CoronaVirus News: दिलासादायक! राज्यातील 'हा' जिल्हा कोरोनामुक्त; शेवटच्या कोरोनाबाधित रुग्णाला दिला डिस्चार्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 08:31 AM2020-06-11T08:31:37+5:302020-06-11T08:32:23+5:30

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या एकीकडे वाढत असताना दूसरीकडे राज्यातील गोंदिया जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे.

CoronaVirus News: Gondia district of the state has become coronavirus free | CoronaVirus News: दिलासादायक! राज्यातील 'हा' जिल्हा कोरोनामुक्त; शेवटच्या कोरोनाबाधित रुग्णाला दिला डिस्चार्ज

CoronaVirus News: दिलासादायक! राज्यातील 'हा' जिल्हा कोरोनामुक्त; शेवटच्या कोरोनाबाधित रुग्णाला दिला डिस्चार्ज

googlenewsNext

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात बुधवारी  कोरोनाचे ३ हजार २५४ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ९४ हजार ४१ झाला आहे. तर दिवसभरात १४९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने राज्यात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा आकडा ३ हजार ४३८ वर पोहोचला आहे. 

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या एकीकडे वाढत असताना दूसरीकडे राज्यातील गोंदिया जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. गोंदिया येथील जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेला कोरोनाबाधित बुधवारी कोरोनामुक्त झाला. त्यामुळे आता गोंदिया जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त झाला असून २१ दिवसांच्या कालावधीत ६८ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाल्याने गोंदियातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र  जिल्ह्यात आता एकही कोरोना बाधित रुग्ण नसून आता जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त कसा ठेवता येईल हे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर उभे राहिले आहे.

२६ मार्चला गोंदिया जिल्ह्यात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. त्यानंतर हा रुग्ण बरा होवून एप्रिल महिन्यात घरी परतला. तब्बल ३८ दिवस जिल्हा कोरोनामुक्त होता. मात्र केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊनमुळे विविध राज्यात आणि जिल्ह्यात अडकून असलेल्या मजूर आणि नागरिकांना त्यांच्या स्वगृही जाण्याची परवानगी दिली. त्यामुळे मुंबई, पुणे आणि इतर रेड झोनमधील नागरिक स्वगृही परतले. यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढला. मुंबई, पुण्याहून आलेल्या नागरिकांमुळे १९ मे रोजी जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर अवघ्या आठ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ६८ वर पोहचली.

प्रशासनासमोर कोरोनामुक्त ठेवण्याचे आव्हान

तब्बल २१ दिवसांच्या कालावधीनंतर गोंदिया जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त झाला आहे. त्यामुळे जिल्हा यापुढेही कसा कोरोनामुक्त राहिल यासाठी जिल्हा आणि आरोग्य प्रशासनाला उपाययोजना करण्याची गरज आहे. बाहेरील जिल्हा आणि राज्यातून येणाऱ्या नागरिकांवर बारीक नजर ठेवून त्यांची सीमा तपासणी नाक्यावर आरोग्य तपासणी करण्याची गरज आहे.कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर असणार आहे.

कोरोना सेंटरमध्ये आनंदाचे वातावरण

गोंदिया येथील जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड कोरोना सेंटरमध्ये मागील २१ दिवसात एकूण ६८ कोरोनाबाधित रुग्णांना दाखल करण्यात आले होते. मात्र यानंतर हळूहळू रुग्ण बरे होवून परत गेल्याने केवळ एका कोरोना बाधितावर उपचार सुरू होता. पण बुधवारी तो कोरोनाबाधित सुध्दा कोरोनामुक्त झाल्याने कोरोना केअर सेंटरमध्ये आता एकही कोरोना बाधित नाही. बुधवारी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाला सुटी देताना येथील डॉक्टर आणि परिचारिकांनी कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. एकंदरीत कोरोना केअर सेंटरमध्ये आनंदाचे वातावरण होते.

Web Title: CoronaVirus News: Gondia district of the state has become coronavirus free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.