मुंबई/छत्रपती संभाजीनगर : सलग अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीने मराठवाड्यासह विविध जिल्ह्यांत कहर केला असून, पिकांसह माती खरडून निघाल्याने शेतशिवारांना नदीचे स्वरूप आले आहे. या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असतानाच पुढील दोन दिवस पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शुक्रवारी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, गडचिरोली जिल्ह्यांत पाऊस झाला. अनेक भागांत पूर असल्याने नुकसानग्रस्त शिवारांचे पंचनामे करण्यास अडचणी येत आहेत.
मराठवाड्यात गेल्या दहा दिवसातील पावसामुळे तब्बल ८६ जणांचा पुरात वाहून जीव गेला, तर १७२५ जनावरे दगावली. तीन जिल्ह्यांत अद्याप पंचनाम्यांना वेग आलेला नाही. पूर ओसरल्यानंतर शेतशिवारातून काही पिके वाचविता येतात का? किंवा बुडालेल्या घरातून काही वस्तू मिळतात का याचा शोध लोक घेत आहेत.
विभागात पाऊस काही थांबेनामराठवाड्यात दोन दिवस पावसाने विश्रांती घेतल्यानंतर गुरुवारी रात्रीतून पुन्हा हजेरी लावली. विभागात ९ मिमी पाऊस झाला. मराठवाड्यात १६५ मिमी पाऊस जास्तीचा झाला असून, हे प्रमाण १२४ टक्के एवढे आहे. गेल्यावर्षी ७९४ मिमी पाऊस झाला होता. १२० टक्के हे प्रमाण होते. परभणी जिल्ह्यात सर्वत्र पावसाने झालेले नुकसान पाहता शेतकरी त्रस्त झाले आहेत. असे असताना पुन्हा शुक्रवारी जिल्ह्यातील काही तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
पुराचे थैमान; १०० गावांचा तुटला होता संपर्क छत्तीसगडमधील अतिवृष्टीमुळे पर्लकोटा नदीने आपले अक्राळ-विक्राळ रूप दाखवले. तालुका मुख्यालयासह शंभरहून अधिक गावांचा शुक्रवारी संपर्क तुटला होता. तब्बल १३ तासांनंतर जनजीवन पूर्वपदावर आले. येथे गुरुवारी सकाळपासूनच संततधार पाऊस सुरू होता. छत्तीसगडमध्ये जोर वाढल्याने रात्रीतून पाण्याचा प्रवाह वाढला. पहाटे पूर आला. पाणी पुलावर चढल्याने एसटी बसगाड्या आणि खासगी वाहनांची रांग पुलाच्या दोन्ही बाजूंनी लागली होती. प्रशासनाने तातडीने बॅरिकेड्स लावल्या, पोलिस बंदोबस्त तैनात केला आणि सुरक्षिततेसाठी पर्यायी उपाययोजना राबवल्या. पावसाची तीव्रता कमी झाल्यामुळे सायंकाळी ५ वाजता वाहतूक पूर्ववत सुरळीत झाली. प्रशासनाच्या सूचना काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकरी हतबल, केळीची २००० झाडे कापून फेकली सातत्याने होत असलेली अतिवृष्टी, त्यात शासकीय अनास्था आणि व्यापाऱ्यांची मनमानी या संकटांमुळे हतबल झालेल्या डोंगरकडा येथील एका शेतकऱ्याने केळीच्या बागेवर चक्क नांगर फिरवला आहे. केळीची २ हजार झाडे कापून टाकली. डोंगरकडा येथील जेठण गावंडे यांनी साडेसहा महिन्यांपूर्वी केळीची बाग लावली. ९० हजारांचा खर्च केला होता.
रावेरमध्ये केळीला फटका :रावेर तालुक्यात २४ सप्टेंबरला झालेल्या परतीच्या पावसाने मोठा तडाखा दिला. याशिवाय केऱ्हाळे बुद्रुक व मस्कावद सीम या परिसरात वीज कोसळून शेतकऱ्यांच्या अडीच हजार केळीच्या खोडांचे नुकसान झाले आहे. इतर पिकांनाही तडाखा बसला आहे.
पूर्ण सोयाबीन गेलं, माती खरडून शेतात उरली फक्त वाळूदहा वर्षांपूर्वीच वडिलांचे निधन झालेले.. घरात ६५ वर्षांची आई आणि एकुलता एक ३२ वर्षांचा मुलगा अक्षय अर्जुन मिरगणे यांची शेतीवरच उपजीविका सुरू होती. त्याच्या स्वप्नांचा चांदणी नदीच्या पुराने चुराडा झाला. या महापुरामध्ये चार एकरातील सोयाबीन तर गेलेच; मात्र मातीही पूर्णपणे खरडून वाहून गेली असून शेतामध्ये खड्डे अन् वाळूचे ढिगारे तयार झाले आहेत.
५० वर्षात एवढा पूर नव्हताचांदणी नदीला ५०-६० वर्षांत कधी नव्हे एवढे पाणी आले. पाणी जास्त झाल्याने नदीपात्राबाहेर दोन्ही बाजूंनी अर्धा किलोमीटर नदी वाहत आहे. यामुळे मांडेगाव, बेलगावनजीक बेलगावच्या बंधाऱ्याच्या कडेलाच अक्षय अर्जुन मिरगणे यांची जमीन आहे.
मराठवाड्यातील ५० टक्के खरीप पिकांचा चिखलमराठवाड्यात १० दिवसांत वारंवार अतिवृष्टी झाल्याने सुमारे २४ लाख हेक्टरवरील पिकांचा चिखल झाला. नुकसानीचे ७६ टक्के पंचनामे झाले असून, यंदाच्या हंगामात पेरणी केलेल्या सुमारे ४८ लाख हेक्टरपैकी २४ लाख हेक्टर, म्हणजे ५० टक्के पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे खरीप कृषी उत्पादकता घटणार असल्याने आगामी काळात महागाईचे संकट येण्याची शक्यता व्यक्त होते.
यावर कशी मात करणार? पेरणीसाठी बँकांनी पीक कर्ज सरसकट दिलेले नाही. त्यामुळे उधार आणलेले बियाणे, सावकारांकडून घेतलेले, बँकेचे कर्ज कसे फेडायचे, हा प्रश्न सध्या शेतकऱ्यांसमोर आहे. पुरामुळे पिकेच नाही तर मातीही वाहून गेली असून, शिवाराला तळ्याचे स्वरूप आले आहे.
Web Summary : Heavy rains and floods in Maharashtra, especially Marathwada, have destroyed crops and eroded soil. Farmers face immense losses, with more rain predicted. Many deaths and livestock losses reported. Re-sowing is impossible as fertile soil is gone, replaced by sand.
Web Summary : महाराष्ट्र, खासकर मराठवाड़ा में भारी बारिश और बाढ़ से फसलें बर्बाद हो गईं और मिट्टी का कटाव हुआ। किसानों को भारी नुकसान हुआ है, और अधिक बारिश की भविष्यवाणी की गई है। कई मौतें और पशुधन की हानि हुई। दोबारा बुवाई असंभव है क्योंकि उपजाऊ मिट्टी रेत से बदल गई है।