छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 12:32 IST2025-08-14T12:31:59+5:302025-08-14T12:32:45+5:30
लातूर येथे सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत छावा संघटनेने टेबलावर पत्ते भिरकावत कोकाटे यांचा निषेध केला. यावेळी सूरज चव्हाण आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली

छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
मुंबई - कृषी मंत्र्यांचा राजीनामा मागणाऱ्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण चांगलेच अडचणीत आले होते. छावा प्रदेशाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांना मारहाण झाल्यानंतर राज्यात छावा संघटना आक्रमक झाली होती. सूरज चव्हाणवर कारवाई व्हावी या मागणीसाठी ठिकठिकाणी आंदोलने झाली. मारहाणीची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांना तातडीने युवक प्रदेशाध्यक्ष पदावरून राजीनामा देण्यास सांगितले. या घटनेला महिनाही उलटला नाही तोवर सूरज चव्हाणवर अजित पवारांनी मोठी जबाबदारी दिली आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीने सूरज चव्हाण यांच्यावर पक्षाच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी दिली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सूरज चव्हाण यांना नियुक्तीचे पत्र दिले. यावेळी मंत्री छगन भुजबळ, मंत्री आदिती तटकरे यांच्यासह पक्षाचे इतर आमदार, नेते उपस्थित होते. माणिकराव कोकाटे विधानसभा सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओनंतर शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. त्यात कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा, त्यांची कृषिमंत्रिपदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी छावा संघटनेने केली होती.
लातूर येथे सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत छावा संघटनेने टेबलावर पत्ते भिरकावत कोकाटे यांचा निषेध केला. यावेळी सूरज चव्हाण आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. या व्हिडिओनंतर सर्वच स्तरातून अजित पवारांच्या पक्षावर टीका होऊ लागली. सूरज चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केली परंतु छावा संघटना राष्ट्रवादीविरोधात आक्रमक होती. या प्रकारानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लातूरमधील घटनेची गंभीर दखल घेत सूरज चव्हाण यांना पदाचा त्वरीत राजीनामा देण्याच्या सूचना केल्या होत्या. कोणत्याही प्रकारच्या हिंसेला, असभ्य वर्तनाला मी ठामपणे विरोध करतो असं अजित पवार म्हटले होते. मात्र या घटनेनंतर अवघ्या २० दिवसांत सूरज चव्हाण यांना पक्षाचे प्रदेश सरचिटणीस पद देण्यात आले आहे.
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीस पदी मा. श्री. सूरज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या वाढीसाठी व पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मा. चव्हाण यांना शुभेच्छा. pic.twitter.com/pXzpTiWRUC
— MahaNCPspeaks (@mahancpspeaks) August 13, 2025
छावा संघटनेने केली टीका
राज्यात शेतकऱ्यांच्या पोरावर हल्ला केल्यानंतर सूरज चव्हाणला प्रमोशन देण्यात आले. सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी विरोधी आहे. सूरज चव्हाणला पक्षात घेणार नाही. पक्षधोरणाविरोधात काम करेल त्याला पक्षात स्थान नाही असं अजित पवारांनी आम्हाला सांगितले होते. मात्र अजित पवारांचे पक्षात चालत नाही का असा प्रश्न आम्हाला पडला आहे. आमच्या जखमा ओल्या असताना, या प्रकरणाला २० दिवसही झाले नाहीत आणि तुम्ही सूरज चव्हाणला हे पद दिले. आम्ही शेतकरी पोरांना मारहाण करणार, तुम्हाला काय करायचे ते करा हे यातून दाखवून दिले. सुनील तटकरे यांनी जे केले त्याचे परिणाम येणाऱ्या काळात त्यांना भोगावे लागतील असं सांगत छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांनी सूरज चव्हाणच्या नियुक्तीवरून टीका केली.