“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 21:01 IST2025-09-28T21:01:10+5:302025-09-28T21:01:40+5:30
Congress Harshwardhan Sapkal News: महायुती सरकारच्या मंत्र्यांनी एक दिवस पाहणीचे नाटक केले व मुख्यमंत्री दिल्लीत जाऊन पंतप्रधानांना भेटले पण रिकाम्या हातानेच परतले, अशी टीका करण्यात आली आहे.

“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
Congress Harshwardhan Sapkal News: राज्यात अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले आहे, शेतकऱ्याचे होते नव्हते ते सर्व वाहून गेले आहे, संसार उघड्यावर आला आहे. बळीराजाला आता मदतीची व आधाराची गरज आहे. काँग्रेस पक्षाने शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा व दुःख जाणून घेतले व भरीव मदत देण्याची मागणी सरकारकडे केली आहे पण सरकार या संकटाकडे गांभिर्याने पाहत नाही. मे महिन्यापासूनच पावसाने धुमाकुळ घातला आहे पण अद्याप राज्य सरकारने कोणताही अहवाल केंद्र सरकारला पाठवला नाही, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
महायुती सरकारच्या मंत्र्यांनी एक दिवस पाहणीचे नाटक केले व मुख्यमंत्री दिल्लीत जाऊन पंतप्रधानांना भेटले पण रिकाम्या हातानेच परतले. या भेटीत त्यांना शेतकऱ्यांपेक्षा सुरजागडच्या खाणीतच जास्त रस होता आणि त्यांनी पंतप्रधानांशी चर्चाही त्याच विषयावर केली. राज्यातील महायुती सरकारने शेतकऱ्यांना तातडीने भरीव मदत द्यावी अन्यथा एकाही मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.
सोमवारपासून संविधान सत्याग्रह पदयात्रा
महान क्रांतिकारक शहीद भगतसिंह यांच्या जयंतीनिमित्ताने नागपूरमध्ये काँग्रेस पक्षाने मशाल मोर्चा काढला व संविधान चौकात सभा पार पडली. सोमवार दि. २९ सप्टेंबर रोजी दीक्षाभूमीपासून सेवाग्राम आश्रम पर्यंतच्या संविधान सत्याग्रह पदयात्रेला सुरुवात होत आहे. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही पदयात्रा निघत असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, आमदार, खासदार, पदाधिकारी व स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते यात सहभागी होत आहेत.
दरम्यान, राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती, दसरा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शंभर वर्ष हा सुवर्णयोग एकाच दिवशी आलेला आहे. रा. स्व. संघाला १०० वर्षे होत असताना आलेला हा योग संघाने समजून घ्यायला हवा. गांधी पुतळ्याच्या समोर फक्त मानवंदना देऊन चालणारा नाही तर नथुरामचा धिक्कार करून बुरसटलेले विचार, मनुस्मृती व बंच ऑफ थॉट ला तिलांजली देऊन गांधी विचार व भारताचे संविधान स्वीकारावे, असे आवाहन हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.