पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 10:06 IST2026-04-29T10:05:41+5:302026-04-29T10:06:05+5:30

सुमारे २५० लोकवस्तीच्या या पाड्यातील रहिवाशांना तीन किलोमीटरची पायपीट करीत ४०० मीटर खोल दरीत उतरून तेथील विहिरीवरून पाणी आणावे लागत होते

In Haryapada village—located at Nagzhari in the Satpura region—a water supply scheme was implemented under the ‘Samruddha Kisan’ project, a joint initiative of the BAIF organization and the government | पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’

पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’

रमाकांत पाटील

नंदुरबार : गावात पाणी नसल्याने तरुणांचे विवाह होत नव्हते. अखेर मोठ्या कष्टाने गावकऱ्यांनी सरकारी योजनेचा लाभ घेत गावात पाणी आणले. या पाण्याने गावाला जणू संजीवनीच दिली. तरुणांची रखडलेली लग्नं तर झालीच; पण रोज तीन किलोमीटर खोल दरीत जाऊन पाणी आणण्याच्या कष्टातूनही मुक्ती मिळाली. ही कहाणी आहे सातपुड्यातील नागझरी (ता. शहादा) येथील हाऱ्यापाडा गावची.

शहादा - तोरणमाळ रस्त्यावरच नागझरी गावाच्या उजव्या बाजूला उंच असा डोंगर असून, त्यावर हा पाडा वसला आहे. सुमारे २५० लोकवस्तीच्या या पाड्यातील रहिवाशांना तीन किलोमीटरची पायपीट करीत ४०० मीटर खोल दरीत उतरून तेथील विहिरीवरून पाणी आणावे लागत होते. गावात एखाद्याच्या घरी सुख - दु:खाचा कार्यक्रम असल्यास त्यासाठी त्या गावात ‘लाहे पद्धती’ची परंपरा सुरू होती. अर्थात ज्याच्याकडे कार्य असेल त्या घरी पाणी आणून देण्यासाठी संपूर्ण गावातील प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्ती काम करत असे. दोन - दोन दिवस तेथे राबून पाणी आणले जाई. 

अनेक वर्षे पाण्याअभावी लग्ने रखडली 
गावातील पाणीटंचाईमुळे येथे लग्नासाठी कुणी मुलीही देत नव्हते. येथील मुलींची लग्नं जुळायची. पण, मुलांसाठी मात्र कुणी मुली देत नव्हते. त्यामुळे पाच-सात वर्षांपासून अनेक तरुणांचे लग्न रखडले होते. गावात पाणी येताच वर्षभरात तब्बल ११ तरुणांची लग्न जुळली.

‘समृद्ध किसान’ योजनेमुळे गावात आले पाणी
‘बायफ’ संस्था व शासनाच्या ‘समृद्ध किसान’ प्रकल्पांतर्गत गावात पाणी योजना राबविण्यात आली. ज्या विहिरीवरून ग्रामस्थ पाणी आणत होते तिचे खोलीकरण करण्यात आले व सोलर पंप बसवून पाइपलाइन करून पाणी नेण्यात आले. स्वतंत्र टाकी बसवून गावात ठिकठिकाणी नळ बसवून पाणी आणण्यात आले. त्यासाठी गावाने तब्बल १५ दिवस श्रमदान केले. शासनाच्या या योजनेमुळे गावात आता भाजीपाला पिकवला जात आहे.

गावात पाण्याची सुविधा नसल्याने तीन किलोमीटर पायपीट करून खोल दरीतून पाणी आणावे लागत होते. गावात मुली द्यायला कुणी तयार नव्हते. आता पाणी आल्याने आम्ही सुखी झालो आहोत. - घनशा नाईक, हाऱ्यापाडा 

Web Title : पानी आया, सतपुड़ा के दूरदराज गांव में जीवन बदला।

Web Summary : नागझरी के ग्रामीणों, जो पानी की कमी और विवाह संबंधी समस्याओं का सामना कर रहे थे, को 'समृद्ध किसान' योजना के माध्यम से राहत मिली। एक कुएं को गहरा किया गया, एक सौर पंप लगाया गया और पाइपलाइनें बिछाई गईं, जिससे हाऱ्यापाडा में पानी और समृद्धि आई। एक साल में ग्यारह शादियाँ हुईं।

Web Title : Water arrives, transforming lives in remote Satpuda village.

Web Summary : Nagzhari villagers, facing water scarcity and marriage problems, found relief through the 'Samruddha Kisan' scheme. A well was deepened, a solar pump installed, and pipelines laid, bringing water and prosperity to Haaryapada. Eleven marriages took place in one year.

टॅग्स :Waterपाणी