पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी PSI चा दबाव; विरोध केल्याने महिला डॉक्टरचा सुरु होता छळ, शेवटी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 12:54 IST2025-10-24T12:53:44+5:302025-10-24T12:54:09+5:30
साताऱ्यातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात नातेवाईकांनी गंभीर आरोप केला आहे.

पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी PSI चा दबाव; विरोध केल्याने महिला डॉक्टरचा सुरु होता छळ, शेवटी...
Satara Doctor Death: साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरच्या आत्महत्येने राज्यात खळबळ उडाली आहे. महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात आता अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृत्यूपूर्वी या महिला डॉक्टरने आपल्या हातावर सुसाईड नोट लिहून आत्महत्या करण्याचे कारण स्पष्ट केले. एका पोलिस अधिकाऱ्याने बलात्कार केल्याचा आणि दुसऱ्या व्यक्तीने छळ केल्याचा गंभीर आरोप महिला डॉक्टरने केला आहे. हा छळ पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी होत असल्याचे महिला डॉक्टरच्या नातेवाईकांनी सांगितले.
पोलिसांना मृत महिला डॉक्टरचा मृतदेह फलटणमधील हॉटेलमध्ये आढळला. त्यावेळी तपासणी केली असता, तिच्या हातावर स्पष्टपणे सुसाइड नोट लिहिलेली आढळली. या नोटमध्ये, "माझ्या मरण्याचे कारण PSI गणेश बदने आहे. त्याने माझा चारवेळा बलात्कार केला आणि प्रशांत बनकर यांनी मला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला," असं म्हटलं आहे. यापूर्वी आलेल्या माहितीनुसार, मृत डॉक्टर काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या आणि याच चौकशीमुळे त्या तणावाखाली होत्या. आता हातावर लिहिलेल्या नोटवरून, या वादाचे आणि तणावाचे मूळ कारण लैंगिक छळ आणि बलात्कार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
"ती मधूनमधून आम्हाला सांगायची की पोस्टमार्टम करताना रिपोर्ट बदलून देण्यासाठी अधिकाऱ्यांकडून त्रास दिला जायचा. मला जर आणखी त्रास झाला तर मी आत्महत्या करेन असं ती सांगायची. तिने पोलीस उपअधिक्षकांकडे लेखी तक्रार दिली होती ज्यावर तिला उत्तर मिळाले नाही. पोस्टमार्टम करत असताना तिला विविध स्तरातून तिला त्रास दिला जायचा. तिला सारखे रिपोर्ट बदलून देण्यास सांगितले जायचे. तिला ते सहन होत नव्हते. ती बाकीच्यांना पण मला असा त्रास होतोय त्यामुळे आत्महत्या करेन असं सांगत होती," असे महिला डॉक्टरच्या नातेवाईकांनी सांगितले.
कशी उघडकीस आली घटना?
फलटण येथील नामांकित हॉटेल मध्ये बंद खोलीत महिला डॉक्टरने जीवन संपवले. असून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला डॉक्टर फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. फलटण मधील एका हॉटेल मध्ये त्या राहत असलेल्या रूमचा दरवाजा ठोठावून सुद्धा तो उघडला गेला नसल्याने कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यांनी प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दरवाजा उघडून पाहिल्यानंतर त्यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले. फलटण शहर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करून उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
दरम्यान, पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे आणि सखोल तपास केला जाईल असे सांगितले आहे. हातावरील मजकूर हा महत्त्वाचा पुरावा मानला जात असून, त्या दिशेने पोलीस तपास करत आहेत.