Maharashtra Government: काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून संमती मिळताच शिवसेनेसोबत सत्तास्थापनेला आला वेग

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 05:13 AM2019-11-15T05:13:36+5:302019-11-15T05:15:42+5:30

राज्यात बिगर भाजपचे सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आले

Maharashtra Government: Congress party came to power with Shiv Sena after getting consent | Maharashtra Government: काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून संमती मिळताच शिवसेनेसोबत सत्तास्थापनेला आला वेग

Maharashtra Government: काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून संमती मिळताच शिवसेनेसोबत सत्तास्थापनेला आला वेग

Next

अतुल कुलकर्णी 
मुंबई : राज्यात बिगर भाजपचे सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आले असून या संयुक्त सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी हिरवा कंदील दाखवला आणि त्यानंतरच राजकीय घडामोडींना वेग आला. सरकार स्थापन करण्यास भाजपने नकार दिल्यानंतर नव्या राजकीय समिकरणांची जुळवासुळव सुरू झाली. शिवसेनेला सोबत घेऊन काँग्रेस आणि राष्टÑवादीने सरकार स्थापन करण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घेतला. त्यासाठी त्यांनी दिल्लीत काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचीही भेट घेतली. या भेटीनंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे आणि के. सी. वेणुगोपाल या नेत्यांना मुंबईला पाठवले. पटेल यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली. दिल्लीबाहेर पडून एखाद्या राज्याचे सरकार बनवण्यासाठी पटेल यांनी दाखवलेली सक्रियता बघता शिवसेनेसोबत जाण्यास काँग्रेस पक्षश्रेष्ठी गंभीर असल्याचे दिसते.
शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रण दिल्यानंतर दोन्ही काँग्रेसच्या समर्थनाचे पत्र देण्याचा विषय आला, त्यावेळी राष्टÑवादीची भूमिकाच ठरलेली नव्हती. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ज्या दिवशी पत्र देण्याचा विषय आला त्यादिवशी सोनिया गांधी यांनी सायंकाळी शरद पवार यांना फोन केला. आपण कसे एकत्र यायचे, त्यासाठी कोणते मुद्दे असतील, अशी विचारणा केली. त्यावर पवार यांनीही याविषयी आधी स्पष्टता गरजेची आहे, नाहीतर नंतर वाद होतील. शिवसेनेशी सगळ्या मुद्यांवर चर्चा पूर्ण करु, नंतर पाठिंबा देऊ असे सांगितले. त्यामुळेच आम्ही पाठिंब्याचे तयार असलेले पत्र थांबवले, असेही चव्हाण यांनी सांगितले.
शिवसेनेला पाठिंबा दिला तर अल्पसंख्याक समाजाची भूमिका काय असेल असा मुद्दा दोन्ही काँग्रेस नेत्यांच्या समोर आला तेव्हा राष्टÑवादीमधील अनेक मुस्लीम नेत्यांनी कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाऊ नका, पण शिवसेना चालेल, असे जाहीर बैठकीत शरद पवार यांना सांगितल्याचे समजते. दिल्लीत नसीम खान यांनी शिवसेनेसोबत जाण्याकरता बाजू मांडल्याचे सूत्रांनी सांगितले. मला शिवसेनेच्या उमेदवारांनी पराभूत केले असले तरीही आपण भाजपचे सरकार येऊ नये यासाठी पूर्ण प्रयत्न केले पाहिजेत, त्यासाठी शिवसेनेसोबत गेलो तरी चालेल, असेही सांगितल्याचे समजते. खा. हुसेन दलवाई यांनीही असे पत्र दिले. त्यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी पाठिंब्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.
>काम करत गेले की, अनुभव येतो
शिवसेनेतर्फे मुख्यमंत्रिपदासाठी ज्यांचे नाव येईल त्यांना या पदाचा अनुभव असेल का? असे विचारले असता पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, त्यांच्या नेत्यांना पक्ष चालवण्याचा अनुभव आहेच. शिवाय प्रशासकीय कामांचा अनुभव हा काम करत गेले की येतोच. फक्त परिश्रम करण्याची इच्छा आणि परस्पर विश्वास ठेवला तरी खूप गोष्टी सोप्या होतात.
>दिल्लीच्या ग्रीन सिग्नलनंतरच...
काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे हे नेते दिल्लीने ग्रीन सिग्नल दिल्यानंतरच उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले होते. ही भेट मातोश्रीवर नको असे या तिघांचे म्हणणे होते. किंबहुना तशा सूचनाही होत्या. ठाकरे यांनीही दोन पावलं पुढे येत बीकेसीमधील एका हॉटेलमध्ये ही भेट घेतली.
>राष्ट्रवादीत दोन गट
राष्ट्रवादीमधला संख्येने कमी असणारा एक गट भाजपसोबत जाण्यासाठी तर दुसरा गट शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होण्यासाठी आग्रही होता. जर आपण भाजपसोबत गेलो तर शरद पवार यांनी या निवडणुकीच्या निमित्ताने जी उंची गाठली त्यालाच धक्का बसेल असे काही ज्येष्ठ नेत्यांनी सांगितले.
>खा. संजय राऊत यांचे इंग्रजी, हिंदी टि्वट
काँग्रेस नेते अहमद पटेल आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाल्याची बातमी येताच अशी भेट झालीच नाही, पण आमचे काँग्रेस आणि राष्टÑवादीसोबत बोलणे चालू आहे, असे टष्ट्वीट संजय राऊत यांनी केले. त्यांनी हे टष्ट्वीट का केले, हे गुलदस्त्यातच आहे.

Web Title: Maharashtra Government: Congress party came to power with Shiv Sena after getting consent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.