Devendra Fadnavis, BJP National President: भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षपद मिळण्याच्या चर्चांवर खुद्द देवेंद्र फडणवीसांनीच दिलं उत्तर, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 17:46 IST2024-08-02T17:44:57+5:302024-08-02T17:46:56+5:30
Devendra Fadnavis, BJP National President: फडणवीस हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात, अशी चर्चा सध्या सुरु आहे

Devendra Fadnavis, BJP National President: भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षपद मिळण्याच्या चर्चांवर खुद्द देवेंद्र फडणवीसांनीच दिलं उत्तर, म्हणाले...
Devendra Fadnavis, BJP National President: गेल्या अडीच-तीन वर्षांपासून महाराष्ट्राचे राजकारण बदलले आहे. केंद्रातील राजकारणाचा परिणाम राज्यातील राजकारणावर होताना दिसत आहे. लोकसभेच्या निकालानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना मंत्रिपद दिले गेले. तेव्हापासून भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती होणार, याबाबत चर्चा सुरु आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष बनणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर आज थेट फडणवीसांनीच पत्रकारांना उत्तर दिले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने विविध पक्ष आपापली रणनिती आखत आहेत. भाजपादेखील कामाला लागली आहे. अशा परिस्थितीत भाजपाचे राज्यातील वरिष्ठ फळीतील नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात, अशी चर्चा सुरु झाली होती. याबाबत आज पत्रकारांनी थेट देवेंद्र फडणवीसांनाच प्रश्न विचारला. 'तुम्ही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनाल अशी चर्चा गेले काही दिवस राजकारणात आहे, त्यावर काय प्रतिक्रिया?', असे पत्रकारांनी विचारले. त्यावर फडणवीस स्पष्टपणे म्हणाले- "ही चर्चा केवळ माध्यमांनी सुरु केलेली चर्चा आहे आणि ती माध्यमांमध्येच आहे."
दरम्यान, भाजपच्या राज्यातील नेत्यांना ते दिल्लीत जाऊ नये असेच वाटत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत कालच वक्तव्य केले. महाराष्ट्राचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उत्कृष्ठ संघटक आहेत. त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याबाबतचा निर्णय केंद्रीय नेतृत्त्व घेईल. मात्र, राज्यातील १४ कोटी जनतेच्या कल्याणासाठी फडणवीसांचे शासनातील व संघटनेतील स्थान महत्वाचे आहे. ते महाराष्ट्रात राहावे असेच आम्हाला वाटते, असे बावनकुळे म्हणाले.