Criticism on Abhijit Banerjee's very shameful : Anand Sharma | अभिजीत बॅनर्जी यांच्यावरील टीका लाजिरवाणी : आनंद शर्मा

अभिजीत बॅनर्जी यांच्यावरील टीका लाजिरवाणी : आनंद शर्मा

ठळक मुद्दे नोटबंदी आणि जीएसटीची चुकीच्या अंंमलबजावणी यामुळे देशाचे नुकसानमहाराष्ट्रात काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षांमध्ये सरळ लढतभाजपच्या काळात अर्थ व्यवस्थेला मोठा धक्का

राहुल शिंदे - 

पुणे : 
प्रश्न: महाराष्ट्राच्या प्रचारात 370 कलम आणणे योग्य आहे का? 
उत्तर :  रोजगार,शेतकरी आत्महत्या,महिलांवर होणारे अत्याचार ,देशाची अर्थव्यवस्था,शेतीमाला मिळणारा भाव आदी मुद्यांवर भाजपचे कोणतेही नेते बोलत नाहीत.महाराष्ट्राच्या निवडणुकीचा कलम 370 शी काहीही संबंध नाही. तरीही तोच मुद्दा प्रचारात वारंवार आणला जातो.

अभिजीत बॅनर्जी यांच्याविषयी पियूश गोयल यांनी केलेल्या विधानावर काँग्रेसची भूमिका काय?
नोबेल पुरस्कार विजेता अभिजीत बॅनर्जी यांच्या सारख्या व्यक्तीवर देशाच्या अर्थमंत्र्याने टिका करणे ही लाजीरवाणी गोष्ट आहे. त्यातून या सरकारच्या वैचारिक स्तर लक्षात येतो. तसेच माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग यांच्यावर केलेली टीका खेदजनक आहे. सध्य स्थितीत राष्ट्रहिताचा विचार करून देशाची अर्थ व्यवस्था सुधारणेसाठी मनमोहन सिंग यांचा सल्ला घेण्याची गरज आहे. मनमोहन सिंग यांनी आर्थिक मंदीच्या काळात देशाच्या जीडीपीमध्ये चौपट वाढ केली होती.भाजप सरकारने कमीत कमी जीडीपीमध्ये दुप्पट वाढ करावी.परंतु,सध्य परिस्थितीत हे शक्य होईल असे वाटत नाही. केवळ मागील सरकारच्या चुकांमुळे  सर्व गोष्टी घडत आहेत,असे म्हणणे म्हणजे स्वत:चा भाजप स्वत:चा नाकर्तेपणा दाखवित आहे.सहा वर्षात भाजप सरकारला काहीही करता आले नाही,असेच यातून स्पष्ट होते.

प्रश्न : काँग्रेस कोणत्या मुद्यांवर महाराष्ट्राची निवडणुक लढत आहे?
उत्तर : महाराष्ट्रात काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षांमध्ये सरळ लढत आहे.भाजप केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहे.मात्र,भाजपप्रमाणे यापूर्वी कोणत्याही सत्ताधारी पक्षाने शासन,प्रशासन मिडियावर अशा पध्दतीने प्रभाव टाकला नव्हता.त्यातच भाजपच्या काळात अर्थ व्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे. वस्त्रोद्योग,हातमाग ,ऑटोमोबाईल आदी क्षेत्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून बेरोजगारीत वाढ झाली आहे. त्यातच नोटबंदी आणि जीएसटीची चुकीच्या अंंमलबजावणी यामुळे देशाचे नुकसान झाले,हे मुद्दे घेऊन आम्ही निवडणुक लढत आहोत.

प्रश्न : जीएसटीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर काही परिणाम झाला आहे का ?
उत्तर: गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी प्रथम जीएसटीला विरोध केला होता. जीएसटी संविधान विरोधी असल्याचे पत्र मोदी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पाठवले होते. मात्र,पंतप्रधान पदी विराजमान झाल्यावर मोदी यांनी जीएसटीच्या अंमलबजावणीसाठी काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेतली. मात्र,त्यावर काँग्रेस पक्षाने माझ्यासह गुलाब नमी आझाद, पी.चिदंबरम यांची त्रिसदसीय समिती स्थापन केली. काही मुद्यांवर समितीच्या सदस्यांमध्ये आणि केंद्र शासनामध्ये सहमती झाली होती. सहमती झालेले मुद्दे जीएसटी लागू करताना असतील,असे केंद्र शासनाने मान्य केले होते.परंतु,पुढील काळात केंद्र शासनाने आपल्या शब्दावरून तोंड फिरवले. त्यामुळे  सध्याची करप्रणाली काँग्रेसची नाही तर केवळ भाजपची आहे.तसेच जगातील सर्वाधिक क्लिष्ट व गुंतागुंतीची आहे. त्यात अनेक वेळा बदल करण्यात आला.त्यामुळे उद्योगांना मोठा धक्का बसला.परिणामी देशाची अर्थ व्यवस्था स्थिर होऊ शकली नाही.

प्रश्न: काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वार प्रश्न सातत्याने का उपस्थित केले जातो? 
उत्तर : काँग्रेस केवळ पक्ष नाही तर तो एक विचार आहे. त्यामुळे पक्षाचे अस्तित्व कधीही संपुष्टात येणार नाही. राहुल गांधी राजीमाना दिल्यानंतर अडचणीची स्थिती निर्माण झाली होती. काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. परंतु, त्यामुळे काँग्रेसचे मनोबल खचले असे नाही. परंतु,पक्षाने वस्तूस्थिती मान्य केली आहे. भारतासाठी,लोकशाहीसाठी काँग्रेसने पुन्हा उर्जा घूऊन परत आले पाहिजे,अशी अनेकांची इच्छा आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येवून काम करण्याची आवश्यकता आहे. युवक काँग्रेस,एनएसयुआय सारख्या घटकांचे सक्षमीकरण करावे लागणार आहे.
प्रश्न: काँग्रेसचे मोठे नेते भाजपमध्ये गेले यावर आपले मत काय? 
उत्तर : कठीण परिस्थितीत लढवैये लोक सोडून जात नाहीत.मात्र,राधाकृष्ण विखे-पाटील यांना ज्या घराने सन्मान दिला,ज्या संघटनेने संधी दिली.राज्याचे विरोधी पक्ष नेते पद दिले.तरीही लोकसभा निवडणुकीच्या वेळी ते भाजपमध्ये गेले ,याचे कोणीही समर्थन करणार नाही.हर्षवर्धन पाटील यांनीही पक्ष सोडला याबद्द्ल दु:ख वाटते. परंतु,सध्या जो पक्ष देशात सर्वात सक्षम आहे.त्यांना इतर पक्षातील उमेदवार घेण्याची आवश्यकता काय ?

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Criticism on Abhijit Banerjee's very shameful : Anand Sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.