CoronaVirus News: Also cancel examinations of national institutions; Uddhav Thackeray sent a letter to Prime Minister Narendra Modi | CoronaVirus News: राष्ट्रीय संस्थांच्या परीक्षाही रद्द करा; उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवले पत्र

CoronaVirus News: राष्ट्रीय संस्थांच्या परीक्षाही रद्द करा; उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवले पत्र

मुंबई : महाराष्ट्राने व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या (अंतिम सत्राच्या) परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असून याच धर्तीवर राष्ट्रीय शिक्षण संस्थांच्या अशा अभ्यासक्रमाच्या परीक्षा रद्द करण्यास संबंधित संस्थांना सूचित करावे, असे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे. मुंबईसह पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, अकोला, पालघर या शहरांमध्ये कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्याचे वातावरण कोणत्याही परीक्षांसाठी आणि वर्ग सुरू करण्यासाठी अनुकूल नाही. सध्याच्या परिस्थितीत परीक्षा घेणे हे विद्यार्थी आणि पालकांबरोबरच स्थानिक प्रशासन, पर्यवेक्षक, वाहतूक प्रशासन या सर्वांवरचा ताण वाढवणारे आहे. अंतिम वर्ष वगळता इतर विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि नवीन शैक्षणिक वर्षाच्या कॅलेंडर संदर्भात युजीसीने लागू केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे राज्य सरकार तंतोतंत पालन करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या पत्रात म्हटले आहे.
>परीक्षेचा पर्यायही खुला
अंतिम वर्षाच्या परीक्षा यापूर्वी जुलै २०२० मध्ये घेण्याचे ठरविण्यात आले होते; परंतु सध्याची परिस्थिती विचारात घेता राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या १८ जून २०२० च्या बैठकीत परीक्षा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठ ठरवतील त्या फॉर्म्युल्यानुसार विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येईल. परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जेव्हा त्या घेता येतील तेव्हा घेण्याचा पर्यायही खुला ठेवण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी या पत्रात नमूद केले आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus News: Also cancel examinations of national institutions; Uddhav Thackeray sent a letter to Prime Minister Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.