"माझे विधान असंवेदनशील नव्हते, तर...", कर्जमाफीबद्दलच्या वादग्रस्त विधानावर बाबासाहेब पाटलांचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 13:36 IST2025-10-10T13:33:43+5:302025-10-10T13:36:24+5:30
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी कर्जमाफीबद्दल एक विधान केले, ज्यामुळे वाद निर्माण झाला. विरोधकांकडून यावर टीका झाल्यानंतर बाबासाहेब पाटलांनी खुलासा केला आहे.

"माझे विधान असंवेदनशील नव्हते, तर...", कर्जमाफीबद्दलच्या वादग्रस्त विधानावर बाबासाहेब पाटलांचा खुलासा
Babasaheb Patil Controversy: शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी होत असताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवरचीच खपली काढली. कर्जमाफीचा नाद लागला आहे, असे ते म्हणाले. त्यानंतर टीकेची झोड उठली. विधान अंगलट आल्याचे लक्षात येताच बाबासाहेब पाटलांनी माफी मागितली. तसेच ते विधान दूग्ध व्यवसायशी संबंधित होते, असे म्हणत पाटलांनी दिलगीरी व्यक्त केली आहे.
वादग्रस्त विधानाबद्दल बोलताना बाबासाहेब पाटील म्हणाले, "मी जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे बँकेच्या उद्घाटनासाठी गेलो होतो. ग्रामीण भागात अर्थव्यवस्था बळकट करायची असेल आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवायची असेल, तर आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातील गोकुळसारखी व्यवस्था निर्माण करावी लागेल. त्यामुळे दिवसाला पैसे येतात."
"माझ्याही मतदारसंघात पतसंस्था आहे. आम्ही देखील दुधाच्या व्यवसायासाठी पैसे दिलेले आहेत. या बँकेतून जे कर्ज देणार आहोत, त्यासाठी कर्जमाफीचा लाभ मिळू शकत नाही असं मी त्या ठिकाणी बोललो होतो. मी सुद्धा शेतकरी आहे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो", असा खुलासा बाबासाहेब पाटील यांनी केला आहे.
बाबासाहेब पाटील म्हणाले, "माझे विधान असंवेदनशील नव्हते, तर..."
"विरोधकांकडून कर्जमाफीच्या मुद्द्यावरून जे राजकारण केले जात आहे. त्याला उद्देशून मी ते विधान केले होते की, कर्जमाफीचा नाद लागला आहे. दूधासाठी देण्यात येणारे कर्ज हे कर्जमाफीच्या निकषात बसत नाही, एवढंच मी बोललो होतो. त्यामुळे जनतेला ठरवावे लागेल की, लोकप्रतिनिधिंकडे काय मागायचे आहे. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी माफी मागतो. माझे वक्तव्य असंवेदनशील नव्हते, तर त्या प्रसंगाला अनुरूप होते", अशी भूमिका त्यांनी टीका सुरू झाल्यानंतर मांडली आहे.