भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 09:06 IST2025-11-19T08:50:43+5:302025-11-19T09:06:49+5:30
लोहा नगरपरिषदेत भाजपा, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळेल. याठिकाणी अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा लोहा बालेकिल्ला मानला जातो.

भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
नांदेड - राज्यात नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रत्येक पक्ष या निवडणुकीत जोमाने उतरला आहे. त्यात अनेक दिग्गज नेत्यांच्या कुटुंबातील मंडळीही ही निवडणूक लढवत आहेत. राजकारणातील घराणेशाही यावरून भाजपा सातत्याने विरोधकांवर हल्लाबोल करते, परंतु प्रत्यक्षात भाजपानेच एकाच कुटुंबातील ६ जणांना उमेदवारी देण्याचा अजब प्रकार केल्याचं समोर आले आहे. नांदेडच्या लोहा नगरपरिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने एकाच कुटुंबातील ६ जणांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.
लोहा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपाने गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्याशिवाय नगरसेवकपदासाठी त्यांची पत्नी गोदावरी सूर्यवंशी, भाऊ सचिन सूर्यवंशी, भावाची पत्नी सुप्रिया सूर्यवंशी यासोबतच मेव्हुणा युवराज वाघमारे, भाच्याची पत्नी रिना अमोल व्यवहारे या सर्वांना उमेदवारी दिली आहे. भाजपा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, इथे घराणेशाही चालत नाही असं मिरवणाऱ्या नेत्यांनीच पक्षातील उमेदवारी एकाच कुटुंबातील ६ जणांना दिली आहे. त्यामुळे सध्या लोहा नगरपरिषदेतील ही घराणेशाही चांगलीच चर्चेत आली आहे.
लोहा नगरपरिषदेत एकूण १० प्रभागातील २० नगरसेवकांसाठी निवडणूक होत आहे. त्यात मंगळवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस, भाजपा, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसह शिवसेना शिंदे गटानेही उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. भाजपाने या निवडणुकीत सर्व २० जागांवर उमेदवार उतरवले आहेत. त्यातील ६ जण एकाच कुटुंबातील आहेत. नगराध्यक्षपदी गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी मिळाली आहे. पत्नी गोदावरी सूर्यवंशी यांना प्रभाग ७ अ, भाऊ सचिन सूर्यवंशी प्रभाग १ अ, भावाची पत्नी सुप्रिया सूर्यवंशी प्रभाग ८ अ, मेव्हुणा युवराज वाघमारे प्रभाग ७ ब, भाच्याची पत्नी रिना व्यवहारे यांना प्रभाग ३ मधून उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान, लोहा नगरपरिषदेत भाजपा, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळेल. याठिकाणी अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा लोहा बालेकिल्ला मानला जातो. आतापर्यंत या नगर परिषदेवर प्रताप पाटील चिखलीकर यांचे वर्चस्व राहिले आहे. मात्र माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजपा नांदेडमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवत आहेत. त्यात लोहा नगरपरिषदेत भाजपाने एकाच कुटुंबात ६ जणांना तिकीट दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.