"महाराष्ट्र पुरोगामी हे थोतांड, हे तर प्रचंड...'; फुले, शाहू, आंबेडकर यांचं नाव घेत गोपीचंद पडळकर स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 10:35 IST2024-12-25T10:35:14+5:302024-12-25T10:35:42+5:30
"'अपने तो अपने होते है, पराये अपने नहीं होते', हे ध्यानात ठेवा. माझी सारखी कशाला परीक्षा बघताय? बघू नका. माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे."

"महाराष्ट्र पुरोगामी हे थोतांड, हे तर प्रचंड...'; फुले, शाहू, आंबेडकर यांचं नाव घेत गोपीचंद पडळकर स्पष्टच बोलले
लोक म्हणतात, महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, हे सर्व थोतांड आहे. हे भाषणात सांगायपुरतेच आहे. महाराष्ट्र हे फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांवर चालतो, हे केवळ भाषणापुरतेच आहे. प्रचंड जातीयवादी हे राज्य आहे, हे पहिले डोक्यात फिट करून ठेवा. असे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे. तसेच, आपण मुख्यमत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे पूर्ण वेळ पाठपुरावा करून आपल्या भागासाठी सर्वच विभागांचा जास्तीत जास्त निधी आणू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी आपल्या मतदारसंघातील जनतेला दिले. ते सांगलीमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.
महाराष्ट्र पुरोगामी राज्य, हे थोतांड -
पडळकर म्हणाले, "मी सीएम आणि डीसीएम यांच्याकडे पूर्ण वेळ पाठपुरावा करून आपल्या भागासाठी सर्व विभागांचा जास्तीत जास्त निधी आणेन. त्यामुळे तुम्ही अजिबात चिंता करू नका, अजिबात काळजी करू नका. इतर कुठल्याही समाजाचे विषय असतील तर मला सांगा. कुठल्याही समाजाचा विषय. हे बघा, लोक म्हणतात की, महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, हे थोतांड आहे सर्व. हे भाषणात सांगायपुरतं आहे.
महाराष्ट्र फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांवर चालतो, फक्त भाषणापुरतं -
पडळकर पुढे म्हणाले, "महाराष्ट्र हे फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांवर चालतो, हे फक्त भाषणापुरतं आहे. प्रचंड जातीयवादी हे राज्य आहे, हे पहिले डोक्यात फिट करून ठेवा. हे आपण बदलू शकत नाही. आपल्याला काम करायचं आहे. जाती-जातीतल्या ज्या भिंती आहेत त्या तोडून सगळ्या लोकांसाठी एकत्रितपणे आपल्याला काम करावं लागणार आहे. गावागावात आपल्याला एकत्रित यावं लागणार आहे, वैचारिकपणे एकत्रित यावं लागणार आहे."
यावेळी "'अपने तो अपने होते है, पराये अपने नहीं होते', हे ध्यानात ठेवा. माझी सारखी कशाला परीक्षा बघताय? बघू नका. माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे. असे झाले तसे झाले, बघितलेच नाही. फोनच उचलला नाही, अरे कुणा कुणाचा उचलू? बाहिरा झालोना मी, फोन कुणा कुणाचा उचलू? किती फोन येत आहेत," असेही पडळकर यावेळी म्हणाले.