’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 16:38 IST2025-10-06T16:34:47+5:302025-10-06T16:38:45+5:30
Harshwardhan Sapkal News: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येण्याआधीच केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदतीचे पॅकेज जाहीर करायला हवे होते. शेतकऱ्यांचे सर्वकाही उद्ध्वस्त झाले असताना प्रस्तावाची वाट कसली पाहता, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला आहे

’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला
अकोला- राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात असताना त्याला भरीव मदत देण्यास भाजपा युती सरकार उदासीन आहे. महाराष्ट्राने प्रस्ताव पाठवला की मदत देऊ हे वेळकाढूपणा व असंवेदनशिलपणाचे लक्षण आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येण्याआधीच केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदतीचे पॅकेज जाहीर करायला हवे होते. शेतकऱ्यांचे सर्वकाही उद्ध्वस्त झाले असताना प्रस्तावाची वाट कसली पाहता, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला आहे.
अकोला येथे पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, महाष्ट्रातील सर्व निर्णय अमित शाह हेच घेत असतात, ते सुपर मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करायला हवी होती पण तसे झाले नाही तसेच अहिल्यानगरच्या कार्यक्रमातच मदतीचे पॅकेज जाहीर करायला पाहिजे होते. मुख्यमंत्री दिल्लीला गेले पण त्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रस्ताव पाठवला नाही तर सुरजागडच्या खाणीतून जास्त मलई कशी मिळवता येईल हा प्रस्ताव घेऊन ते दिल्लीला गेले आणि शेतकऱ्यांसाठी मदत न घेतात हात हलवत परत आले.
राज व उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या प्रश्नावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, भाजपाच्या हुकूमशाही विरोधात मविआ व इंडिया आघीडीची स्थापना झालेली आहे, नरेंद्र मोदी व भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे हा त्यामागचा हेतू होता तसेच संविधानाला अभिप्रेत भारत घडवणे हा संकल्प त्यामागे होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याचे अधिकार दिलेले आहेत असेही सपकाळ यांनी स्पष्ट केले.