Maharashtra Election 2019 : 'Nachya' after Champa, Ajit Pawar criticizes former ministers laxmanrao dhobale | Maharashtra Election 2019 : चंपानंतर 'नाच्या', अजित पवारांकडून माजी मंत्र्यांवर सडकून टीका
Maharashtra Election 2019 : चंपानंतर 'नाच्या', अजित पवारांकडून माजी मंत्र्यांवर सडकून टीका

मंगळवेढा : भाजप सरकारने मागील पाच वर्षात फक्त आश्वासनांची घोषणाबाजी केली. दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी सत्तेचा गैरवापर करीत शेतकरीविरोधी धोरण अवलंबिले, असे म्हणत अजित पवार यांनी भाजपा सरकारवर शेतकरीविरोधी असल्याचा आरोप केला. त्यानंतर, अजित पवारांनीसोलापूरचे माजी पालकंमत्री आणि भाजपा नेते लक्ष्मण ढोबळे यांच्यावरही सडकून टीका केली. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा येथे आयोजित राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत अजित पवार बोलत होते. शेतीच्या उत्पादनात घट झाल्याने शेतकऱ्यांवरील कर्जाचा डोंगर वाढला. त्याच नैराश्येतून राज्यातील 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे राज्यातील 16 हजार आयाबहिनी विधवा झाल्याची खंत पवार यांनी बोलून दाखवली. त्याचवेळी, राष्ट्रवादीचे पूर्वाश्रमीचे नेते आणि सध्याचे भाजपा उमेदवार लक्ष्मण ढोबळे यांच्यावरही सडकून टीका केली. भाजपाचा झेंडा घेऊन नाचतानाचा ढोबळे यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावरुन अजित पवारांनी ढोबळेंना लक्ष्य केलं.  

हलगीच्या तालावर झिंगाट झालेल्या नाच्याच्या शब्दावर विश्वास ठेवू नका. सारखे-सारखे कुंकू बदलणारे तुमच्याशी प्रामाणिक काय राहणार अशी टीका अजित पवार यांनी लक्ष्मणराव ढोबळे यांच्यावर केली. काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना आमदार केले, पालकमंत्री केले, ते उपकार विसरले की काय? आपले वय काय, आपण काय करतो याचेही भान नाही, असा टोलाही ढोबळेंना अजित पवारांनी लगावला. यापूर्वी, अजित पवारांनी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना चंपा म्हणून त्यांची खिल्ली उडवली होती. 
दरम्यान, गेल्या पाच वर्षात सरकारनं शेतकऱ्यांना मातीत घालण्याचे काम केले़ शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी पाकिस्तानमधून साखर, कांदा आयात करण्यात सरकार व्यस्त आहे. कर्जमाफी कशी करायची ते माझ्या काकांना विचारा असा, सल्लाही अजित पवार यांनी भाजप सरकारला दिला.


Web Title: Maharashtra Election 2019 : 'Nachya' after Champa, Ajit Pawar criticizes former ministers laxmanrao dhobale
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.