गुन्ह्याच्या कबुलीसाठी अमानुष छळ

By Admin | Updated: May 27, 2014 05:36 IST2014-05-27T05:36:17+5:302014-05-27T05:36:17+5:30

गोध्रा व पांड्यातील स्फोटांपैकी एक गुन्हा कबूल करण्यासाठी गुजरात पोलिसांकडून अनन्वित व अमानवी छळ करण्यात आला

Inhuman torture to confession | गुन्ह्याच्या कबुलीसाठी अमानुष छळ

गुन्ह्याच्या कबुलीसाठी अमानुष छळ

मुंबई : गोध्रा व पांड्यातील स्फोटांपैकी एक गुन्हा कबूल करण्यासाठी गुजरात पोलिसांकडून अनन्वित व अमानवी छळ करण्यात आला. मात्र देशाच्या घटनेवर विश्वास असल्याने अत्याचार होऊनही त्यांच्या दबावाला बळी पडलो नाही. आपल्यावर अन्याय करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करून आपल्याला सन्मानाने जगण्याची संधी द्यावी, त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबंधितांना आदेश द्यावेत, अशा शब्दांत अक्षरधाम स्फोटाच्या गुन्ह्यात सर्वोच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता झालेल्या ५ तरुणांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. गेल्या अनेक वर्र्षांपासून गुजरात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अल्ताफ हुसेन अकबर, आदम भाई सुलेमान अजमेरी, महंमद सुलतान, हनीफ शेख अब्दुल कय्युम, अब्दुल मियां मुसरी व शान मिया या सहा जणांना १६ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष सोडले. यापैकी अजमेरी, कय्युम मुफ्ती व शान यांना खालच्या कोर्टाने फाशीची तर अन्य तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यापैकी शान वगळता अन्य सर्वांनी जमात-ए-उलेमा हिंदच्या वतीने मुंबईत सोमवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आपल्या झालेल्या छळाची माहिती दिली. जमात-ए-उलेमा हिंदच्या लीगल सेलचे सचिव गुलझार आजमी, अ‍ॅड. खालिद शेख, एजाज कुरेशी यांनी ठरावीक समुदायातील निरपराध तरुणांवर गुन्हे दाखल करून आयुष्यातून उठविले जात असल्याचा आरोप केला. आता न्यायदेवतेने त्यांना निर्दोष ठरविल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार्‍यांवर कडक कारवाई केली जावी, त्याचप्रमाणे या तरुणांना सन्मानाने जीवन जगण्यासाठी तातडीने सरकारने सानुग्रह अनुदान द्यावे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याबाबत संबंधितांना आदेश द्यावेत, अशी मागणी केली. (प्रतिनिधी)

Web Title: Inhuman torture to confession