दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना मोफत एसटी प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 06:42 IST2018-10-30T01:44:04+5:302018-10-30T06:42:39+5:30
परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांची घोषणा

दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना मोफत एसटी प्रवास
मुंबई : दुष्काळसदृश म्हणून नुकत्याच जाहीर केलेल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना उर्वरीत शैक्षणिक वषार्साठी मोफत प्रवास सवलत पास देण्यात येत असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी सोमवारी येथे केली.
शालेय, महाविद्यालयीन आणि व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मासिक पाससाठी सध्या ६६.६७ टक्के इतकी सवलत देण्यात येते. आता शासनाने दुष्काळसदृश म्हणून जाहीर केलेल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना उर्वरीत शैक्षणिक वर्षासाठी ही सवलत १०० टक्के असेल. त्यामुळे महामंडळाच्या तिजोरीवर ८५ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. ३५ लाख विद्यार्थ्यांना सवलतीचा फायदा होईल.