देवाघरी गेली सारी फुले!

By Admin | Updated: August 1, 2014 01:03 IST2014-08-01T01:03:37+5:302014-08-01T01:03:37+5:30

जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला, ही कविता मानसी मच्छिंद्र झांजरे ही सहावीतील चिमुरडी अतिशय सुंदर म्हणायची.

Goddess gone all the flowers! | देवाघरी गेली सारी फुले!

देवाघरी गेली सारी फुले!

माळीण : जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला, ही कविता मानसी मच्छिंद्र झांजरे ही सहावीतील चिमुरडी अतिशय सुंदर म्हणायची. तिचा आवाज अतिशय गोड होता. संगीत, कवायतीमध्ये ती नेहमी पुढे असायची. इतकी चुणचुणीत मुलगी आता दिसणार नाही म्हणताना माळीण गावचे माजी मुख्याध्यापक वि. भा. गबाले यांना गहिवरून आले. मुले म्हणजे देवाघरची फुले म्हणतात, माळीण गावातील ३० ते ३५ मुले बुधवारच्या दुर्घटनेने खरोखरच देवाघरची फुले झाली.
माळीण गावात जिल्हा परिषदेची शाळा आहे. येथे इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग आहे. शाळेचा पट ७२ आहे. यातील ३५ मुले माळीण गावातील आहे. बहुतांश मुले ही इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत म्हणजे १० ते ११ वर्षे वयाची होती. कालच्या दुर्घटनेत जवळपास सर्वच्या सर्व मुले गडप झाली आहेत.
सकाळी लवकर डोंगर कोसळण्याची घटना घडल्याने बहुतांश लहान मुले ही घरातच होती. अचानक आलेल्या या प्रलयामुळे अनेकांवर झोपेतच काळाने घाला घातला. माळीण गावात भेटणारा प्रत्येक जण या मुलांच्या आठवणीने गहिवरून येत होता. शाळेचे मुख्याध्यापक सुरेश रोंगटे यांच्या डोळ्यासमोर तर प्रत्येक मुलाचा चेहराच कालपासून फिरतो आहे. ते म्हणाले, ‘‘गावातील ग्रामस्थ शाळेबाबतच्या कोणत्याही उपक्रमासाठी अतिशय अग्रेसर असायची. आठच दिवसांपूर्वी गावच्य फंडातून ई-लर्निंगसाठी ३० हजार रुपये दिले होते. गावातील तरुण मंडळ नेहमी शाळेला सहकार्य करणारे होते. जिवाला जीव देणारे लोक होते. एकेका ग्रामस्थाची आठवण अजूनही आहे.’’
रोंगटे म्हणाले, ‘‘ सुप्रिया गोरक्ष पोटे या सहावीतील मुलीचा चेहरा आठवला की अजूनही गहिवरून येते. अत्यंत चुणचुणीत असलेल्या सुप्रियाचा शिष्यवृत्तीमध्ये प्रथम क्रमांक आला होता. तिचे वडील पुण्यामध्ये पोलीस दलात होते. सुट्टी काढून ते भातलावणीसाठी घरी आले होते. मंदिराच्या मागच्या बाजुला त्यांचे घर होते. आज तेथे फक्त मातीचा ढिगारा आहे. बापलेक दोघेही मातीखाली गडप झाले आहेत.’’भारती पोटे आणि तान्हुबाई पोटे या गावातील महिला माध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत मुलांना खिचडी करायच्या. दररोज त्यांची शाळेला भेट असायची. त्यांची खिचडी मुले आवडीने खायची. आज त्या दोघीही नाहीत आणि त्यांची आवडती मुलेही नाहीत, असे सांगताना गबाले यांना भावना अनावर झाल्या होत्या.
माळीणच्या शाळेत अडिवरेची मुलेही येत होती. कालची घटना झाल्यापासून अडिवरेतील या सगळ्या मुलांना आपल्या शाळेतील संवगड्यांची आठवण येत आहे. त्यामुळे आता अडिवरेच्या ग्रामस्थांनी या शाळेत आपल्या मुलांना पाठवायचे नाही, असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हसती-खेळती शाळा ओस पडण्याची भीती आहे.

Web Title: Goddess gone all the flowers!