विधिमंडळ परिसरात धक्काबुक्की प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला, दोषींवर होणार अशी कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 15:54 IST2025-07-18T15:53:17+5:302025-07-18T15:54:22+5:30

Maharashtra Assembly Monsoon Session 2025: धक्काबुक्कीची ही घटना लोकशाहीचं मंदिर मानलं जाणाऱ्या विधिमंडळाच्या आवारामध्ये घडल्याने या प्रकरणी विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार याकडे सर्वांच लक्ष लागलं होतं. दरम्यान, आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याबाबत मोठा निर्णय दिला आहे.

Maharashtra Assembly Monsoon Session 2025: The Speaker of the Legislative Assembly has decided to take action against the culprits in the case of a scuffle in the Legislative Assembly premises. | विधिमंडळ परिसरात धक्काबुक्की प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला, दोषींवर होणार अशी कारवाई 

विधिमंडळ परिसरात धक्काबुक्की प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला, दोषींवर होणार अशी कारवाई 

भाजपाचे आमदार गोपिचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये विधिमंडळाच्या आवारामध्ये झालेल्या धक्काबुक्कीमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही घटना लोकशाहीचं मंदिर मानलं जाणाऱ्या विधिमंडळाच्या आवारामध्ये घडल्याने या प्रकरणी विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार याकडे सर्वांच लक्ष लागलं होतं. दरम्यान, आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याबाबत मोठा निर्णय दिला आहे.

विधानसभा अध्यक्षांनी घडलेल्या घटनेसाठी गोपिचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांना खेद व्यक्त करण्याची सूचना दिली. तसेच धक्काबुक्की करणारे जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख आणि गोपिचंद पडळकर यांचे कार्यकर्ते सर्जेराव टकले यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे, असे नार्वेकर यांनी सांगितले. त्याबरोबरच या दोघांविरोधात विशेषाधिकार भंगाची कारवाई करण्यासाठी हे प्रकरण विधानसभेच्या विशेषाधिकार समितीकडे वर्ग करण्याची घोषणाही राहुल नार्वेकर यांनी केली आहे.

आज सभागृहामध्ये बोलताना राहुल नार्वेकर यांनी गुरुवारी विधिमंडळाच्या आवारात घडलेल्या हाणामारीबाबत सविस्तर माहिती देत दोषींवर करण्यात येणाऱ्या कारवाईबाबत सूतोवाच केले.  विधिमंडळाच्या आवारामध्ये, गुरुवारी संध्याकाळी ५.४५ च्या सुमारास दोन अभ्यागतांमध्ये धक्काबुक्की झाली होती. तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना बाजूला केले. दरम्यान, या प्रकरणी करण्यात आलेल्या चौकशीमधून यामधील नितीन देशमुख याने आपण जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता असल्याचे आणि त्यांच्यासोबत विधिमंडळाच्या परिसरात आल्याचे सांगितले. तर सर्जेराव टकले याने आपण गोपिचंद पडळकर यांचा मावस भाऊ असून, त्यांच्यासोबत आल्याची माहिती दिल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले.

तसेच या प्रकरणी या दोन्ही आरोपींसोबत इतर सहा ते सात जणांविरोधात मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहितीही विधानसभा अध्यक्षांनी दिली. या प्रकरणातील दोषींवर फौजदारी कारवाई करण्यात येईल. तसेच दोन्ही आरोपींविरोधात विशेषाधिकार भंगाची कारवाई करण्यासाठी हे प्रकरण विधानसभेच्या विशेषाधिकार समितीकडे वर्ग करण्याची घोषणाही राहुल नार्वेकर यांनी केली आहे. 

Web Title: Maharashtra Assembly Monsoon Session 2025: The Speaker of the Legislative Assembly has decided to take action against the culprits in the case of a scuffle in the Legislative Assembly premises.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.