मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टविरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश; रक्ताने पत्र लिहून इच्छामरणाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 22:26 IST2026-01-05T22:25:14+5:302026-01-05T22:26:08+5:30
तुम्हाला विकास करायचा असेल तर गावखेड्यातील पाणंद रस्ते तयार करा. बाजारपेठेपर्यंत जाणारे रस्ते त्यावरील खड्डे बुजवा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टविरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश; रक्ताने पत्र लिहून इच्छामरणाची मागणी
हिंगोली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश पाहायला मिळाला. हिंगोली वसमत येथे या शेतकऱ्यांनी या महामार्गाला विरोध केला. याबाबत शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने शेतकऱ्यांच्या रक्ताने पत्र लिहून हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या शेतकऱ्यांनी आम्हाला न्याय द्या नाहीतर इच्छामरण द्या अशी मागणी सरकारकडे केली आहे.
याबाबत शेतकरी म्हणाले की, शक्तीपीठ महामार्गाबाबत सांगली, कोल्हापूर, सोलापूर येथील मार्ग बदलण्याचा प्रस्ताव सरकारने ठेवला आहे. बाकी जिल्ह्यात तो मार्ग जुन्या आराखड्याप्रमाणेच जाणार आहे. गेल्या पावणे दोन वर्षापासून आम्ही विविध आंदोलन, निवेदने, मोर्चे काढले आहेत. मात्र हिंगोली, कळंबमध्ये शेतकऱ्यांचा विरोध नाही असं सरकार म्हणते. मराठवाड्यातील शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे हे मुख्यमंत्र्यांनी पाहिले पाहिजे. हिंगोली जिल्ह्यात ऊसाचे, हळदीचे आणि केळीचे पिक घेतले जाते. कुठल्या शेतकऱ्यांना गोव्याला माल घेऊन जायचा आहे. तुम्हाला विकास करायचा असेल तर गावखेड्यातील पाणंद रस्ते तयार करा. बाजारपेठेपर्यंत जाणारे रस्ते त्यावरील खड्डे बुजवा. आमचा विकासाला विरोध नाही. परंतु शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात न लावता विकास करा अशी मागणी त्यांनी केली.
तर आम्ही शिक्षित नाही, आम्ही २ वर्ष जिल्हाधिकारी असेल, प्रशासन असेल त्यांना निवेदन देतोय पण कुणाला काही फरक पडत नाही. पोलिसांना पाठवून त्रास दिला जातो. शाईने निवेदन देऊन सरकारला जाग येत नसेल तर शेतकऱ्यांनी आपल्या रक्ताने निवेदन द्यायचे ठरवले. त्यामुळे शेतकऱ्यांनी लॅबमध्ये जात रक्त काढून आणले आणि हे पत्र शासनाला लिहिले आहे अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
"भाजपात प्रवेश करतो, पण शक्तीपीठ महामार्ग रद्द करा"
दरम्यान, हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर या संतप्त शेतकऱ्यांनी भाजपाच्या विजयाची घोषणा दिली. आम्ही भाजपा कार्यकर्ते नाही. परंतु भाजपात गेल्यावर नेते भ्रष्टाचार मुक्त होतात तसे शक्तीपीठ महामार्ग रद्द करा आम्ही भाजपात प्रवेश करतो असा उद्विग्न प्रतिक्रिया आंदोलनकारी शेतकऱ्यांनी दिली.