आरोग्य विद्यापीठाच्या परीक्षा घेण्यास राज्यपालांची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 05:23 IST2020-06-05T05:23:17+5:302020-06-05T05:23:33+5:30

१५ जुलै ते १५ आॅगस्टदरम्यान घेणार परीक्षा

Governor's approval to conduct health university exams | आरोग्य विद्यापीठाच्या परीक्षा घेण्यास राज्यपालांची मंजुरी

आरोग्य विद्यापीठाच्या परीक्षा घेण्यास राज्यपालांची मंजुरी

विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने प्रस्तावित केलेल्या पदवी व पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखांच्या परीक्षा आराखड्याला मंजुरी देत सर्व परीक्षा घेण्यास अनुमती दिली आहे.
राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी गुरुवारी राज्यपालांची भेट घेऊन राज्यपालांना आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे तयार करण्यात आलेला वैद्यकीय परीक्षा घेण्याबाबतचा विस्तृत आराखडा सादर केला. विद्यापीठाने परीक्षा घेण्यासंदर्भात केलेल्या नियोजनाचे राज्यपालांनी कौतुक केले. राज्यपालांना दिलेल्या पत्रामध्ये अमित देशमुख यांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परीक्षा घेण्यासंदर्भात तीन पर्याय तयार केले असल्याचे सांगितले. पहिल्या प्रस्तावानुसार परिस्थिती अनुकूल असल्यास सर्व लेखी परीक्षा १५ जूलै ते १५ आॅगष्ट या कालावधीत घेण्यात येतील. कोरोना परिस्थितीमुळे या कालावधीत परीक्षा घेणे शक्य न झाल्यास लेखी परीक्षा १६ आॅगष्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत घेण्यात येईल.
उपरोक्त दोन्ही पयार्यांनुसार परीक्षा होऊ न शकल्यास आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे केंद्रीय परिषदेचे मार्गदर्शन घेण्यात येईल व त्यानुसार आॅनलाईन किंवा इतर पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय होईल. आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे परीक्षांचा आराखडा तयार करताना सर्व संबंधित घटकांशी, माजी कुलगुरू, प्रकुलगुरूंशी तसेच नियामक संस्थांशी विचारविनिमय केल्याचे देशमुख यांनी राज्यपालांना सांगितले.

Web Title: Governor's approval to conduct health university exams