लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्याची चर्चा शनिवारी होती. मात्र त्यांनी राजीनामा दिला नसून प्रदेशाध्यक्ष पदाबाबत निर्णय घेण्यासाठी शरद पवार यांनी १५ जुलै रोजी मुंबई पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे.
या बैठकीत पाटील यांचा राजीनामा घ्यायचा की त्यांना प्रदेशाध्यक्षपदी कायम ठेवायचे याबाबत निर्णय होण्याची शक्यता असल्याचे समजते. मात्र, विश्वसनीय सूत्रांनुसार, पाटील आता या पदावर रहायला तयार नसून त्यांच्या जागी आमदार शशिकांत शिंदे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
जयंत पाटील यांनी यापूर्वी तीन वेळा पदावरून मुक्त करण्याबाबत राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे इच्छा व्यक्त केली होती. जयंत पाटील यांनी राजीनामा देऊ नये यासाठी पक्षातील काही पदाधिकाऱ्यांचा दबाव आहे. त्यामुळे निर्णय घेण्यासाठी पवारांनी मंगळवारी बैठक बोलवली आहे.
भाजपत जाणार असल्याचीही चर्चाजयंत पाटील यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू असतानाच ते भाजपत जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, या चर्चेचा शरद पवार गटाकडून इन्कार करण्यात आला. भाजपनेही पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा फेटाळून लावली आहे.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले की, रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले, पूर्वी मी होतो, ही संघटनात्मक प्रक्रिया आहे. जयंतराव खूप दिवसांपासून प्रदेशाध्यक्ष होते, त्यांना बदलणार याचा अर्थ असा नाही की ते पक्ष सोडणार आहेत. मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनाही जयंत पाटील भाजपत येणार असल्याबाबत विचारले असता त्यांनी मान हलवून ‘नाही’ असे उत्तर दिले.
राजीनाम्याची चर्चा हा खोडसाळपणा : जितेंद्र आव्हाडपाटील यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाल्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी या वृत्ताचे खंडन केले. आव्हाड यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले की, ‘जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या राजीनाम्याच्या बातम्या प्रसारीत होणे, हा खोडसाळपणा आहे. पक्ष एका नियमानुसार अन् शिस्तीनुसारच चालत असतो.’