बेरोजगारी, महागाई या समस्या CM फडणवीसांनी योग्य पद्धतीने हाताळल्या का? ४२ टक्के जनता म्हणते...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 20:23 IST2025-12-06T20:20:15+5:302025-12-06T20:23:26+5:30
CM Devendra Fadnavis News: बेरोजगारी, महागाई आणि भ्रष्टाचार यावरून विरोधक सातत्याने महायुती सरकारवर टीका करताना पाहायला मिळतात. पण, राज्यातील जनतेला काय वाटते? युवा वर्ग, महिलांच्या अपेक्षा काय आहेत?

बेरोजगारी, महागाई या समस्या CM फडणवीसांनी योग्य पद्धतीने हाताळल्या का? ४२ टक्के जनता म्हणते...
CM Devendra Fadnavis News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. या निमित्ताने विविध स्तरांवर महायुती सरकारच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जात आहे. ध्रुव रिसर्च आणि लोकमत यांनी राज्यव्यापी सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात सरकारला पहिल्या वर्षात जनतेचा सकारात्मक प्रतिसाद असल्याचे आढळून आले. बेरोजगारी, महागाई आणि भ्रष्टाचार यावरून विरोधक सातत्याने महायुती सरकारवर टीका करताना पाहायला मिळतात. परंतु, या मुद्द्यांवर राज्यातील जनतेला काय वाटते, याचा कानोसा ध्रुव रिसर्च आणि लोकमत यांनी घेतला.
ध्रुव रिसर्च आणि लोकमत यांनी राज्यव्यापी सर्वेक्षण केले. ध्रुव रिसर्च ही सर्वेक्षण क्षेत्रातील राष्ट्रीय पातळीवरील नामवंत संस्था असून, निःपक्षपाती सर्वेक्षण करण्याचा संस्थेचा लौकिक आहे. ध्रुव रिसर्च आणि लोकमतने हे सर्वेक्षण केले आहे. २१ ते २९ नोव्हेंबर दरम्यान ९५ विधानसभा मतदारसंघात हे सर्वेक्षण करण्यात आले. विविध स्तरातील ९,८०० जणांना विविध प्रश्न विचारण्यात आले. त्यात ३५ टक्के महिला होत्या. या सर्वेक्षणात सरकारला पहिल्या वर्षात जनतेचा सकारात्मक प्रतिसाद असल्याचे आढळून आले.
बेरोजगारी, महागाई कमी होणे अपेक्षित, मराठवाडा अद्याप विकासाच्या प्रतीक्षेत
अनेक कल्याणकारी, विकासाच्या योजना महायुती सरकारच्या वतीने राबवल्या जात असल्या तरी, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, भ्रष्टाचारावर नियंत्रण आणि महागाई हे विषय जनतेच्या सर्वात मोठ्या अपेक्षांमध्ये कायम आहेत. संपूर्ण राज्यात पायाभूत सुविधा आणि मराठी संस्कृतीच्या उन्नतीसाठी सकारात्मक संकेत मिळत असले तरी, मराठवाड्यातील नागरिकांना अद्याप विकासाच्या समतोल वाटपाची प्रतीक्षा आहे. या भागात विशेष लक्ष केंद्रित करण्याची गरज सर्वेक्षणाने स्पष्ट केली आहे.
जनतेला बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि महागाई अशा प्रश्नांनी ग्रासले
राज्यातील जनतेला बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि महागाई अशा प्रश्नांनी ग्रासले असल्याचे दिसते. ह्या समस्या सरकारने सोडवाव्या, असे जनतेला वाटते. १८ ते २३ वयोगटातील ४० टक्के, तर २४ ते ३५ या वयोगटातील ४३ टक्के तरुणांनी बेरोजगारी सोडवण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच राज्यातील एकूण सरासरी ३८ टक्के जनतेला सरकारने भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवण्याची अपेक्षा आहे. राज्यातील २२ टक्के महिलांनी महागाई नियंत्रित करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. याशिवाय, विकास फक्त काही क्षेत्रांपुरता मर्यादित न ठेवणे, वीजपुरवठा आणि जास्त वीज बिलांच्या समस्या सोडवणे, चांगले रस्ते देणे, कायदा आणि सुव्यवस्थेच्या सुधारणे, शेतासाठी सिंचनाचे पाणी सुनिश्चित करणे, निखळपणे ऊर्जा वितरणातील अडचणी दूर करणे, नजीकच्या भागातील असमानतेचे निराकरण करणे, या मुद्द्यांवर सरकारने भर द्यावा, अशी अपेक्षा राज्यातील जनतेने या सर्वेक्षण व्यक्त केली आहे.
