लेबर कोड
वेतन संहिता, सामाजिक सुरक्षा संहिता, औद्योगिक संबंध संहिता आणि व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या परिस्थितीची संहिता. या चार कोडमुळे आधीचे 44 वेगवेगळे कामगार कायदे एकत्र करून सोपे आणि पारदर्शक कायदे तयार करण्यात आले आहेत. नवीन लेबर कोडअंतर्गत, कामाच्या तासांत काहीही बदल करण्यात आलेला नाही. ते रोज ८ तास आणि साप्ताहिक ४८ तास राहतील. नियोक्ता आता कर्मचाऱ्यांना फ्लेक्सिबल वर्किंग कल्चर देऊ शकतील. साप्ताहिक कामाच्या तासांच्या व्यवस्थापनाच्या आधारावर अतिरिक्त ओव्हरटाइमचे पर्यायही उपलब्ध असतील. महत्वाचे म्हणजे, नव्या नियमांनुसार महिलांना अधिक संधी देण्यात आल्या आहेत. सुरक्षिततेसह रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करण्याची परवानगी आणि समान कामासाठी समान वेतन द्यावे लागणार आहे. याशिवाय, ४० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या कामगारांना मोफत वार्षिक आरोग्य तपासणीचा अधिकार देण्यात आला आहे.
01 Apr, 26 : 10:12 AM
करासंदर्भातील नियमांतील बदल
आज म्हणजेच १ एप्रिलपासून जुना १९६१ चा प्राप्तिकर कायदा इतिहासजमा होत आहे. आता त्याजागी 'इन्कम टॅक्स ॲक्ट २०२५' लागू होईल. नव्या कायद्यात 'असेसमेंट इयर' आणि 'फायनान्शियल' इयर ऐवजी आता 'टॅक्स इयर' हा सुटसुटीत शब्द वापरला जाईल. नव्या टॅक्स रिजीममध्ये आता १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही.
याशिवाय, टीडीएससाठी फॉर्म १६ आणि १६ ए ऐवजी आता फॉर्म १३० आणि १३१ चा वापर करावा लागेल. तसेच, पॅन कार्ड बनवण्यासाठी आता केवळ आधार पुरेसे नसून, १० वीची गुणपत्रिका किंवा पासपोर्ट अनिवार्य असेल.
01 Apr, 26 : 10:12 AM
फास्टॅगही महागणार!
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) फास्टॅग वार्षिक पासची किंमत वाढवली आहे. आता त्याची किंमत ₹३,००० ऐवजी ₹३,०७५ असेल. हा वार्षिक पास अव्यावसायिक वाहनांसाठी असेल, त्याचा वापर अंदाजे १,१५० टोल प्लाझांवर करता येतो.
01 Apr, 26 : 10:11 AM
LPG मोठी दरवाढ
एलपीजीच्या दरातही वाढ झाली आहे. यानुसार, १९ किलोचा व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर आजपासून महाग होत आहे. दिल्लीमध्ये १९ किलोच्या सिलिंडरची किंमत १९५.५० रुपयांनी, तर कोलकातामध्ये २१८ रुपयांनी वाढली असून, ही दरवाढ १ एप्रिलपासून लागू करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये १९ किलोच्या सिलिंडरची अंतिम किंमत २०७८.५० रुपये असेल, तर ५ किलोच्या FTL सिलिंडरची किंमत ५४९ रुपये (रिफिलसाठी) असेल.
01 Apr, 26 : 10:10 AM
बँकिंग क्षेत्रात काय बदल होणार?
आता, एटीएमवर मर्यादित मोफत व्यवहार करता येतील, त्यानंतर शुल्क आकारले जाईल. उदाहरणार्थ, एचडीएफसी बँकेच्या एटीएममधून पाच मोफत व्यवहार केल्यानंतर, यूपीआयद्वारे रोख रक्कम काढण्यासाठी प्रति व्यवहार ₹२३ शुल्क आकारले जाईल.
01 Apr, 26 : 10:09 AM
आजपासून बरंच काही बदलणार, तुमच्या खिशावर थेट परिणाम होणार...!
आजपासून अर्थात १ एप्रिलपासून, नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होत आहे. दरवर्षीच एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला काही नवे आणि महत्त्वाचे आर्थिक बदल होत असतात अथवा नवे नियम लागू होत असतात. या वेळीही नवीन आर्थिक वर्षासोबत काही बदल होत आहेत. यांत सॅलरी, बँकिंग एलपीजी आणि रेल्वेशी संबंधित काही महत्वाच्या नियमांचा समावेश आहे.
01 Apr, 26 : 10:07 AM
ज्याची भीती, तेच झाले! LPG सिलिंडरचे दर वाढले
अमेरिका इस्रायल इराण युद्धामुळे देशात आधीच इंधन पुरवठ्याबाबत संभ्रमाची स्थिती असताना, एलपीजी गॅस सिलिंडरचे दर वाढले आहेत. १ एप्रिल २०२६ पासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. देशभरातील अनेक ठिकाणी गॅससाठी लोक रांगा लावताना दिसत आहेत. गॅस बुक करून अनेक दिवस उलटल्यानंतरही सिलिंडर मिळत नसल्याच्या तक्रारींमध्ये वाढ होताना दिसत आहे. व्यासायिक एलपीजी सिलिंडरचा पूर्ण क्षमतेने पुरवठा होत नाही. यातच आता ही दरवाढ लागू करण्यात आली आहे.