"मविआ फुटणार… लागलेली घरघर आता अखेरच्या टप्प्यात आलीये", भाजप नेत्याचा ठाकरेंची शिवसेना, काँग्रेसवर बाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 09:22 IST2025-11-28T09:20:47+5:302025-11-28T09:22:29+5:30
Maha Vikas Aghadi: महाविकास आघाडी फुटणार आहे. काँग्रेसला उबाठाची गरज नाही. उबाठाला मुंबई सोडून महाराष्ट्र दिसत नाही, असे भाजप नेत्याने लागलेली घर अखरेच्या टप्प्यात असून, मविआ फुटणार असे विधान केले आहे.

"मविआ फुटणार… लागलेली घरघर आता अखेरच्या टप्प्यात आलीये", भाजप नेत्याचा ठाकरेंची शिवसेना, काँग्रेसवर बाण
Maharashtra Politics: "केवळ सत्तेसाठी एकत्र आलेले तीन पक्ष आथा जाणून आहेत की, अपघाताने आलेली सत्ता गेली. आता मविआचा उपयोग संपला. लागलेली घरघर अखेरच्या टप्प्यात आली आहे. ३ डिसेंबरला मविआचे तकलादू मनोरे कोसळत जातील", असे विधान भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केले आहे. ठाकरेंच्या शिवसेना आणि काँग्रेसमध्ये राज ठाकरे यांच्या मनसेला महाविकास आघाडीत घ्यायचे की नाही, यावरून मतभेद झाले आहेत. त्यावर बोट ठेवत भाजप नेत्याने मविआ फुटणार असे भाकित केले आहे.
मुंबईमध्ये काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. तर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्यात जागावाटपाच्या वाटाघाटी सुरू असल्याची चर्चा आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणुका एकत्रित लढाव्या अशी भूमिका आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत महानगरपालिकांच्या निवडणुकीबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. याच मुद्द्यावरून भाजपचे नेते केशव उपाध्ये यांनी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेवर बाण डागले आहेत.
भाजप नेता म्हणाला, "मविआ फुटणार..."
केशव उपाध्ये यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. ते म्हणाले, "मविआ फुटणार... ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ या संभ्रमाचे ओझे वागवत कशीबशी वाटचाल करणाऱ्या मविआला लागलेली घरघर आता अखेरच्या टप्प्यात आली आहे. ३ डिंसेबरला जसेजसे नगरपालिका निवडणुकीचे निकाल येत जातील तसतसे मविआचे तकलादू मनोरे कोसळत जातील."
आता मविआचा उपयोग संपला
"केवळ सत्तेसाठी एकत्र आलेले हे तीन पक्ष आता जाणून आहेत की अपघाताने आलेली सत्ता गेली, आता मविआचा उपयोग संपला! नगरपालिका निवडणूकीचे निकाल ही त्याची ताजी साक्ष असेल. आरती प्रभू यांचे हे गीत मविआ सारख्या हंगामी संधीसाधूंचा मुखवटा नेमका उतरविते… ‘कुणाच्या खांदयावर कुणाचे ओझे, कशासाठी उतरावे तंबू ठोकून", असे सांगत केशव उपाध्ये यांनी मविआतील तिन्ही पक्षांची खिल्ली उडवली आहे.
"काँग्रेसला उबाठाची गरज नाही, उबाठाला मुंबई सोडून महाराष्ट्र दिसतच नाही, आणि शरद पवार गटाला कुणी गांभीर्याने घेतच नाही", असा टोला उपाध्ये यांनी महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना लगावला आहे.
काँग्रेस-ठाकरेंच्या शिवसेनेत शाब्दिक संघर्ष
बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये ठिणगी पडली. काँग्रेसने वृत्ती सुधरावी म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी काँग्रेसला लक्ष्य केले. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनीही ठाकरेंच्या शिवसेनेवर पलटवार केला. मनसेला सोबत घेण्याची भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेने घेतली. पण, काँग्रेसने मनसेच्या भूमिकांवर बोट ठेवत महाविकास आघाडीत राज ठाकरे नको, असे म्हटले.
काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्या युतीचे संकेत मिळत आहेत. मनसे आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यात जागावाटपाची चर्चाही सुरू झालेली आहे.