maharashtra election 2019 BJP Can Get Majority in Maharashtra on Its Own amit shah gives message to shiv sena | Maharashtra Election 2019: अमित शहांचा शिवसेनेला 'इशारा'; निवडणूक पाच दिवसांवर असताना वाढवलं टेन्शन!
Maharashtra Election 2019: अमित शहांचा शिवसेनेला 'इशारा'; निवडणूक पाच दिवसांवर असताना वाढवलं टेन्शन!

नवी दिल्ली: महाराष्ट्रात सत्ता राखल्यानंतर मुख्यमंत्रीपद भाजपाकडेच असेल, असं भाजपाचे अध्यक्ष अमित शहांनी म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीत महायुती दोन तृतीयांश जागा जिंकेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपा स्वबळावर सत्ता स्थापन करू शकते, असंदेखील शहांनी म्हटलं. त्यामुळे निवडणूक पाच दिवसांवर असताना शिवसेनेचं टेन्शन वाढलं आहे.

भाजपाला विधानसभा निवडणुकीत नेमक्या किती जागा मिळतील, याची निश्चित आकडेवारी सध्याच्या घडीला सांगता येणार नाही. मात्र गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपाला जास्त जागा मिळतील, असं शहा यांनी 'न्यूज18 नेटवर्कला' दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. 164 जागा लढवणारी भाजपा बहुमताचा आकडा गाठू शकेल का, या प्रश्नाला ते अशक्य नाही, असं उत्तर शहांनी दिलं. 

'भाजपाचा महाराष्ट्रातील प्रवास अतिशय रंजक आहे. आम्ही 2014 मध्ये स्वतंत्र लढलो आणि राज्यातील क्रमांक एकचा पक्ष ठरलो. त्यानंतर आम्ही शिवसेनेसोबत सरकार स्थापन केलं. कधीकाळी शेती, गुंतवणूक, सहकार, उद्योग क्षेत्रांमध्ये पहिल्या क्रमांकावर असणारा महाराष्ट्र यूपीए सरकारच्या 15 वर्षांच्या काळात पिछाडीवर गेला होता. मात्र अवघ्या 5 वर्षांमध्ये आम्ही जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये राज्याला पहिल्या पाचात आणलं,' असं शहा यांनी म्हटलं. 

2014 मध्ये भाजपा आणि शिवसेनेनं स्वतंत्र निवडणूक लढवली. त्यावेळी भाजपानं 122 जागा जिंकल्या. सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपाला 22 जागा कमी पडल्या. यानंतर भाजपा, शिवसेनेनं पुन्हा युती केली. बाळासाहेब ठाकरेंच्या काळात दोन्ही पक्षांची युती झाली, तेव्हा शिवसेना युतीमधील मोठा भाऊ होता. त्यामुळे शिवसेनेनं विधानसभा निवडणुकीत कायम भाजपापेक्षा जास्त जागा लढवल्या. मात्र तीस वर्षांमध्ये यंदा प्रथमच शिवसेना भाजपापेक्षा कमी जागा लढवत आहे. 


Web Title: maharashtra election 2019 BJP Can Get Majority in Maharashtra on Its Own amit shah gives message to shiv sena
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.