एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 14:38 IST2025-07-14T14:35:49+5:302025-07-14T14:38:16+5:30
Shiv Sena Shinde Group News: ...तर ‘संजय’ हे नाव शिंदे यांना लाभदायक नाही यावर शिक्कामोर्तब होईल, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात होत आहे.

एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
Shiv Sena Shinde Group News: एकीकडे राज्यभरातील महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. तर, दुसरीकडे महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांवरून आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे राजकीयदृष्ट्याही एकत्र येणार का, राज ठाकरे यांची उद्धव ठाकरे यांच्याशी युती झालीच, तर महाविकास आघाडीत ते सामील होणार का, अशा अनेक मुद्द्यांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. यातच शिवसेना शिंदे गटातील संजय गायकवाड, संजय शिरसाट यांच्यामुळे एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षाची डोकेदुखी वाढल्याची चर्चा आहे.
शिंदेसेनेचे बुलढाणा येथील आमदार संजय गायकवाड यांनी मंत्रालयाजवळील आकाशवाणी आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये तेथील कर्मचाऱ्याला गावगुंडाप्रमाणे बेदम मारहाण केली. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय, सामाजिक क्षेत्रांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. यावरून विरोधकांनी जोरदार टीका केली. यानंतर मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ समोर आला. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे गटावर निशाणा साधला. दोन्ही प्रकरणांमुळे शिवसेना शिंदे गटाची डोकेदुखी वाढल्याचे म्हटले जात आहे.
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही?
शिंदेसेनेचे आमदार ‘संजय’ गायकवाड यांनी आमदार निवासात कँटीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा विषय समाज माध्यमावर चर्चेत आहे. तर पक्षाचे मंत्री ‘संजय’ शिरसाट यांनी भर कार्यक्रमात आयकर खात्याकडून आलेल्या नोटीसबाबत केलेले वक्तव्य आणि आता बेडरूमधील बॅगसोबत व्हिडीओही व्हायरल होत आहे. त्यातच उद्धवसेनेचे ‘संजय’ राऊत यांच्याकडून येणाऱ्या प्रतिक्रियांमुळे एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढली नसेल तरच नवल. आता शिंदेसेनेचे अजून एक मंत्री ‘संजय’ राठोड अद्याप शांत आहेत. त्यांचे एखादे वादग्रस्त वक्तव्य किंवा व्हिडीओ आलाच तर ‘संजय’ हे नाव शिंदे यांना लाभदायक नाही यावर शिक्कामोर्तब होईल, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात होत आहे.
दरम्यान, शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आकाशवाणी येथील आमदार निवासातील उपहारगृह कर्मचाऱ्यांना केलेल्या मारहाणप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे. व्हायरल व्हिडीओ व साक्षीदारांकडे केलेल्या चौकशीनंतर पोलिसांनी स्वतः फिर्यादी बनून हा गुन्हा नोंदविला आहे.