Coronavirus : शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय, राज्यात रोज 10 लाख लिटर दूध खरेदी करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 14:54 IST2020-03-31T14:50:43+5:302020-03-31T14:54:31+5:30
राज्यात उत्पादित 12 लाख लिटर दुधापैकी 10 लाख लिटर दूध अतिरिक्त ठरत आहे. खाजगी बाजारात दूधाचा दर 15 ते 17 रुपये प्रतिलिटरपर्यंत खाली घसरला आहे. शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब दूध उत्पादकांना याचा फटका बसत आहे.

Coronavirus : शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय, राज्यात रोज 10 लाख लिटर दूध खरेदी करणार
मुंबई - कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दूधउत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने रोज दहा लाख लिटर दूध खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार 25 रुपये प्रतिलिटर दराने या दूधाची खरेदी करेल. येत्या चार-पाच दिवसांत हे संकलन सुरू होईल आणि ‘कोरोना’चा प्रादुर्भाव संपेपर्यंत पुढचे दोन महिने ही खरेदी सुरूच राहील, असा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील दूधव्यवसाय आणि दुधउत्पादक शेतकरी संकटात आहेत. दूधाची विक्री घटल्याने गावागावांत दूध स्वीकारले जात नाही. राज्यात उत्पादित 12 लाख लिटर दुधापैकी 10 लाख लिटर दूध अतिरिक्त ठरत आहे. खाजगी बाजारात दूधाचा दर 15 ते 17 रुपये प्रतिलिटरपर्यंत खाली घसरला आहे. शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब दूध उत्पादकांना याचा फटका बसत आहे. यामुळे या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तसेच कोरोनाच्या धक्क्यातून सावरण्यासाठी राज्यात अतिरिक्त ठरत असलेले 10 लाख लिटर दूध दूधसंस्थांच्या माध्यमातून शासन 25 रुपये प्रतिलिटर दराने खेरदी करेल. त्या दुधाची भूकटी करून ती साठवली जाईल, नंतर त्याची ऑनलाईन विक्री केली जाईल, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. राज्य दूध महासंघाच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात येणार असून यातून शेतकऱ्यांना आधार व दिलासा मिळेल. यासाठी साधारणपणे 200 कोटी रुपये निधी लागेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, दुग्धविकासमंत्री सुनील केदार (दूरध्वनीद्वारे), वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक आदींसह वरिष्ठ अधिकारी, तसेच दूध महासंघाचे व संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.