राजरत्न सिरसाट
अकोला - एकीकडे ‘एल-निनो’चा प्रभाव वाढत असून, त्याचा यंदाच्या मान्सूनवर परिणाम होणार असल्याचे भाकीत विविध हवामानतज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्रात मान्सून वेळेवर, तसेच काही प्रमाणात आधी पोहोचणार असल्याचा दावा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी केला आहे.
विषुववृत्तीय प्रशांत महासागराच्या मध्य व पूर्व भागातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्यपेक्षा किमान ०.५ अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक वाढल्यास एल निनो परिस्थिती घोषित केली जाते. सध्या हे तापमान वाढले आहे. त्यामुळे एल निनोचा प्रभाव वाढून मान्सून व तापमानवाढीवर प्रतिकूल परिणाम होणार, असा अंदाज आहे. तथापि, हिंदी महासागरातील तापमान स्थितीचा विचार करणे अधिक महत्त्वाचे असल्याचे डॉ. साबळे यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील मान्सूनसाठी स्वतंत्र मॉडेल विकसितडॉ. साबळे यांनी राज्यातील मान्सूनचा अंदाज मांडण्यासाठी स्वतंत्र मॉडेल विकसित केले असून, या विषयावर अमेरिकेतील पाच विद्यापीठात त्यांनी सखोल अभ्यास केला आहे. त्यांच्या मते, (इंडियन ओशिन डायपाेल) डायपोलनुसार ही स्थिती सकारात्मक असल्याने अंदमानमध्ये मान्सून तीन दिवस आधी पोहोचेल, केरळमध्ये दोन ते तीन दिवस आधी आगमन होईल, तर गोवा व महाराष्ट्रातही सुमारे दोन दिवस आधी, म्हणजेच २ ते ३ जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. एकूणच, एल निनोची परिस्थिती असली तरी हिंदी महासागरातील अनुकूल बदलांमुळे यंदाचा मान्सून समाधानकारक राहील, असा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे.
हिंदी महासागरातील परिस्थिती सकारात्मक सध्या हिंदी महासागरात पूर्व भागात सकारात्मक, तर पश्चिम भागात नकारात्मक अशी परिस्थिती दिसून येत आहे. सकारात्मक स्थितीत पावसाचे प्रमाण वाढते, तर नकारात्मक स्थितीत घट होते. भारतीय हवामान विभागानेही स्थिती सध्या सकारात्मक किंवा नकारात्मक नसून न्यूट्रल असल्याचे म्हटले असले, तरी प्रत्यक्षात तो सकारात्मक दिशेकडे झुकलेला असल्याचा अभ्यास डॉ. साबळे यांनी केल्याचे सांगितले. यामुळे महाराष्ट्रात एल निनोचा परिणाम फारसा राहण्याची शक्यता नसून, परिणामी यंदा मान्सून वेळेच्या आधी येईल, असा दावाही त्यांनी केला आहे.
Web Summary : Despite El Nino concerns, Maharashtra's monsoon is expected on time, around June 2-3, according to Dr. Ramachandra Sable. His independent model, factoring Indian Ocean conditions, predicts favorable rainfall, countering El Nino's potential impact and ensuring a satisfactory monsoon season.
Web Summary : एल नीनो की चिंताओं के बावजूद, डॉ. रामचंद्र साबले के अनुसार, महाराष्ट्र में मानसून 2-3 जून के आसपास समय पर आने की उम्मीद है। उनका स्वतंत्र मॉडल, जो हिंद महासागर की स्थितियों को ध्यान में रखता है, अनुकूल वर्षा की भविष्यवाणी करता है, जो एल नीनो के संभावित प्रभाव का मुकाबला करता है और एक संतोषजनक मानसून सुनिश्चित करता है।