शिवसेना-NCP तील तणाव वाढणार?; रामदास कदम पुन्हा बोलले, "अजितदादा नसते तर..."

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 05:24 PM2024-06-20T17:24:45+5:302024-06-20T17:26:27+5:30

महायुतीत मी मिठाचा खडा टाकणार नाही, आता सर्व्हेबाबत जे काही आहे ते भाजपानं स्वत:चे बघावे, आमच्यात ढवळाढवळ करू नये असंही रामदास कदमांनी म्हटलं.

Had Ajit Pawar joined the Mahayuti late, our Shiv Sena would have got 9 more ministers - Shivsena Ramdas Kadam | शिवसेना-NCP तील तणाव वाढणार?; रामदास कदम पुन्हा बोलले, "अजितदादा नसते तर..."

शिवसेना-NCP तील तणाव वाढणार?; रामदास कदम पुन्हा बोलले, "अजितदादा नसते तर..."

मुंबई - महायुतीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील तणाव वाढण्याची शक्यता आहे. शिवसेना वर्धापन दिनी रामदास कदमांनी अजित पवारांच्या महायुतीला प्रवेशाला विलंब झाला पाहिजे होता असं विधान केले. त्यावर अनेक राष्ट्रवादी नेत्यांनीही प्रत्युत्तर दिले. तरीही कदम त्या वक्तव्यावर ठाम असल्याचं दिसून येते. अजितदादांबाबत प्रचंड आदर, ते धाडसी व्यक्ती, प्रशासनावर पकड आहे. पण अजितदादा आणखी लेट आले असते तर आमच्या शिवसेनेचा फायदा झाला असता असं रामदास कदमांनी म्हटलं आहे. 

रामदास कदम म्हणाले की, अजित पवार थोडे उशीरा आले असते, मंत्रिमंडळ विस्तार झाला असता तर ते ९ मंत्रि‍पदे आम्हाला मिळाली असती. आमच्या पक्षाला मिळाली असते. एकनाथ शिंदे यांनी काही जणांना शब्द दिले होते. महाडचे भरतशेठ गोगावले कधीपासून सफारी शिवून तयार आहेत. ते वाट बघतायेत. २-४ जणांना शब्द दिला होता आणि तो पाळता येत नाही. त्यामुळे मी अजितदादा उशीरा आले असते तर त्या शब्दाची अंमलबजावणी झाली असती असं विधान केले. टीव्ही ९ च्या मुलाखतीत ते बोलत होते. 

तसेच आम्हाला १०० जागा द्या, ही विनंतीवजा मागणी आहे. आम्ही ज्या विश्वासाने तुमच्यासोबत आलोय त्यामुळे जेवढ्या जागा तुम्ही घ्या तितक्या आम्हाला द्या अशी मागणी भाजपाकडे आहे. एकनाथ शिंदे यांना १५ जागा लोकसभेच्या मिळाल्या, शिवसेना म्हणून १८ खासदार होते. तेवढ्या जागा मिळायला हव्या होत्या. भाजपाच्या जागा २ महिने आधी जाहीर झाले तसेच शिवसेनेचे उमेदवार झाले असते तर किमान १३-१४ जागा आल्या असत्या. नाशिकमध्ये भुजबळांना दोनदा पाडल्यानंतरही ती जागा आमचीच अशी मागणी करत होते. हिंगोली, ठाणे जागा मागत होते. हेमंत पाटील, भावना गवळी यांना बदला, ३ जागा बदलाव्या लागल्या त्यामुळे किमान ४-५ जागा आमच्या कमी झाल्या असा आरोप शिवसेना नेते रामदास कदमांनी केला. 

दरम्यान, तुम्ही जर सर्व्हे केला होता मग तुमच्या जागा पडल्या का?,भाजपाच्या काही नेत्यांमुळे त्यांच्या पक्षाचे नुकसान झालं, शिवसेनेचेही झाले आणि पर्यायाने मोदींचेही झाले. एक एक आकडा महत्त्वाचा असताना लोकसभेसाठी भाजपाच्या काही नेत्यांनी हट्ट केले होते आणि एकनाथ शिंदेंवर अन्याय केला होता. तो अन्याय होता कामा नये ही भावना माझ्या कालच्या भाषणात होती. आता विधानसभेत सर्व्हेचं आम्ही ऐकणार नाही. तु्म्ही तुमचं बघावं असा टोलाही रामदास कदमांनी भाजपाला लगावला. 

तुमची लंगोट कुणामुळे वाचली? 

मला महायुतीत कुठेही मिठाचा खडा टाकायचा नाही. मी एक जबाबदार नेता आहे. त्यामुळे जास्त भाष्य करू शकत नाही. कुणाची लंगोट गेली, तुमची लंगोट जी वाचली, सुनील तटकरे निवडून आले, त्या तटकरेंना जागा कशी मिळाली , त्यांच्यासाठी आम्ही काय केले हे विचारावे, त्यामुळे पहिल्यांदा तुमची लंगोट सांभाळ असं प्रत्युत्तर रामदास कदमांनी अमोल मिटकरींना दिलं. 

Web Title: Had Ajit Pawar joined the Mahayuti late, our Shiv Sena would have got 9 more ministers - Shivsena Ramdas Kadam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.