"३१ मार्चपूर्वी पीक कर्जाचे पैसे भरा"; अजित पवारांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, "बोलताना यांची जीभ..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 13:50 IST2025-03-29T13:46:55+5:302025-03-29T13:50:58+5:30
कर्जमाफीवरुन अजित पवार यांनी केलेल्या विधानावर काँग्रेसने टीका केली आहे.

"३१ मार्चपूर्वी पीक कर्जाचे पैसे भरा"; अजित पवारांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, "बोलताना यांची जीभ..."
Congress on Ajit Pawar: राज्यातल्या कर्जमाफीवर बोलताना, सगळी सोंग करता येतात पैशाचे सोंग करता येत नाही, शेतकऱ्यांनी ३१ मार्च पूर्वी पीककर्जाचे पैसे भरा, आता ती परिस्थिती नाही, असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. अजित पवार यांच्या या विधानावरुन आता विरोधकांनी टीका केली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत जनतेला दिलेल्या आश्वासनांची महायुती सरकार पूर्तता करत नसल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला होता. त्यानंतर आता अजित पवार यांनी कर्जमाफीबाबत केलेल्या विधानावरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झालीय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
बारामतीमध्ये शेतकरी मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन महत्त्वाचे विधान केलं. माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफी ऐकलं का? असा सवाल अजित पवारांनी केला. "राज्यातील शेतकऱ्यांना यापूर्वी वीजमाफी, पीक कर्जाच्या व्याजात सवलत, दुधाचे अनुदान देण्यात आले आहे. 'लाडकी बहीण' योजनेसाठी सुमारे ४५ हजार कोटींचा बोजा सरकारने पेलला असताना कर्जमाफीसारखी सध्या तरी आर्थिक स्थिती नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांसह कर्जदारांनी ३१ मार्चपूर्वी बँकांमध्ये कर्जाची परतफेड करा," असं अजित पवार म्हणाले.
"काहींनी निवडणुकीदरम्यान जाहीरनाम्यात कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. जे सांगितले, ते प्रत्यक्षात येत नाही. शेतकऱ्यांना माझे सांगणे आहे, की ३१ तारखेच्या आत पीक कर्जाचे पैसे भरा. मात्र, पीक कर्जाच्या शून्य टक्के व्याजाकरता तुम्हाला जी मदत व्हायला पाहिजे आणि त्याकरिता बँकेला जी काही रक्कम भरावी लागते, ती सगळी रक्कम जवळपास १००० ते १२०० कोटी रुपये आहे. ती सरकारने बँकांना दिली आहे. त्यामुळे यावर्षी आणि पुढील वर्षी देखील घेतलेल्या कर्जाचे पैसे भरा," असंही अजित पवार म्हणाले.
काँग्रेसने केली टीका
"हे बोलताना ना यांची जीभ थरथरते ना यांना लाज शरम वाटते. जनतेने राक्षसी बहुमत देऊन सत्तेवर बसवलेले लोक आता राक्षसाप्रमाणे बोलू वागू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत कर्जमाफी देऊ असे आश्वासन देऊन महायुतीने राज्यातील शेतक-यांची मते घेतली आणि सत्तेवर येताच ३१ मार्च पूर्वी पीक कर्ज भरा, कर्जमाफी मिळणार नाही असे मुजोरपणे सांगत आहेत. लाडक्या बहिणींची फसवणूक अगोदरच केली आहे. २१०० चे आश्वासन देऊन त्यांच्या हातावर १५०० रुपये टेकवले जात आहेत. विविध कारणे देऊन १० लाखांहून अधिक महिलांना अपात्र करून योजनेचा लाभ बंद केला आहे आणि २१०० रुपये मिळण्यासाठी ५ वर्ष वाट पहावी लागेल असे उद्दामपणे सांगत आहेत," असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं.