Sanjay Gandhi National Park Mornig Walk: बोरिवली पूर्व येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मॉर्निंग वॉकसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात आज पासून येथील प्रशासनाने अचानक आणि प्रचंड वाढ करण्यात आल्याने मुंबईकरांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. आजपर्यंत सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या दरात उपलब्ध असलेली ही सुविधा आता अनेकांसाठी आवाक्याबाहेर गेली आहे.या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी सुमारे ११,००० टक्क्यांहून अधिक तर इतरांसाठी २,५०० टक्क्यांहून अधिक वाढ करण्यात आली आहे.
पूर्वी सर्वसामान्य नागरिकांसाठी वार्षिक केवळ ३८३ रुपये आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ४५ रुपये इतक्या अल्प दरात उपलब्ध असलेली मॉर्निंग वॉकची सुविधा आज दि,१ मे २०२६ पासून अनुक्रमे १०,००० रुपये आणि ५,००० रुपये इतकी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे वनसंरक्षक व संचालक राहुल गवई यांनी आपल्या पत्राद्वारे सदर वाढ जारी केली आहे.
दररोज हजारो नागरिक आरोग्याच्या दृष्टीने या उद्यानाचा वापर करतात. चालणे, धावणे आणि व्यायाम यांसारख्या सवयींमुळे हृदयविकार, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांपासून संरक्षण मिळते. त्यामुळे अशा सुविधांवर एवढी मोठी शुल्कवाढ करणे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरू शकते, असे मत नागरिक व्यक्त करत आहेत.
विशेषतः ज्येष्ठ नागरिक, मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य कुटुंबांसाठी ही वाढ जाचक ठरत असून, त्यांच्या दैनंदिन आरोग्यसवयींवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या निर्णयामुळे आंदोलनाची शक्यता देखील नाकारता येत नाही.
माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी या संदर्भात राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना पत्र लिहून ही शुल्कवाढ तात्काळ स्थगित करण्याची मागणी केली आहे. तसेच, उत्तर मुंबईतील लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन योग्य तो तोडगा काढावा, अशीही त्यांनी विनंती केली आहे.
दरम्यान, प्रशासनाने या वाढीमागील कारणे स्पष्ट करावीत आणि सर्वसामान्यांना परवडेल असा तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
Web Summary : Sanjay Gandhi National Park's morning walk fees skyrocketed, sparking outrage. Annual passes surged from ₹45 to ₹5,000 for seniors and ₹383 to ₹10,000 for others. Citizens demand rollback.
Web Summary : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान में मॉर्निंग वॉक शुल्क में भारी वृद्धि से आक्रोश। वरिष्ठ नागरिकों के लिए वार्षिक पास ₹45 से ₹5,000 और अन्य के लिए ₹383 से ₹10,000 हो गया। नागरिकों ने रोलबैक की मांग की।