Maharashtra Government : महाराष्ट्रासाठी आता दिल्ली दूर नाही: संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 16:33 IST2019-11-19T16:32:57+5:302019-11-19T16:33:11+5:30
Maharashtra News : सरकार स्थापनेबाबत खासदार संजय राऊत प्रचंड आशावादी आहेत. हळू हळू सगळं उलगडेल, लवकरच महाराष्ट्रात सरकार बनले, असे राऊत यांनी म्हटलंय.

Maharashtra Government : महाराष्ट्रासाठी आता दिल्ली दूर नाही: संजय राऊत
मुंबई : मुख्यमंत्रिपदावरून वाद विकोपाला गेल्यानंतर अखेर शिवसेना आणि भाजपामधील सुमारे ३० वर्षे जुनी युती तुटली आहे. त्यांनतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठींब्याने शिवसेना सत्ता स्थापन करणार असल्याच्या हालचालींना वेग आले आहे. त्यातच सोमवारी दिल्लीत सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात भेट झाली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे सुद्धा दिल्लीत जाणार का असा प्रश्न संजय राऊत यांना पत्रकारांनी विचारला असता, महाराष्ट्रासाठी आता दिल्ली दूर नाही. असे सूचक विधान त्यांनी केलं.
राज्यातील सत्तास्थापनेचा सस्पेन्स शरद पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर आणखी गुढ झाला आहे. शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या महाशिवआघाडीबाबत अंतिम निर्णय होणार असल्याचं सांगण्यात येत होतं. तर सरकार स्थापनेबाबत खासदार संजय राऊत प्रचंड आशावादी आहेत. हळू हळू सगळं उलगडेल, लवकरच महाराष्ट्रात सरकार बनले, असे राऊत यांनी म्हटलंय.
तसेच सत्ता स्थापनेच्या अनुषंगाने दिल्लीत सुरु असलेल्या घडामोडी लक्षात घेत उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार का ? असा प्रश्न पत्रकारांनी संजय राऊत यांना विचारला होता. तर या प्रश्नाचे उत्तर देताना, महाराष्ट्रासाठी आता दिल्ली दूर नाही असे राऊत म्हणाले. त्यामुळे महाशिवआघाडीबाबत हे सूचक वक्तव्य असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.
तर महाराष्ट्रात लवकरच शिवसेनेच्या नेतृत्वात सरकार बनणार असून ते स्थिर राहिल, असा विश्वास संजय राऊत यांनी बोलून दाखवला. शरद पवार समजून घेण्यासाठी सर्वांना १०० जन्म लागतील असेही राऊत म्हणाले. तसेच महाराष्ट्राचा विचार केल्यास येथे भाजपाला शिवसेने उभे केले, जागा दिली असल्याचे सुद्धा ते म्हणाले.