'अण्णासाहेब पाटील महामंडळा'च्या लाभार्थींत कोल्हापूर राज्यात अव्वल; आतापर्यंत किती कोटींचे कर्जवाटप झाले... जाणून घ्या
By पोपट केशव पवार | Updated: October 16, 2025 12:46 IST2025-10-16T12:44:28+5:302025-10-16T12:46:41+5:30
जिल्ह्यात २० हजार तरुण बनले उद्यमी

'अण्णासाहेब पाटील महामंडळा'च्या लाभार्थींत कोल्हापूर राज्यात अव्वल; आतापर्यंत किती कोटींचे कर्जवाटप झाले... जाणून घ्या
पोपट पवार
कोल्हापूर : राज्य सरकारच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या व्याज परताव्याचा लाभ घेत, जनावरांच्या गोठ्यापासून ते अन्नप्रक्रिया उद्योगांपर्यंत छोटे-छोटे उद्योग उभारून गेल्या सहा वर्षांत राज्यात १ लाख ५२ हजार ७७२ जणांनी उद्यमशीलतेची वाट निवडली आहे. राज्यात १२ हजार ७८१ कोटी २९ लाख ६५ हजार रुपयांचे कर्जवाटप केले आहे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा लाभ घेण्यात कोल्हापूर जिल्हा अव्वल ठरला आहे. या जिल्ह्यातील २० हजार ३२९ जणांनी व्याज परताव्याचा लाभ मिळविला आहे.लाभार्थ्यांच्या यादीत अहिल्यानगर जिल्हा दुसरा असून, या जिल्ह्यात १७ हजार ६९९ लाभार्थी आहेत. आतापर्यंत या महामंडळाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यात १८५६ कोटी रुपयांचे कर्ज लाभार्थ्यांना देण्यात आले आहे; तर २३६ कोटी रुपयांचा व्याज परतावा लाभार्थ्यांना मिळाला आहे.
मराठा समाजातील तरुणांना रोजगार मिळावा यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनांतून कर्जाच्या व्याज परताव्याचा लाभ दिला जातो. व्याज परतावा योजनेत, व्यक्ती आणि गटांसाठी वेगवेगळ्या अटींसह व्याज परतावा दिला जातो. वैयक्तिक कर्जासाठी १५ लाख रुपयांपर्यंत आणि गटकर्जासाठी ५० लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध आहे.
असे आहेत जिल्हानिहाय लाभार्थी
जिल्हा - लाभार्थी
कोल्हापूर - २०३२९
अहिल्यानगर - १७६९९
नाशिक - १६८५८
सोलापूर - १५१६५