Maharashtra Government: Sharad Pawar wants Sanjay Raut to become Chief Minister, | Maharashtra Government: संजय राऊत मुख्यमंत्री व्हावेत, ही शरद पवारांची इच्छा?, पण...
Maharashtra Government: संजय राऊत मुख्यमंत्री व्हावेत, ही शरद पवारांची इच्छा?, पण...

मुंबईः राज्यात लवकरच महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर येणार असून, शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसावं, अशी मागणी शिवसैनिकांनी केली होती. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यांच्या गळ्यातही मुख्यमंत्रिपदाची माळ पडण्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आणखी एक नाव अगत्यानं घेतलं जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मीडिया आणि राजकारण्याच्या केंद्रस्थानी असलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत मुख्यमंत्री होऊ शकतात, अशीही एक शक्यता वर्तवली जात आहे. 

त्याच पार्श्वभूमीवर पत्रकारांनी त्यांना छेडलं असता, त्यांनी मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीच व्हावं, यावर तिन्ही पक्षांचं एकमत आहे. तसेच शिवसैनिकांचीही तीच इच्छा असल्याचं सांगत त्यांनी विषयाला बगल दिली. दरम्यान, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात ‘सिल्व्हर ओक’मध्ये सत्ता स्थापन करण्यासंदर्भात चर्चा झाली असता, मुख्यमंत्री संजय राऊतांना करावं, अशी इच्छा पवारांनी उद्धव ठाकरेंकडे बोलून दाखवल्याची खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत अचानक संजय राऊत यांचं नाव आघाडीवर आलं आहे. संजय राऊत यांनी भाजपाला अंगावर घेत शिवसेनेची भूमिका ठामपणे मांडली होती. भाजपाच्या दबावाला न झुकता संजय राऊतांनी त्यांच्यावर वेळोवेळी निशाणा साधला. त्यामुळेच संजय राऊत यांना बक्षिसाच्या स्वरूपात मुख्यमंत्रिपद मिळण्याची एक अटकळ बांधली जात आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना सत्ता स्थापन करेल, अशी आग्रही भूमिका नेहमीच संजय राऊत मांडत आले आहेत.

शिवसेनेकडे 170 आमदारांचं पाठबळ असल्याचंही त्यांनी वेळोवेळी सांगितलं आहे. मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत शिवसैनिकालाच बसवणार असल्याचंही त्यांनी अनेकदा स्पष्ट केलेलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊतांकडे मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपवली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मुख्यमंत्री हा शिवसेनेचा होणार असून, तेच सरकारचा योग्य चेहरा ठरू शकतात. 5 वर्षांसाठी मुख्यमंत्री सेनेचा असल्यास आम्ही पाठिंबा देणार आहोत, तसेच राज्यातला सत्ता संघर्ष संपलेला असून, दोन दिवसांत राज्यपालांकडे जाऊन सरकार स्थापनेचा दावा करू, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले आहेत.

दरम्यान, आज होणाऱ्या शिवसेना आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे किमान समान कार्यक्रमासंदर्भात आमदारांना कल्पना देणार आहेत. महाविकासआघाडी शनिवार 23 नोव्हेंबरला सत्तास्थापनेचा दावा करणार असल्याची अटकळ बांधली जात आहे. त्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे राजभवनात भेटीची वेळ घेण्यात येईल. येत्या सोमवारी नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होण्याची शक्यता आहे.

Web Title: Maharashtra Government: Sharad Pawar wants Sanjay Raut to become Chief Minister,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.