Maharashtra Vidhan Parishad Election: ‘पदवीधर’ नोंदणीत ‘कोल्हापूर’; ‘शिक्षक’मध्ये ‘सोलापूर’ अव्वल, जिल्हानिहाय मतदार किती.. वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 13:41 IST2026-01-21T13:40:27+5:302026-01-21T13:41:29+5:30
डिसेंबर २०२६ मध्ये होणार निवडणूक

Maharashtra Vidhan Parishad Election: ‘पदवीधर’ नोंदणीत ‘कोल्हापूर’; ‘शिक्षक’मध्ये ‘सोलापूर’ अव्वल, जिल्हानिहाय मतदार किती.. वाचा
कोल्हापूर : पुणे पदवीधर व शिक्षक विधान परिषद मतदारसंघासाठी आतापर्यंत राबवलेल्या मतदार नोंदणीमध्ये अनुक्रमे ‘कोल्हापूर’ व ‘सोलापूर’ जिल्हा अव्वल राहिले आहेत. सर्वाधिक ३ लाख १० हजार ८९९ पदवीधरमध्ये तर ५१ हजार ९७९ मतदार हे शिक्षक मतदारसंघासाठी नोंदले गेले आहेत.
पुणे पदवीधर व शिक्षक विधान परिषद मतदारसंघाची निवडणूक डिसेंबर २०२६ मध्ये हाेणार आहे. एक वर्ष अगोदरच मतदार यादीची प्रक्रिया सुरू केली जाते. त्यामुळे गेली दोन महिने मतदार नोंदणीचे अभियान विविध राजकीय पक्षाकडून राबवले. पदवीधरसाठी सर्वच तालुक्यात नोंदणीची यंत्रणा सक्रिय झाली असली तरी जिथे इच्छुक आहेत, त्या जिल्ह्यात सर्वाधिक नोंदणी झाल्याचे दिसते. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून ‘पदवीधर’साठी कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने, सांगलीतून आमदार अरुण लाड यांचे सुपुत्र शरद लाड इच्छुक असल्याने येथेच तुलनेत अधिक नोंदणी झाल्याचे दिसते.
शिक्षक मतदारसंघातही प्रा. जयंत आसगावकर हे विद्यमान आमदार असल्याने त्यांची यंत्रणा कोल्हापूरसह पाचही जिल्ह्यात सक्रिय होती. माजी आमदार दत्तात्रय सावंत (सोलापूर), खंडेराव जगदाळे व विजयसिंह माने (कोल्हापूर) यांनी तयारी केली आहे.
अद्याप नोंदणीला संधी....
शासकीय मतदार नोंदणी केंद्रावर पदवीधर व शिक्षकांच्या मतदार याद्या अवलोकनार्थ ठेवल्या आहेत. ज्यांची नावे या यादीत कोणत्याही कारणाने समाविष्ट झाली नसतील तर पात्र पदवीधर व शिक्षकांनी नव्याने अर्ज करुन आपली नोंदणी करता येते, अशी माहिती माणिक पाटील-चुयेकर यांनी दिली.
अशी झाली जिल्हानिहाय नोंदणी..
पदवीधर..
जिल्हा - अंतिम मतदार
- कोल्हापूर - ९१,४००
- सांगली - ७८,३६६
- पुणे - ६१,११३
- सातारा - ४२,०६३
- सोलापूर - ३७,९५७
शिक्षक..
जिल्हा - अंतिम मतदार
- सोलापूर - १३,१५८
- पुणे - १२,१८७
- कोल्हापूर - १०,२१५
- सातारा - ९,०९७
- सांगली - ७,३२२