congress nana patole criticised devendra fadnavis on central govt package | मोदी आणि शाह हे फडणवीसांना गांभीर्याने घेत नाहीत; नाना पटोलेंचा टोला

मोदी आणि शाह हे फडणवीसांना गांभीर्याने घेत नाहीत; नाना पटोलेंचा टोला

ठळक मुद्देनाना पटोले यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकाकेंद्रातील भाजपच्या सरकारने काय केले? - पटोलेमोदी- शाह हे फडणवीसांना गांभीर्याने घेत नाहीत - पटोले

मुंबई: महाराष्ट्र सध्या कोरोना महामारीच्या मोठ्या संकटात आहे. राज्यातील परिस्थिती चिंताजनक आहे. राज्य सरकार सर्व पातळ्यांवर मोठ्या ताकदीने काम करत असताना राज्यातील विरोधी पक्ष मात्र बेजबाबदारपणे वागत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सरकारला लक्ष्य करताना पाश्चिमात्य देशांनी दिलेल्या पॅकेजची आकडेवारी देत राज्य सरकारच्या मदतीबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे. परंतु केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्राला या कठीण परिस्थितीत किती मदत केली, हे फडणवीस यांनी सांगायला हवे होते, अशी विचारणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. (nana patole criticised devendra fadnavis)

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी राज्यातील प्रमुख नेत्यांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते. पत्रकारांशी बोलताना नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले.

राज्य सरकारचा जनतेला केवळ त्रास, मुख्यमंत्र्यांचं भाषणच कळलं नाही; फडणवीसांचा टोला

जनतेला दिलासा देण्यासाठी सरकार नेहमी तत्पर

मागील वर्षभरापासून महाराष्ट्र विविध संकटाचा सामना करत आहे. कोरोना महामारी, चक्रिवादळ, अतिवृष्टी, विदर्भातील पूरस्थिती अशी संकटाची मालिकाच सुरू आहे. अशा परिस्थितीतही मविआ सरकार जनतेला दिलासा देण्यासाठी नेहमी तत्पर राहिले आहे. कोरोनामुळे माझ्यासमोर आर्थिक संकट असतानाही जनतेच्या हितासाठी सरकारने कधीही हात आखडता घेतला नाही, असे सांगत दुर्दैवाने केंद्रातील मोदी सरकारने नेहमीच महाराष्ट्राला दुजाभावाची वागणूक दिली. राज्याच्या हक्काचा जीएसटी परतावा तसेच इतर निधीही देण्यास टाळाटाळ केली, असा दावा पटोले यांनी केला.  

लॉकडाऊनची भीतीने मजुरांनी धरली घरची वाट; गावी जाणाऱ्या प्रवाशांमध्ये वाढ

भाजप नेत्यांची कटकारस्थाने

महाराष्ट्र संकटात असताना राज्यातील भाजप नेते मविआ सरकारविरोधात कटकारस्थाने करत राहिले. कधी राजभवनच्या माध्यमातून, कधी काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून षडयंत्र रचण्यातच ते मग्न राहिले. केंद्रीय तपास यंत्रणांच्या आडून भाजपाच्या नेत्यांनी महाराष्ट्रातील वातावरण गढूळ करून देशात बदनामी केली. राज्याला आर्थिक मदतीची गरज असताना मुख्यमंत्री मदतनिधीत पैसे जमा न करता राज्यातील भाजपा नेत्यांनी पंतप्रधान केअर फंडात पैसे जमा केले, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

 

“गेल्या वर्षभरात कृष्णकुंज हा मंत्रालयाचा दुसरा पत्ता झाला होता, हे लक्षात ठेवा”

मोदी- शाह हे फडणवीसांना गांभीर्याने घेत नाहीत

राज्य सरकारला पॅकेज संदर्भात विचारणा करणारे देवेंद्र फडणवीस व भाजप नेते यांनी नरेंद्र मोदी सरकारकडून महाराष्ट्राला भरीव आर्थिक मदत मिळावी, यासाठी काय केले, अशी विचारणा करत मोदींनी जाहीर केलेल्या त्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचे काय झाले, या २० लाख कोटी रुपयांतून महाराष्ट्राला किती कोटी मिळाले, याची उत्तरे त्यांनी जनतेला द्यावीत. फडणवीस यांची मागणी रास्तच आहे, पण त्यांनी नरेंद्र मोदी यांच्याकडे विचारणा करणे अपेक्षित आहे. कदाचित त्यांना दिल्लीत मोदी-शाह गांभीर्याने घेत नाहीत, म्हणून ते राज्य सरकारच्या नावावर मोदींना सुचवत असावेत, अशी कोपरखळीही पटोले यांनी मारली.

महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा आढावा घ्या; काँग्रेस नेते मुख्यमंत्र्यांना भेटले

केंद्रातील भाजपच्या सरकारने काय केले? 

कोरोना संकटात भरीव उपाययोजना करण्याचे सोडून देशातील जनतेला टाळ्या, थाळ्या वाजवण्याचे आवाहन करण्यापलीकडे केंद्रातील भाजपाच्या सरकारने काय केले, असा सवाल करत कसलीही तयारी न करता अचानक लॉकडाऊन लावून संपूर्ण देशाला अंधारात ढकलून दिले. लाखो लोकांनी पायपीट करत गावाचा रस्ता धरला, त्यावेळी अनेकांनी रस्त्यातच जीव सोडला. सामान्य जनतेला आगीच्या खाईत लोटून देण्याचे पाप भाजपने केले, असा आरोप पटोले यांनी केला. लाखो लोकांचे संसार उघड्यावर आले. सामान्य जनतेला किती मरण यातना दिल्या हे जगाने पाहिले. पॅकेजच्या नावाखाली फक्त मोठ्या आकड्यांची जुमलेबाजी केली. देशाला देशोधडीला लावले त्या भाजपला महाराष्ट्र सरकारला प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार नाही, असेही नाना पटोले यांनी म्हटले आहे. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: congress nana patole criticised devendra fadnavis on central govt package

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.