jitendra awhad criticised bjp leader through poem over uddhav thackeray | “खरंच… हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे”: जितेंद्र आव्हाड

“खरंच… हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे”: जितेंद्र आव्हाड

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोनाची गंभीर होत चाललेली परिस्थिती, बेड्स, ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीर इंजेक्शनची कमतरता यांमुळे एका बाजूला जनता त्रस्त झाली असताना विरोधी पक्ष भाजपसह अन्य पक्ष ठाकरे सरकारवर जोरदार टीका करत आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एका कवितेतून भाजपला सणसणीत चिमटा काढला आहे. (jitendra awhad criticised bjp leader through poem over uddhav thackeray)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १४ एप्रिल रात्री ८ वाजेपासून पुढचे १५ दिवस राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये पूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली असून फक्त जीवनावश्यक वस्तू आणि सेवांशी संबंधित व्यक्तींना प्रवासाची आणि उद्योगांना सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच, विविध समाजघटकांसाठी अर्थसहाय्य करण्याचीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. यावरून भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला. मात्र, भाजपकडून केल्या जाणाऱ्या टीकेचा जितेंद्र आव्हाड यांनी कवितेतून खरपूस समाचार घेतला. जितेंद्र आव्हाड यांनी उपरोधिक शैलीत ही कविता लिहिली असून त्यातून त्यांनी भाजपची खिल्ली उडवली आहे. ही कविता फेसबुकवर शेअर करण्यात आली आहे. 

निवडणुकांमध्ये कोरोनाची ‘रॅली’; बंगालमध्ये ४२० टक्के, तर आसामामध्ये ५३२ टक्के रुग्णवाढ

खरंच… हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे…

खरंच हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे..!!
कधी थाळ्या वाजवायला
लावल्या नाही…
ना कधी मेणबत्या आणि दिवे
लावायला लावले …
निर्णय घेताना घेतले
विश्वासात…
विरोधकांचे त्यामुळेच
फावले……
शांत राहून तो लढत आहे
विरोधकांचे खरंच राईट आहे…
खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे…!!

मंदिर उघडा, बाजार उघडा
शाळा उघडा ते म्हणाले…
परीक्षा पुढे ढकलल्या तर
ते रस्त्यावर पुन्हा पुन्हा आले…
कोरोना वाढला तर ते आता
फक्त सरकारला दोषी ठरवत आहे…
विरोधकांचे खरंच राईट आहे…
खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे…!!

इमान तर विकले नाहीच
ना कोणत्या सरकारी कंपन्या विकल्या…
कोरोनाचे आकडे लपवले नाहीच
खोट्याने न कधी माना झुकल्या…
घरी पत्नी आणि मुलगा
आजारी असतांना तो मात्र लढत आहे…
विरोधकांचे खरंच राईट आहे…
खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे…!!

ना कुठे बडबोलेपणा
ना कशाचा बडेजाव..
आठ हजार कोटीचे
विमान नको…
ना कोणत्या प्रकरणात
घुमजाव……
जे करतोय ते प्रामाणिकपणे
तो करतो आहे…
विरोधकांचे खरंच राईट आहे…
खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे…!!

व्यापाऱ्यांचे ऐकून घेतोय…
विद्यार्थ्यांचे ऐकून घेतोय…
गोरगरीब जनतेला
एकवेळ शिवभोजन मोफत देतोय…
निसर्ग चक्रीवादळ, कोरोना संकट
शेतकऱ्यांच्या अडचणी
साठी तो शांततेत लढतो आहे ……
विरोधकांचे खरंच राईट आहे…
खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे…!!

ना क्लीन चिट देता आली…
ना खोटी आकडे वारी देता आली…
निवडणूक काळात तर कधी
ना अशक्य घोषणा त्याला करता आली…
जे होण्यासारखे आहे तेच तो करतोय…
विरोधकांचे खरंच राईट आहे…
खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे…!!

महाराष्ट्राचे मीठ खाऊन
निधी पंतप्रधान निधीला ते देताय…
उठसूठ, सकाळ संध्याकाळ
ते टीका सरकार वर करताय…
तो मात्र टिकेला उत्तर न देता
सर्वसामान्यांसाठी झटत आहे…
विरोधकांचे खरंच राईट आहे…
खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे…!!

– डॉ.जितेंद्र आव्हाड
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: jitendra awhad criticised bjp leader through poem over uddhav thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.