भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी राज ठाकरे, उद्धव ठाकरेंविरोधात दंड थोपटताना महाराष्ट्र कोणाच्या भाकरी खातो, असा विधान केले. "आपल्या घरात कुत्राही वाघ असतो. महाराष्ट्राबाहेर चला. तुम्ही जर बॉस आहात, तर बिहारला चला. उत्तर प्रदेशला चला, तामिळनाडूला चला. तुम्हाला आपटून आपटून मारू", असे खासदार निशिकांत दुबे म्हणाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
एएनआय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये निशिकांत दुबे यांनी हिंदी भाषिकांना होत असलेल्या मारहाणीवर भाष्य केले. त्यांनी राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना माहीममध्ये जाऊन उर्दू भाषिकांना मारून दाखवा, असे आव्हानही दिले.
तुम्ही आमच्या पैशांवर जगत आहात -निशिकांत दुबे
"तुम्ही काय म्हणत आहात की, मराठी बोलावं लागले? तुम्ही कोणाची भाकरी खात आहात? तिथे टाटा आहे, बिर्ला आहे, रिलायन्स आहे. कोणाचेही महाराष्ट्रात प्रकल्प नाहीये. टाटाने तर पहिला कारखाना बिहारमध्ये बनवला. तुम्ही आमच्या पैशांवर जगत आहात? तुम्ही कोणता कर भरत आहात? तुमच्याकडे कोणता उद्योग आहे?", अशी टीका खासदार निशिकांत दुबे यांनी केली.
"खाणी आमच्याकडे आहेत. झारखंडकडे आहेत. मध्य प्रदेशकडे आहेत. छत्तीसगडकडे आहेत. ओडिशाकडे आहेत. तुमच्याकडे कोणत्या खाणी आहेत? रिलायन्सनेही रिफायनरी गुजरातमध्ये सुरू केली आहे. सर्व उद्योग मग सेमी कंडक्टरचा उद्योगही गुजरातकडे येत आहेत", असे निशिकांत दुबे मराठी विरुद्ध हिंदी वादावर बोलताना म्हणाले.
महाराष्ट्राबाहेर चला, तुम्हाला आपटून आपटून मारू
"तुम्ही हुकुमशाही करत आहात. वर आमचे शोषण करून कर भरता. जर तुमच्यात हिंमत आहे, तुम्ही हिंदी भाषिकांना मारत आहात, तर उर्दू भाषिकांनाही मारा. तामिळी लोकांना मारा. तुम्ही जी ही नीच कृत्य करत आहात. मी म्हटले आहे की, तुम्ही जर बॉस आहात, तर चला बिहारला. चला उत्तर प्रदेशला. तामिळनाडूला चला. तुम्हाला आपटून आपटून मारू. ही अराजकता चालणार नाही", असे आव्हान भाजपचे खासदार निशिकांत दुबेंनी दिले.
दुबे म्हणाले, आम्हाला मराठीबद्दल आदर
"आम्ही मराठीचा सन्मान करतो. मराठी आदरणीय भाषा आहे. आम्ही छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, तात्या टोपेंपासून सर्व पेशव्यांचा सन्मान करतो. लोकमान्य टिळक असो, लजपतराय, गोपाळकृष्ण गोखले सगळ्यांनी स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिले आहे. आम्ही सर्व मराठी स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करतो", असे निशिकांत दुबे म्हणाले.
...तर म्हणू की खरंच बाळासाहेबांचे वारसदार आहे
"आज मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे आणि हे उद्धव ठाकरे व राज ठाकरे जे करत आहेत, त्यापेक्षा नीच काम काहीही असू शकत नाही. आम्ही याचा विरोध करतो. जर त्यांच्या हिंमत असेल, तर त्यांनी बाजूलाच असलेल्या माहीम भागात जावे, माहीम दर्ग्याबाहेर कोणत्याही हिंदी भाषिक, उर्दू भाषिकाला मारून दाखवावं. मग मी म्हणेल की, ते खरंच बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार आहेत आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर चालत आहेत", अशा शब्दात निशिकांत दुबेंनी ठाकरे बंधूंवर हल्ला चढवला.