"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 18:25 IST2025-11-06T18:08:04+5:302025-11-06T18:25:24+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर जमीन व्यवहार प्रकरणावरुन आरोप झाले आहे. या आरोपावर अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या 'अमीडिया होल्डिंग्स एलएलपी' या कंपनीच्या जमीन खरेदीच्या व्यवहार प्रकरण समोर आले. अमीडीया होल्डिंग्स एलएलपी कंपनीने तब्बल १८०४ कोटी रुपये बाजारभाव असलेलीजमीन केवळ ३०० कोटी रुपयांत विकत घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या खरेदी व्यवहारानंतर केवळ दोन दिवसांतच स्टँप ड्युटी माफ करण्याचे आदेश देण्यात आल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली. या प्रकरणावरुन राज्यातून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तर विरोधी पक्षांनी चौकशी करुन कारवाईची मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले असून दोन अधिकाऱ्यांचे निलंबन केले आहे. दरम्यान, आता या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
मुंबईतील वरळी डोम येथे एका कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती लावली. यावेळी माध्यमांनी त्यांना पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहार प्रकरणी प्रश्न केले. यावेळी आधी अजित पवार यांनी माध्यमांसोबत बोलणे टाळले. पण, नंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या. यावेळी त्यांनी तेव्हाच मी त्यांना असे काही करु नका असे सांगितले होते असे अजित पवार म्हणाले.
पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले, "जे काही आता टीव्ही चॅनेलवर चालू आहे, त्यासोबत माझा अजित पवार म्हणून डायरेक्ट काही संबंध नाही. मला ३५ वर्षे महाराष्ट्रातील जनता ओळखते, त्या संदर्भात मी आता संपूर्ण माहिती घेण्याचे ठरवले आहे. कारण मागे एकदा तीन चार महिन्यापूर्वी असे असे काहीतरी चालले आहे असे कानावर आले होते. त्यावेळी मी त्यांना असले काहीही चुकीचे केलेले मला चालणार नाही , असल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी कुणीपण करु नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या. पण, त्याच्यानंतर काय झाले मला माहिती नाही, असंही अजित पवार म्हणाले.
"आज परवानग्यांचे टीव्हीला दाखवत आहेत, मी आजपर्यंत कुठल्याही नातेवाईकांचा फायदा होण्यासाठी कुठल्याही अधिकाऱ्याला फोन केलेला नाही, किंवा सांगितलेले नाही. उलट मी या निमित्ताने अधिकारी वर्गाला सांगेन की माझ्या नावाचा वापर करुन कोणी काही चुकीचे करत असेल तर त्याला माझा पाठिंबा नसेल. मी नियमात, कायद्याच्या चौकटीत बसून काम करणारा आहे. मुख्यमंत्र्यांनी जरुर याची चौकशी करावी. मी आता त्याची माहिती घेऊन परत तुमची भेट घेऊन माहिती देईन, असंही अजित पवार म्हणाले.
"तो बंगला पार्थ अजित पवार यांच्या नावावर आहे. तो पत्ता त्याचा आहे. मी आता बोललो नसतो तर तुम्ही इथे पाणी मुरत आहे म्हणाला असता. मी सगळी माहिती घेऊन तुमच्यासोबत बोलणार आहे. मी या प्रकरणात कुठल्याही अधिकाऱ्यासोबत बोललो नाही, माझा काहीही संबंध नाही. नियमाच्या, कायद्याच्या चौकटीत बसून काम करणारा मी कार्यकर्ता आहे, असंही अजित पवार म्हणाले.