शेतकऱ्यांच्या आत्महत्येकडे सतेज पाटील यांनी वेधलं लक्ष, मंत्री मकरंद पाटील म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 12:14 IST2025-12-15T12:13:36+5:302025-12-15T12:14:02+5:30
यावर खुलासा करताना मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासन स्तरावरून विविध विभागांमार्फत उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगितले.

शेतकऱ्यांच्या आत्महत्येकडे सतेज पाटील यांनी वेधलं लक्ष, मंत्री मकरंद पाटील म्हणाले..
कोल्हापूर : राज्यात सावकारी कर्ज, बँकांचे कर्ज, नापिकी, अतिवृष्टी आदी कारणांमुळे जानेवारी ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत एकूण ७८९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय? शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी श्वेतपत्रिका जाहीर करून कोणत्या उपाययोजना केल्या आहेत? असे प्रश्न विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी उपस्थित केले.
सावकारी कर्ज, इतर बँकांचे कर्ज, नापिकी आणि अतिवृष्टीमुळे या आत्महत्या झाल्या आहेत. यामध्ये विदर्भातील नागपूर विभागात २९६, तर मराठवाडा विभागातील २१२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, याकडे पाटील यांनी लक्ष वेधले.
याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय? चौकशीच्या अनुषंगाने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत कोणती कार्यवाही केली? तसेच शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी श्वेतपत्रिका जाहीर करून कोणत्या उपाययोजना केल्या आहेत? असे प्रश्न सतेज पाटील यांनी उपस्थित केले.
यावर खुलासा करताना मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासन स्तरावरून विविध विभागांमार्फत उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगितले. आत्महत्या रोखण्याकरिता शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळणे, सिंचन सुविधांमध्ये वाढ करणे, पिकांची, शेतजमिनीची आणि पशुधनाची नुकसानभरपाई शेतकऱ्यांना वाटप करणे, या बाबी जिल्हास्तरावर राबविण्यात येत असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले.